Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

मत्तय 15 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती


जे विटाळविते

1 परूशी आणि यरुशलेमहून आलेले नियमशास्त्राचे काही शिक्षक येशूंकडे येऊन विचारू लागले,

2 “तुमचे शिष्य आपल्या वाडवडीलांच्या परंपरा का मोडतात? जेवणापूर्वी ते आपले हात धूत नाहीत!”

3 येशूंनी उत्तर दिले, “तुमच्या प्रथा पाळण्याकरिता तुम्ही परमेश्वराच्या आज्ञा का मोडता?

4 परमेश्वर म्हणाले, ‘तुझ्या वडिलांचा आणि आईचा सन्मान करा’ आणि ‘जो कोणी आपल्या आई किंवा वडिलास शाप देईल त्यास जिवे मारावे.’

5 परंतु तुम्ही म्हणता, जर कोणी असे घोषित करतो की, आईवडिलांना करत असलेली मदत, ही ‘परमेश्वराला समर्पित’ आहे.

6 अशाप्रकारे ते त्यांच्या आईवडिलांचा मान ठेवीत नाहीत, पण तुमच्या परंपरा पाळल्या जाव्या म्हणून तुम्ही परमेश्वराचे वचन रद्द करता.

7 अहो ढोंग्यांनो! यशायाह संदेष्ट्याने तुमच्या ढोंगीपणाचे अचूक वर्णन केले आहे, तो म्हणतो:

8 “ ‘हे लोक केवळ त्यांच्या मुखाने माझा सन्मान करतात, पण त्यांची अंतःकरणे माझ्यापासून दूर आहेत.

9 माझी उपासना ते व्यर्थपणे करतात; त्यांची शिकवण केवळ मानवी नियम आहेत.’ ”

10 येशूने गर्दीतील लोकांना आपल्याकडे बोलाविले आणि म्हटले, “ऐका आणि समजून घ्या.

11 मनुष्याच्या मुखात जे जाते ते त्यांना अशुद्ध करीत नाही, पण जे त्यांच्या मुखातून बाहेर पडते ते त्यांना अशुद्ध करते.”

12 थोड्या वेळाने त्यांच्या शिष्यांनी त्यांच्याकडे येऊन विचारले, “आपल्या उद्गारांनी परूशी लोकांची मने दुखावली आहेत हे तुम्हाला कळले काय?”

13 येशू म्हणाले, “माझ्या स्वर्गीय पित्याने न लावलेले प्रत्येक झाड उपटून टाकण्यात येईल.

14 त्यांच्याकडे लक्ष देऊ नका; ते आंधळे मार्गदर्शक आहेत. जर एक आंधळा मनुष्य दुसर्‍या आंधळ्याला वाट दाखवेल, तर ते दोघेही खाचेत पडतील.”

15 पेत्र म्हणाला, “आम्हाला हा दाखला स्पष्ट करून सांगा.”

16 “तुम्ही अजूनही अज्ञानी आहात काय?” येशूंनी त्यांना विचारले.

17 “तुम्हाला हे समजत नाही काय की, जे मुखात जाते ते पोटात उतरते आणि शरीरातून बाहेर पडते?

18 परंतु जे शब्द मुखातून बाहेर येतात ते हृदयातून येतात आणि तेच मनुष्याला अशुद्ध करतात.

19 कारण हृदयातून दुष्ट विचार, खून, जारकर्म, व्यभिचार, चोरी, खोटी साक्ष, निंदा ही बाहेर पडतात;

20 आणि हेच मनुष्याला अशुद्ध करतात. परंतु हात धुतल्याशिवाय अन्न खाल्याने ते अशुद्ध होत नाहीत.”


कनानी स्त्रीचा विश्वास

21 नंतर येशूंनी तो प्रांत सोडला आणि सोर व सीदोन या प्रांतात गेले.

22 एक कनानी स्त्री त्या भागातून येशूंकडे आली आणि त्यांना विनवणी करून म्हणाली, “प्रभू, दावीद राजाचे पुत्र, माझ्यावर दया करा! माझी मुलगी भूतग्रस्त झाली असून, ती पुष्कळ छळ सहन करीत आहे.”

23 पण येशूंनी एका शब्दानेही तिला उत्तर दिले नाही; तेव्हा त्यांच्या शिष्यांनी त्यांना विनंती केली, “प्रभूजी, तिला पाठवून द्या, कारण ती आपल्यामागे सारखी ओरडत येत आहे.”

24 तेव्हा येशू त्या स्त्रीला म्हणाले, “हरवलेल्या इस्राएली मेंढराकडेच मला पाठविले आहे.”

25 परंतु ती बाई पुढे आली आणि त्यांच्या पाया पडून म्हणाली, “प्रभूजी, मला मदत करा.”

26 येशू म्हणाले, “लेकरांची भाकर काढून कुत्र्यांना घालणे बरोबर नाही.”

27 “हे प्रभू आपले म्हणणे अगदी बरोबर आहे!” स्त्रीने उत्तर दिले, “स्वामीच्या मेजाखाली जे तुकडे पडतात ते कुत्रेही खातात.”

28 ते ऐकून येशू तिला म्हणाले, “बाई, तुझा विश्वास फार मोठा आहे! म्हणून तुझी विनंती मान्य करण्यात आली आहे.” आणि त्याच क्षणी तिची मुलगी बरी झाली.


येशू चार हजारांना अन्न पुरवितात

29 नंतर येशूंनी ते ठिकाण सोडले आणि गालील सरोवराच्या किनार्‍याने गेले. मग ते एका डोंगरावर जाऊन बसले.

30 खूप मोठी गर्दी त्यांच्याजवळ जमली. लोकांनी आपल्यातील लंगडे, आंधळे, मुके, अपंग आणि इतर रोगांनी आजारी असलेल्यांना त्यांच्या चरणांजवळ आणले आणि त्या सर्वांना त्यांनी बरे केले.

31 मुके बोलू लागले, जे लंगडे होते ते चालू लागले आणि आंधळे पाहू लागले. सर्व जमाव आश्चर्यचकित होऊन इस्राएलाच्या परमेश्वराची मनःपूर्वक स्तुती करू लागला.

32 येशूंनी आपल्या शिष्यांना जवळ बोलाविले आणि म्हणाले, “मला या लोकांचा कळवळा येतो. कारण ते तीन दिवसापासून आहेत आणि त्यांना खावयास काही नाही. त्यांना तसेच उपाशी पाठवून देण्याची माझी इच्छा नाही, तसे केले तर ते रस्त्यातच कोसळून पडतील.”

33 शिष्यांनी उत्तर दिले, “एवढ्या लोकांना पुरेल इतके अन्न या ओसाड रानात कुठून आणावे?”

34 येशूंनी विचारले, “तुमच्याजवळ किती भाकरी आहेत?” शिष्यांनी उत्तर दिले, “सात आणि काही लहान मासे.”

35 तेव्हा त्यांनी जमावाला जमिनीवर बसावयास सांगितले.

36 मग त्या सात भाकरी व मासे घेऊन त्या भाकरीबद्दल परमेश्वराचे आभार मानले आणि त्या मोडल्या व शिष्यांना दिल्या आणि त्यांनी ते लोकांना वाढले.

37 ते सर्वजण जेवले व तृप्त झाले. नंतर शिष्यांनी उरलेले तुकडे गोळा केले तेव्हा सात टोपल्या भरल्या.

38 स्त्रिया व लेकरांशिवाय जे जेवले ते चार हजार पुरुष होते.

39 येशूंनी लोकांना घरी जाण्यास निरोप दिल्यानंतर ते एका होडीत बसून मगादान नावाच्या भागात आले.

पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™

ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.

यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.

सर्व अधिकार जगभरात राखीव.

Holy Bible, Marathi Contemporary Version™

Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.

Used with permission.

All rights reserved worldwide.

Biblica, Inc.
Lean sinn:



Sanasan