लूककृत शुभवर्तमान 5 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्तीप्रथम शिष्यांस पाचारण 1 एके दिवशी येशू गनेसरेत सरोवराच्या किनार्यावर उभे होते, परमेश्वराचे वचन ऐकण्यासाठी लोकांनी त्यांच्याभोवती गर्दी केली. 2 त्यांनी पाण्याच्या कडेला कोळ्यांनी ठेवलेल्या दोन होड्या पाहिल्या, कारण कोळी आपली जाळी धूत होते. 3 त्यापैकी एका होडीत ते बसले जी शिमोनाची होती आणि ती काठापासून थोडीशी बाजूला करावी असे त्यांनी शिमोनाला सांगितले. मग त्या होडीत बसून त्यांनी लोकांना शिक्षण दिले. 4 येशूंनी आपले बोलणे संपविल्यानंतर, ते शिमोनास म्हणाले, “होडी खोल पाण्यात ने आणि मासे पकडण्यासाठी जाळी टाक.” 5 शिमोनाने उत्तर दिले, “गुरुजी, आम्ही रात्रभर परिश्रम केले, पण काहीच हाती लागले नाही. पण तुम्ही सांगता, म्हणून जाळे टाकतो.” 6 तसे केल्यानंतर त्यांनी इतक्या मोठ्या संख्येने मासे पकडले की त्यांच्या जाळ्या फाटू लागल्या. 7 जे सहकारी दुसर्या होडीत होते, त्यांनी येऊन आपल्याला मदत करावी म्हणून त्यांनी त्यांना इशारा केला आणि लवकरच त्या दोन होड्या माशांनी इतक्या गच्च भरल्या की बुडू लागल्या. 8 शिमोन पेत्राने हे पाहिले, तेव्हा त्याने येशूंच्या पुढे गुडघे टेकले आणि म्हणाला, “प्रभू कृपा करून, माझ्यापासून दूर जा, कारण मी पापी मनुष्य आहे!” 9 कारण त्यांनी धरलेले पुष्कळ मासे पाहून, तो आणि त्याच्या बरोबरचे इतर जोडीदार आश्चर्यचकित झाले होते; 10 आणि त्याचबरोबर शिमोनाचे भागीदार जब्दीचे पुत्र याकोब आणि योहान यांनाही आश्चर्य वाटले होते. येशू शिमोनाला म्हणाले, “भिऊ नको, येथून पुढे मी तुला माणसे धरणारा करेन.” 11 त्यांनी होडी काठाला लावल्यावर सर्वकाही तिथेच सोडले आणि ते त्यांच्यामागे गेले. येशू कुष्ठरोग्याला बरे करतात 12 येशू एका गावात असता एक कुष्ठरोगाने भरलेला मनुष्य तिथे आला. त्याने येशूंना पाहिले, तेव्हा त्यांच्यापुढे गुडघे टेकून म्हणाला, “प्रभू, जर तुमची इच्छा असेल, तर मला शुद्ध करण्यास तुम्ही समर्थ आहात.” 13 येशूंनी आपला हात लांब करून त्याला स्पर्श केला आणि म्हटले, “माझी इच्छा आहे. शुद्ध हो!” आणि तत्काळ त्याचा कुष्ठरोग निघून गेला. 14 नंतर येशूंनी त्याला निक्षून सांगितले, “हे कोणाला सांगू नकोस, पण जा, मोशेच्या नियमशास्त्राप्रमाणे कुष्ठरोग बरे झाल्यानंतर जे अर्पण करावयाचे असते ते कर, म्हणजे तू शुद्ध झाला आहेस, याचे प्रमाण प्रत्येकाला पटेल.” 15 तरीपण येशूंविषयीचे वर्तमान अधिकच पसरत गेले, त्यामुळे त्यांचे ऐकण्यासाठी व रोगमुक्त होण्यासाठी लोकसमुदाय येऊ लागले. 16 परंतु बरेचदा येशू प्रार्थना करण्यासाठी एकांतात जात असत. येशू एका पक्षघाती मनुष्याला बरे करतात 17 एके दिवशी येशू शिक्षण देत असताना, परूशी आणि नियमशास्त्राचे शिक्षक तिथे बसले होते. ते गालील आणि यहूदीया प्रांतातील प्रत्येक खेड्यातून, तसेच यरुशलेमातूनही आले होते. आजारी लोकांना निरोगी करण्याचे प्रभूचे सामर्थ्य येशूंच्या ठायी होते. 18 काही लोकांनी एका पक्षघाती मनुष्याला खाटेवर घेऊन त्याला घरात येशूंच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न केला. 19 जेव्हा गर्दी असल्यामुळे ते मार्ग काढू शकले नाहीत, म्हणून ते छतावर चढले आणि घराच्या कौलातून त्यांनी त्याला अंथरुणासहित येशूंच्या पुढे गर्दीमध्ये खाली सोडले. 20 जेव्हा येशूंनी त्यांचा विश्वास पाहिला तेव्हा ते म्हणाले, “मित्रा, तुझ्या पापांची क्षमा झाली आहे.” 21 यावेळी परूशी व नियमशास्त्र शिक्षक आपसात विचार करू लागले, “दुर्भाषण करणारा हा कोण आहे? परमेश्वराशिवाय पापांची क्षमा कोण करू शकतो?” 22 ते काय विचार करीत होते हे येशूंनी ओळखले आणि त्यांना विचारले, “तुम्ही तुमच्या मनामध्ये या गोष्टींचा विचार का करता? 23 यातून कोणते म्हणणे सोपे आहे ‘तुझ्या पापांची क्षमा झाली आहे,’ किंवा ‘ऊठ आपली बाज उचलून चालू लाग?’ 24 तुम्हाला हे समजण्याची गरज आहे की मानवपुत्राला पृथ्वीवर पापांची क्षमा करण्याचा अधिकार आहे.” ते पक्षघाती मनुष्याला म्हणाले, “ऊठ, आपले अंथरूण उचल आणि घरी जा.” 25 त्याचवेळी तो त्यांच्यासमोर उभा राहिला आणि ज्या बिछान्यावर तो झोपत असे, ते घेऊन परमेश्वराची स्तुती करीत घरी गेला. 26 सर्व लोक चकित झाले आणि त्यांनी परमेश्वराची स्तुती केली. तेव्हा सर्वांना भय प्राप्त झाले व म्हणाले, “आज आम्ही अद्भुत गोष्टी पाहिल्या आहेत.” लेवीला पाचारण 27 नंतर येशू तिथून बाहेर गेले व जकातीच्या नाक्यावर एक जकातदार ज्याचे नाव लेवी होते तो त्यांच्या दृष्टीस पडला. येशू त्याला म्हणाले, “माझ्यामागे ये.” 28 तेव्हा लेवी उठला व सर्वकाही टाकून त्यांना अनुसरला. 29 नंतर लेवीने आपल्या घरी येशूंसाठी एक भव्य मेजवानी आयोजित केली. त्या ठिकाणी लेवीचे अनेक सहकारी जकातदार आणि इतर पाहुणे येशूंबरोबर भोजन करत होते. 30 तरी त्या पंथाचे परूशी आणि नियमशास्त्र शिक्षक यांनी शिष्यांजवळ तक्रार केली, “तुम्ही जकातदार व पापी लोकांबरोबर खाणे व पिणे का करता?” 31 येशूंनी त्यांना उत्तर दिले, “जे निरोगी आहेत त्यांना वैद्याची गरज नसते, परंतु रोग्यास असते. 32 मी नीतिमानांस नव्हे, तर पापी जनास पश्चात्तापासाठी बोलविण्यास आलो आहे.” येशूंना उपासासंबंधी प्रश्न विचारतात 33 ते येशूंना म्हणाले, “योहानाचे शिष्य वारंवार उपास व प्रार्थना करतात आणि परूश्यांचे शिष्य उपास करतात, परंतु तुमचे शिष्य मात्र खातात व पितात.” 34 यावर येशूंनी त्यांना विचारले, “वराचे मित्र त्यांच्याबरोबर वर असताना उपवास कसे करतील? 35 तरी अशी वेळ येत आहे, की त्यावेळी वर त्यांच्यापासून काढून घेण्यात येईल आणि मग ते उपास करतील.” 36 नंतर येशूंनी त्यांना एक दाखला सांगितला: ते म्हणाले, “नवीन कापडाचा तुकडा घेऊन जुन्या कापडाला ठिगळ म्हणून कोणीही लावत नाही. कारण ते ठिगळ वस्त्राला फाडील आणि छिद्र अधिक मोठे होईल. 37 कोणीही नवा द्राक्षारस जुन्या बुधल्यांमध्ये ओतीत नाही. नाही तर, नवीन द्राक्षारसामुळे बुधले फुटून जातील; द्राक्षारस वाहून जाईल आणि बुधल्यांचा नाश होईल. 38 तसे होऊ नये, म्हणून नवा द्राक्षारस नवीन बुधल्यांमध्ये ओततात. 39 जुना द्राक्षारस प्याल्यानंतर कोणालाही नवा द्राक्षारस घ्यावासा वाटत नाही. ते म्हणतात, ‘जुना द्राक्षारसच उत्तम आहे.’ ” |
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.
Biblica, Inc.