लेवीय 9 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्तीयाजकांच्या सेवेचा प्रारंभ 1 आठव्या दिवशी मोशेने अहरोन आणि त्याचे पुत्र व इस्राएलच्या पुढाऱ्यांना बोलाविले. 2 तो अहरोनाला म्हणाला, “तुझ्या पापार्पणासाठी व्यंग नसलेला एक गोर्हा व होमार्पणासाठी व्यंग नसलेला एक मेंढा घेऊन याहवेहसमोर अर्पण कर. 3 मग इस्राएली लोकांना सांग: तुम्ही तुमच्या पापार्पणासाठी एक बोकड व होमार्पणासाठी एक गोर्हा व एक कोकरू निवडून घ्यावे. ही दोन्ही एका वर्षांची असून व्यंग नसलेली असावीत, 4 आणि याहवेहसमोर शांत्यर्पणाचे बली म्हणून एक गोर्हा आणि एक मेंढा व अन्नार्पणासाठी तेल मिसळलेले अन्नबली आणावे. कारण याहवेह आज तुम्हाला दर्शन देणार आहेत.” 5 म्हणून मोशेने दिलेल्या आज्ञेप्रमाणे लोकांनी सभामंडपापुढे सर्वकाही आणले आणि संपूर्ण मंडळी याहवेहसमोर येऊन उभी राहिली. 6 तेव्हा मोशे म्हणाला, “हे करण्याची आज्ञा तुम्हाला याहवेहनी दिली आहे, जेणेकरून याहवेहचे गौरव तुम्हाला प्रकट व्हावे.” 7 मोशेने अहरोनाला सांगितले, “वेदीजवळ ये आणि तुझे पापार्पण आणि तुझे होमार्पण यांचे अर्पण कर आणि स्वतःसाठी आणि लोकांसाठी प्रायश्चित्त कर; लोकांसाठी बलीचे अर्पण कर आणि त्यांच्यासाठी प्रायश्चित्त कर, याहवेहने आज्ञा दिली त्याप्रमाणे ते कर.” 8 तेव्हा अहरोन वेदीजवळ गेला आणि त्याने स्वतःच्या पापासाठी गोर्ह्याचा वध केला. 9 मग अहरोनाचे पुत्र त्या गोर्ह्याचे रक्त घेऊन त्याच्याकडे आले आणि अहरोनाने आपले बोट रक्तात बुडवून ते वेदीच्या शिंगांना लावले; उर्वरित रक्त त्याने वेदीच्या पायथ्याशी ओतून दिले. 10 याहवेहनी मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणे अहरोनाने पापार्पणाची चरबी, गुरदे व काळजावरील चरबीचा पडदा यांचा वेदीवर होम केला. 11 कातडे व मांस मात्र त्याने वस्तीबाहेर नेऊन अग्नीत जाळले. 12 मग अहरोनाने स्वतःच्या होमबलीचा वध केला आणि त्या बलीचे रक्त त्याच्या पुत्रांनी त्याला सोपवून दिले व त्याने ते वेदीभोवती शिंपडले. 13 मग त्यांनी त्या होमबलीचे तुकडे केले व ते तुकडे शिरासह अहरोनाकडे दिले आणि अहरोनाने त्या प्रत्येक भागाचा वेदीवर होम केला. 14 त्याने आतडी व पाय धुऊन वेदीवरील होमार्पणासह त्यांचा होम केला. 15 मग लोकांनी आणलेली अर्पणे अहरोनाने अर्पण केली. लोकांसाठी पापार्पण म्हणून आणलेल्या पापबलीच्या बोकडाचा जसा वध केला, तसाच या बोकडाचाही वध केला. 16 नंतर त्याने होमार्पण आणले आणि सूचना दिल्याप्रमाणे त्याचे अर्पण केले. 17 मग त्याने सकाळच्या होमार्पणाबरोबर अन्नार्पणही सादर केले व त्यातील मूठभर धान्य वेदीवर जाळून टाकले. 18 यानंतर अहरोनाने लोकांच्या शांत्यर्पणाच्या गोर्ह्याचा आणि मेंढ्यांचा वध केला आणि त्याच्या पुत्रांनी त्याला रक्त सोपविले आणि त्याने ते वेदीच्या सभोवार शिंपडले. 19 परंतु त्याने गोर्ह्याची व मेंढ्याची चरबी, म्हणजे चरबीदार शेपूट, आतड्यांवरील चरबी, गुरदे आणि काळजावरील चरबीचा पडदा 20 त्या बलींच्या उरांवर ठेवली, मग अहरोनाने त्या सर्वांचा वेदीवर होम केला. 21 मोशेच्या आज्ञेप्रमाणे अहरोनाने ऊर व उजवी मांडी यांचे याहवेहसमोर ओवाळणीचे अर्पण केले. 22 मग अहरोनाने आपले हात लोकांकडे उभारून त्यांना आशीर्वाद दिला आणि जिथे त्याने पापार्पण, होमार्पण व शांत्यर्पण वाहिले होते तिथून उतरून तो खाली आला. 23 नंतर मोशे व अहरोन सभामंडपात गेले. ते परत बाहेर आले, तेव्हा त्यांनी लोकांना आशीर्वाद दिला आणि याहवेहचे वैभव सर्वांना प्रकट झाले. 24 याहवेहपासून अग्नी येऊन त्याने वेदीवरील होमार्पण व चरबीही भस्म केली. जेव्हा लोकांनी ते पाहिले तेव्हा त्यांनी मोठ्या आवाजाने जयजयकार केला आणि जमिनीवर लोटांगण घातले. |
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.
Biblica, Inc.