Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

लेवीय 8 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती


अहरोन आणि त्याच्या पुत्रांचा अभिषेक

1 याहवेह मोशेला म्हणाले,

2 “अहरोन आणि त्याच्या पुत्रांना, त्यांची वस्त्रे, अभिषेकाचे तेल, पापार्पणासाठी एक गोर्‍हा, दोन मेंढे आणि टोपलीभर बेखमीर भाकरी घेऊन ये,

3 आणि सर्व लोकांना सभामंडपाच्या प्रवेशद्वाराजवळ एकत्र कर.”

4 याहवेहने आज्ञा दिल्याप्रमाणे मोशेने केले आणि सर्व लोक सभामंडपाच्या प्रवेशद्वाराजवळ एकत्र जमले.

5 तेव्हा मोशेने सर्व लोकांना म्हटले, “याहवेहने जे करण्यास आज्ञा दिली आहे, ते हेच आहे.”

6 नंतर मोशेने अहरोन आणि त्याच्या पुत्रांना पुढे आणले आणि त्यांना पाण्याने आंघोळ घातली.

7 त्याने अहरोनास अंगरखा घातला, कंबरपट्टा कसला, झगा घातला, झग्यावर एफोद घातले, एफोदावर सुशोभित केलेला कमरबंद त्याच्या सभोवती बांधला.

8 नंतर त्याने अहरोनाला ऊरस्त्राण घातले व त्यात उरीम व थुम्मीम ठेवले.

9 नंतर त्याच्या डोक्यावर फेटा बांधला. त्या फेट्याच्या पुढील भागी सोन्याची एक पट्टी म्हणजे पवित्र मुद्रा जोडली, याहवेहने मोशेला आज्ञा दिल्यानुसार त्याने हे केले.

10 मग मोशेने अभिषेकाचे तेल घेऊन, निवासमंडप व त्यातील जे सर्वकाही होते, त्यांना अभिषेक करून ती पवित्र केली.

11 काही तेल त्याने वेदीवर सात वेळा शिंपडले; वेदी आणि त्यावरील सर्व उपकरणे, हात धुण्याचे भांडे व त्याची बैठक पवित्र करण्यासाठी त्याने ते तेल त्यांच्यावरही शिंपडले.

12 मग त्याने अभिषेकाचे थोडे तेल अहरोनाच्या डोक्यावर ओतून त्याला पवित्र केले.

13 मग मोशेने अहरोनाच्या पुत्रांना पुढे आणले, त्यांना झगे घातले, कमरपट्टे कसले व फेटे बांधले, याहवेहने मोशेला आज्ञा दिल्यानुसार त्याने हे केले.

14 मग मोशेने पापार्पणाच्या यज्ञबलीसाठी एक गोर्‍हा आणला आणि अहरोन व त्याच्या पुत्रांनी त्या गोर्‍ह्याच्या डोक्यावर आपले हात ठेवले.

15 मग मोशेने त्या गोर्‍ह्याचा वध केला आणि वेदी पवित्र करण्यासाठी त्या गोर्‍ह्याचे रक्त वेदी व तिची चारही शिंगे यांना आपल्या बोटांनी लावले. शिल्लक राहिलेले रक्त वेदीच्या पायथ्याशी ओतले. अशाप्रकारे वेदीसाठी प्रायश्चित्त करून त्याने वेदी पवित्र केली.

16 मोशेने आतड्यांवरील सर्व चरबी, काळजावरील लांब पाळ, दोन्ही गुरदे काढून घेऊन तिचे वेदीवर हवन केले.

17 याहवेहने आज्ञा दिल्याप्रमाणे मोशेने गोर्‍हा, त्याची कातडी, त्याचे मांस आणि आतडी छावणीबाहेर नेऊन जाळून टाकले.

18 नंतर त्याने होमार्पणासाठी एक मेंढा घेतला आणि अहरोन व त्याच्या पुत्रांनी त्याच्या डोक्यावर आपले हात ठेवले.

19 नंतर मोशेने त्याचा वध केला आणि त्या मेंढ्याचे रक्त वेदीभोवती शिंपडले.

20 मग मोशेने तो मेंढा कापून त्याचे तुकडे केले आणि त्या तुकड्यांसह डोके व चरबी यांचा होम केला.

21 त्याची आतडी व खूर पाण्याने धुऊन त्याने संपूर्ण मेंढ्याचे वेदीवर होम केले. हे होमार्पण आहे. ते सुवासिक असे, याहवेहसाठी सादर केलेले अन्नार्पण आहे, जसे याहवेहने मोशेला आज्ञा केली होती.

22 मग मोशेने दुसरा मेंढा, अर्थात् समर्पणाचा मेंढा घेतला व अहरोन व त्याच्या पुत्रांनी मेंढ्याच्या डोक्यावर आपले हात ठेवले.

23 मग मोशेने त्याचा वध केला व त्याचे काही रक्त घेऊन ते अहरोनाच्या उजव्या कानाच्या पाळीला व उजव्या हाताच्या व उजव्या पायाच्या अंगठ्यांना लावले.

24 नंतर मोशेने काही रक्त अहरोनाच्या पुत्रांच्या उजव्या कानाच्या पाळ्यांना व उजव्या हाताच्या आणि उजव्या पायाच्या अंगठ्यांना लावले. उर्वरित सर्व रक्त त्याने वेदीभोवती शिंपडले.

25 मग त्याने सर्व चरबी आणि चरबीदार शेपूट, आतड्यांवरील चरबी, चरबीसह दोन्ही गुरदे, काळजाची लांब पाळ व उजवी मांडी ही घेतली.

26 आणि बेखमीर भाकरीची टोपली, जी याहवेहसमोर होती त्यातून त्याने एक जाड भाकर, जैतुनाच्या तेलात मळलेली एक जाड भाकर आणि एक पातळ भाकर घेतली, आणि त्याने ते सर्व चरबीच्या भागावर आणि उजव्या मांडीवर ठेवले.

27 त्याने हे सर्व अहरोन व त्याच्या पुत्रांच्या हातांवर ठेवले आणि त्यांनी ते याहवेहसमोर हेलावणीचे अर्पण घेऊन त्याची ओवाळणी केली.

28 नंतर मोशेने ते सर्व त्यांच्या हातातून घेतले आणि ते वेदीवर होमार्पणासहित समर्पणाचे अर्पण म्हणून सादर केले, हा याहवेहला सुवास म्हणून अर्पिलेले अन्नार्पण होते.

29 मग मोशेने मेंढ्याच्या उराचा भाग घेतला, हा समर्पणाच्या गोर्‍ह्याचा त्याचा स्वतःचा वाटा होता, तो त्याने ओवाळणीचे अर्पण म्हणून याहवेहसमोर ओवाळले. याहवेहने दिलेल्या आज्ञेप्रमाणे मोशेने हे केले.

30 नंतर मोशेने अभिषेकाचे थोडे तेल व वेदीवरील थोडे रक्त घेऊन अहरोन व त्याच्या वस्त्रावर आणि त्याच्या पुत्रांवर व त्यांच्या वस्त्रांवर शिंपडले. अशारितीने मोशेने अहरोन व त्याचे पुत्र यांना याहवेहच्या सेवेसाठी पवित्र केले.

31 मग मोशे, अहरोन व त्याच्या पुत्रांना म्हणाला, “मी तुम्हाला आज्ञा दिली होती त्याप्रमाणे, सभामंडपाच्या प्रवेशद्वारात मांस शिजवा व ते मांस टोपलीतील समर्पित भाकरीसह खावे.

32 उरलेले मांस व भाकरी मात्र अग्नीत जाळून टाका.

33 मग सात दिवस पूर्ण होईपर्यंत तुम्ही सभामंडपाच्या द्वाराबाहेर जाऊ नका, कारण तुमचा समर्पणविधी सात दिवसाचा आहे.

34 आज जो विधी करण्यात आला तो तुमच्या प्रायश्चित्तासाठी याहवेहने दिलेल्या आज्ञेप्रमाणे करण्यात आला.

35 शिवाय, सात दिवस सभामंडपाच्या प्रवेशद्वाराजवळ रात्रंदिवस राहून, याहवेहने दिलेल्या आज्ञेचे पालन केल्याने तुम्ही मरणार नाही, कारण मला अशी आज्ञा देण्यात आली आहे.”

36 तेव्हा अहरोन आणि त्याच्या पुत्रांनी ते सर्वकाही केले जे करण्याची आज्ञा याहवेहनी मोशेद्वारे त्यांना दिली होती.

पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™

ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.

यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.

सर्व अधिकार जगभरात राखीव.

Holy Bible, Marathi Contemporary Version™

Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.

Used with permission.

All rights reserved worldwide.

Biblica, Inc.
Lean sinn:



Sanasan