लेवीय 18 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्तीबेकायदेशीर लैंगिक संबंध 1 याहवेह मोशेला म्हणाले, 2 “इस्राएली लोकांबरोबर बोल आणि त्यांना सांग: ‘मी याहवेह तुमचा परमेश्वर आहे. 3 तुम्ही ज्या इजिप्त देशात राहिलात त्यांच्यासारखे वागू नका आणि मी तुम्हाला जिथे नेत आहे, त्या कनान देशाचे लोक जे करतात ते करू नका. त्यांच्या रीतिरिवाजाचे पालन करू नका. 4 तुम्ही माझ्या नियमांचे पालन केलेच पाहिजे आणि काळजीपूर्वक माझ्या आज्ञांप्रमाणे वागले पाहिजे. मी याहवेह तुमचा परमेश्वर आहे. 5 तुम्ही माझ्या आज्ञा आणि नियमांचे पालन करा, कारण जो व्यक्ती त्यांचे पालन करतो, तो त्यामुळे जिवंत राहील. मी याहवेह आहे. 6 “ ‘तुमच्यापैकी कोणीही आपल्या जवळच्या नातलगाशी शारीरिक संबंध ठेऊ नये; मी याहवेह आहे. 7 “ ‘तुझ्या आईबरोबर शारीरिक संबंध ठेवून वडिलांचा अनादर करू नकोस. ती तुझी आई आहे; तिच्याशी संबंध ठेवू नकोस. 8 “ ‘तुझ्या वडिलांच्या पत्नीशी शारीरिक संबंध ठेवू नकोस; जे तुझ्या वडिलांचा अपमान करेल. 9 “ ‘तुझ्या बहिणीशी शारीरिक संबंध तू ठेवू नकोस, तुझ्या वडिलांची कन्या असो किंवा तुझ्या आईची कन्या, मग ती एकाच घरात जन्मली असेल किंवा इतरत्र. 10 “ ‘तू तुझ्या पुत्राच्या कन्येशी किंवा तुझ्या कन्येच्या कन्येशी शारीरिक संबंध ठेवू नकोस; त्यामुळे तुझा अपमान होईल. 11 “ ‘तुझ्या पित्याच्या पत्नीच्या कन्येशी शारीरिक संबंध ठेवू नकोस; ती तुझी बहीण आहे. 12 “ ‘तू तुझ्या पित्याच्या बहिणीशी शारीरिक संबंध ठेवू नकोस; ती तुझ्या पित्याची जवळची नातेवाईक आहे. 13 “ ‘तुझ्या मातेच्या बहिणीशी शारीरिक संबंध ठेवू नकोस, कारण ती तुझ्या आईची जवळची नातेवाईक आहे. 14 “ ‘आपल्या पित्याच्या भावाचा त्याच्या पत्नीसोबत शारीरिक संबंध ठेवून त्याचा अपमान करू नका; ती तुझी चुलती आहे. 15 “ ‘तू तुझ्या सूनेशी शारीरिक संबंध ठेवू नकोस. ती तुझ्या पुत्राची पत्नी होय; तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवू नकोस. 16 “ ‘तुझ्या भावाच्या पत्नीशी शारीरिक संबंध ठेऊ नकोस; हा तुझ्या भावाचा अपमान आहे. 17 “ ‘तू एखाद्या स्त्रीसोबत आणि तिच्या कन्येसोबत शारीरिक संबंध ठेऊ नकोस. तिच्या पुत्राच्या किंवा कन्येच्या कन्येशी तू शारीरिक संबंध ठेऊ नकोस, कारण ते तिचे जवळचे नातेवाईक आहेत; आणि असे करणे भयंकर पाप आहे. 18 “ ‘तुझी पत्नी जिवंत असताना तिची वैरीण म्हणून तिच्या बहिणीशी विवाह करू नकोस आणि तिच्याशी शारीरिक संबंध ठेवू नका. 19 “ ‘स्त्री ॠतुमती असताना तिच्या अशुद्धतेत तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवायला जाऊ नको. 20 “ ‘तू आपल्या शेजार्याच्या पत्नीशी शारीरिक संबंध ठेऊ नकोस आणि स्वतःला भ्रष्ट करू नकोस. 21 “ ‘तू आपल्या संतानांपैकी कोणालाही मोलख दैवतासाठी यज्ञबली म्हणून अर्पण करू नये, कारण असा यज्ञ केल्याने तुझ्या परमेश्वराच्या नावाचा अनादर होतो. मी याहवेह आहे. 22 “ ‘स्त्रीप्रमाणे पुरुषाने पुरुषाशी शारीरिक संबंध ठेऊ नये. ते ओंगळ कृत्य आहे. 23 “ ‘प्राण्याशी लैंगिक संबंध ठेवू नकोस आणि त्याद्वारे स्वतःला अशुद्ध करू नको. स्त्रीने प्राण्याशी लैंगिक संबंध ठेवण्यासाठी स्वतःला सादर करू नये; ती एक विकृती आहे. 24 “ ‘अशा प्रकारच्या कोणत्याही अमंगळ गोष्टी करून तुम्ही स्वतःला अपवित्र करून घेऊ नये, कारण ज्या राष्ट्रात मी तुम्हाला पाठवित आहे, ती राष्ट्रे या गोष्टींनी भ्रष्ट झाली आहेत. 25 भूमीसुद्धा भ्रष्ट झाली होती; म्हणून तिच्या पापाबद्दल मी तिला शिक्षा केली आहे, भूमीने तेथील रहिवाशांना देशाबाहेर ओकारीसारखे फेकून दिले आहे. 26 म्हणून तुम्ही माझे नियम व विधी पाळा आणि वर उल्लेख केलेल्या कोणत्याही ओंगळ गोष्टी करू नका. हे नियम इस्राएली लोकांना व तुमच्यात राहत असलेल्या विदेशी लोकांनाही लागू आहेत, 27 ज्या देशात मी तुम्हाला घेऊन जात आहे, त्या देशातील रहिवाशांनी अशा ओंगळ गोष्टी सतत केल्या म्हणून तो देश भ्रष्ट झाला. 28 जर तुम्ही ही भूमी भ्रष्ट कराल, तर ती तुम्हाला ओकून टाकेल, जसे तुमच्या पूर्वी असलेल्या राष्ट्रांना तिने ओकून टाकले होते. 29 “ ‘या ओंगळ कृत्यांपैकी एकदेखील कृत्य जो करेल, त्याला या राष्ट्रातून बहिष्कृत केले जाईल. 30 म्हणून तुम्ही जात आहात, तेथील लोकांच्या ओंगळ कृत्यांचे अनुकरण करून तुम्ही स्वतःस भ्रष्ट करून घेऊ नये; मी याहवेह तुमचा परमेश्वर आहे.’ ” |
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.
Biblica, Inc.