विलापगीत 2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 प्रभूने सीयोनकन्येला आपल्या क्रोधरूपी मेघाने कसे आच्छादून टाकले आहे! त्यांनी इस्राएलचे वैभव स्वर्गातून पृथ्वीवर खाली धुळीत फेकले आहे; क्रोधाच्या दिवशी त्यांनी आपल्या पादासनाचेही स्मरण केले नाही. 2 प्रभूने कसलीच दयामाया न दाखविता याकोबाच्या सर्व आवासांना गिळंकृत केले आहे; त्यांच्या क्रोधाग्नीने यहूदाह कन्येच्या तटबंदीची प्रत्येक भिंत पाडून टाकली आहे. तिचे राज्य व तिचे अधिपती या सर्वांना अपमानित करून त्यांनी जमीनदोस्त केले आहे. 3 त्यांच्या क्रोधात त्यांनी इस्राएलचे प्रत्येक शिंग नष्ट केले आहे. शत्रूने हल्ला केला तेव्हा त्यांनी त्यांचा संरक्षण करणारा उजवा हात काढून घेतला आहे. पेटलेल्या अग्नीप्रमाणे त्यांनी याकोबाभोवती असलेले सर्वकाही भस्म करून टाकले आहे. 4 शत्रूसारखे त्यांनी धनुष्य वाकविले आहे; त्यांचा उजवा हात सज्ज झाला आहे. शत्रूसारखे त्यांनी नयनरम्य तरुणांचा संहार केला आहे. त्यांनी त्यांच्या क्रोधाग्नीचा सीयोन कन्येच्या तंबूवर वर्षाव केला आहे. 5 प्रभू शत्रूसारखे झाले आहेत; त्यांनी इस्राएलला गिळंकृत केले आहे. त्यांनी तिचे सर्व राजवाडे गिळंकृत केले आहेत आणि दुर्ग उद्ध्वस्त केले आहेत. यहूदीया कन्येचा शोक व विलाप त्यांनी बहुगुणित केला आहे. 6 बागेसारख्या आवासांना त्यांनी उकिरड्यागत केले आहे; त्यांच्या भेटण्याचे स्थान नष्ट केले आहे. याहवेहने सीयोनला तिच्या सर्व निर्धारित उत्सव व शब्बाथाचे विस्मरण केले आहे; राजे व याजक या दोघांना त्यांनी क्रोधित तिरस्काराने नाकारले आहे. 7 प्रभूने आपल्या वेदीस नाकारले आहे आणि त्यांच्या पवित्रस्थानाचा त्याग केला आहे. त्यांनी तिच्या राजवाड्यांच्या भिंती तिच्या शत्रूंच्या हातात दिल्या आहेत; एका निर्धारित उत्सवाच्या दिवसात करण्याचा जयघोष याहवेहच्या भवनात त्यांच्या शत्रूंनी केला आहे. 8 सीयोन कन्येच्या भिंतींना धराशायी करण्याचा याहवेहने निर्धार केला आहे. त्यांनी मापक दोरी ताणली आहे विनाश करण्यास आपला हात रोखला नाही. त्यांनी संरक्षक भिंत व तटबंदीस विलाप करण्यास लावले ते एकत्रच ढासळून पडले. 9 तिच्या वेशी जमिनीत धसल्या आहेत; त्यांच्या सळया मोडून नष्ट झाल्या आहेत. तिचे राजे आणि अधिपती इतर देशात बंदिवासात गेले आहेत, तिथे नियमशास्त्र राहिले नाही, आणि तेथील संदेष्ट्यांना आता याहवेहकडून दृष्टान्तही मिळत नाहीत. 10 सीयोनकन्येचे वडीलजन मूकपणे जमिनीवर बसले आहेत; त्यांनी मस्तकांवर धूळ शिंपडून घेतली आहे आणि त्यांनी गोणपाट नेसले आहे. यरुशलेमच्या तरुणींनी माना खाली घातल्या आहेत. 11 माझे डोळे आता रडून थकले आहेत, मला आतून उत्कट यातना होत आहेत; माझे अंतःकरण जणू भूमीवर ओतले जात आहे कारण माझ्या लोकांचा सर्वनाश झाला आहे, कारण लहान मुले व तान्ही बाळे नगराच्या रस्त्यांवर मूर्छित होऊन पडत आहेत. 12 ते त्यांच्या मातांना विचारत आहेत, “द्राक्षारस व धान्य कुठे आहे?” ते नगराच्या रस्त्यांवर घायाळ झालेल्याप्रमाणे बेशुद्ध होऊन पडत आहेत, त्यांच्या मातांच्या बाहूत या मुलांचे प्राण हळूहळू निघून जात आहेत. 13 हे यरुशलेमकन्ये, सर्व जगात असले दुःख मी तुला काय म्हणू? मी तुझी तुलना कशाशी करू? मी तुला कोणा समान लेखू? जेणेकरून मी तुझे सांत्वन करू शकेन? हे सीयोनच्या कुमारी कन्ये? तुझा घाव सागराएवढा खोल आहे. तुला कोण बरे करू शकेल? 14 तुझ्या संदेष्ट्यांनी सांगितलेले दृष्टान्त खोटे व व्यर्थ होते; तुला बंदिवासात पडण्यापासून वाचविण्याकरिता तुझी पापे उघडकीस आणली नाहीत. त्यांनी तुला दिलेले संदेश खोटे व दिशाभूल करणारे होते. 15 वाटेने जाणारे सर्व वाटसरू तुझी स्थिती बघून टाळ्या वाजवित होते; यरुशलेमकन्ये. तुझा उपहास करून डोकी हालवून ते म्हणतात, “सौंदर्याची परिपूर्णता, संपूर्ण पृथ्वीचा आनंद असे संबोधली जाणारी नगरी ती हीच आहे का?” 16 तुझ्या सर्व शत्रूंनी तुझ्याविरुद्ध त्यांचे मुख मोठे रुंद उघडले आहे; दात खाऊन रागाने फुत्कार टाकीत ते म्हणतात, “आपण अखेरीस तिला गिळंकृत केले. या दिवसाची आम्ही किती वाट पाहत होतो; ते बघण्यास आपण जिवंत आहोत.” 17 याहवेहने योजल्यानुसार केले आहे; त्यांनी त्यांचे वचन पूर्ण केले, जे संकल्प त्यांनी फार पूर्वी जाहीर केले होते. त्यांनी दयामाया न दाखविता तुम्हाला जमीनदोस्त केले आहे, तुमची स्थिती बघून तुमच्या शत्रूचे समाधान केले आहे, त्यांनी तुमच्या शत्रूंचे शिंग उंचावले आहे. 18 लोकांची अंतःकरणे. प्रभूकडे विलाप करतात. सीयोन कन्येच्या तटांनो, स्वतःला विसावा न देता, तुमचे डोळे आराम न करता एखाद्या नदीप्रमाणे तुमचे अश्रू रात्रंदिवस वाहोत. 19 उठा, रात्री धावा करा, जसा रात्रीचा प्रहर सुरू होतो; त्यांच्यापुढे आपले हात उंचावून, प्रत्येक रस्त्याच्या कोपऱ्यावर भुकेने व्याकूळ होऊन बेशुद्ध पडणार्या तुमच्या मुलांच्या जीवनासाठी विनवण्या करा. प्रभूच्या समक्षतेत आपली अंतःकरणे पाण्यासारखी ओता. 20 याहवेह, बघा व विचार करा: तुम्ही कधी तरी कोणालाही असे वागविले आहे का? ज्या मातांनी आपल्या मुलांचे संगोपन केले, त्या मातांनी ही आपली पोटची फळे खावीत काय? प्रभूच्या मंदिरातच त्यांचे याजक आणि संदेष्ट्यांचा संहार व्हावा काय? 21 पाहा वृद्ध व तरुण एकत्र रस्त्यांवरील धुळीत पडली आहेत; माझे तरुण व तरुणी शत्रूंच्या तलवारींनी ठार होऊन मरून पडली आहेत. तुमच्या क्रोधाच्या दिवशी तुम्ही त्यांचा संहार केला; कसलीच दयामाया न दाखविता तुम्ही त्यांचा वध केला. 22 “सणासाठी आमंत्रित केल्याप्रमाणे, तुम्ही माझ्याविरुद्ध संकटांना सर्व बाजूंनी बोलाविले. याहवेहच्या क्रोधाच्या दिवशी एकही मनुष्य निसटला नाही किंवा जिवंत राहिला नाही. ज्यांचे मी संगोपन केले आणि वाढविले, त्या सर्वांचा माझ्या शत्रूकडून नाश झाला आहे.” |
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.
Biblica, Inc.