Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

यहूदा 1 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 येशू ख्रिस्ताचा सेवक आणि याकोबाचा बंधू यहूदाह याजकडून, जे पाचारलेले, परमेश्वर पित्याच्या प्रीतीस पात्र आणि येशू ख्रिस्तामध्ये राखलेले आहेत त्यास,

2 दया, शांती आणि प्रीती तुम्हाला अधिकाधिक प्राप्त होवो.


परमेश्वरहीन लोकांचे पाप व त्यांचा नाश

3 प्रिय बंधूंनो, आपणा सर्वास मिळालेल्या सामाईक तारणाबद्दल मी तुम्हाला लिहिण्यास उत्सुक होतो, परंतु मला तुम्हाला लिहिण्याचे आणि विनंती करण्याचे अगत्य वाटले की जो विश्वास परमेश्वराच्या पवित्र लोकांना एकदाचाच सोपवून दिला होता, तो राखण्याविषयी तुम्ही झटावे.

4 ज्यांच्यासाठी दंडाज्ञा फार पूर्वीच लिहून ठेवलेली होती असे काही लोक गुप्तपणे तुमच्यामध्ये आत शिरले आहेत. हे अनीतिमान लोक, परमेश्वराची कृपा विकृत करून तिला अनैतिकतेचे स्वरूप देतात आणि येशू ख्रिस्त आपल्या एकाच सार्वभौम प्रभूला नाकारतात.

5 जरी हे सर्व तुम्हाला आधी माहीत आहे, तरी तुम्हाला आठवण करून देतो की प्रभूने त्यांच्या लोकांना इजिप्तमधून सोडविले, परंतु नंतर त्यांच्यावर विश्वास न ठेवणार्‍यांचा त्यांनी नाश केला.

6 आणि ज्या दूतांनी आपल्या अधिकारांचे पद न राखता आपले योग्य स्थान सोडले त्यांना त्यांनी अंधकारात, अनंतकाळच्या बंधनात मोठ्या न्यायाच्या दिवसासाठी राखून ठेवले आहे.

7 त्याच प्रकारे सदोम आणि गमोरा आणि शेजारच्या गावांनी स्वतःच्या देहाला लैंगिक व्यभिचार आणि भ्रष्टतेमध्ये वाहवून घेतले. त्यांना अनंतकाळाच्या अग्नीची शिक्षा सहन करावी म्हणून उदाहरणादाखल पुढे ठेवले आहे.

8 अगदी त्याच प्रकारे, हे अनीतिमान लोक आपल्या स्वप्नाच्या जोरावर, स्वतःचे शरीर विटाळवितात, अधिकार नाकारतात आणि स्वर्गीय प्राणिमात्रांची निंदा करतात.

9 परंतु प्रमुख देवदूत मिखाएल, जेव्हा मोशेच्या शरीरावरून सैतानाशी वादविवाद करीत असताना स्वतः त्याचा निंदासहित न्याय करण्याचे धैर्य त्याने केले नाही परंतु एवढेच म्हणाला, “प्रभू तुला धमकावो!”

10 तरी हे लोक जे काही त्यांना समजत नाही त्याची निंदा करतात आणि ज्यागोष्टी त्यांना उपजत स्वभावाने समजतात—जसे अविवेकी प्राणी करतात—त्यायोगे ते नाश करून घेतील.

11 त्यांना धिक्कार असो! त्यांनी काईनाचा मार्ग स्वीकारला आणि लाभासाठी बलामाच्या अयोग्य मार्गात त्वरेने पदार्पण केले; कोरहाच्या बंडात त्यांनी स्वतःचा नाश करून घेतला.

12 हे लोक प्रीती भोजनात डाग, लपलेले खडक असून तुमच्याबरोबर जेवतात—केवळ स्वतःचे पोट भरणारे मेंढपाळ. ते निर्जल मेघासारखे वार्‍याने उडून जाणारे; शरद ऋतूत फळ न देणारे, दोनदा मेलेले आणि उपटलेल्या झाडांसारखे आहेत.

13 ते समुद्राच्या लज्जास्पद फेस आणणार्‍या बेबंद लाटेसारखे; भटकलेल्या तार्‍यांसारखे, ज्यांच्यासाठी सर्वकाळचा काळाकुट्ट अंधार राखून ठेवलेला आहे.

14 आदामानंतर सातव्या पिढीचा मनुष्य हनोखाने त्यांच्याबद्दल भविष्यवाणी केली: “पाहा, प्रभू आपल्या हजारो आणि हजारो पवित्र जणांसह येत आहेत

15 सर्वांचा न्याय करण्यासाठी आणि जे सर्व अनीतिमान कृत्ये त्यांनी अनीतीमध्ये केली आणि अनीतिमान पाप्यांनी त्यांच्याविरुद्ध जे सर्व विद्रोही शब्द बोलले त्या सर्वांना तो दोषी ठरवेल.”

16 हे लोक कुरकुर करणारे आणि दोष शोधणारे आहेत; वाईट वासनांच्या मागे लागणारे, स्वतःची बढाई मारणारे आणि स्वतःच्या लाभासाठी इतरांची खुशामत करणारे आहेत.


टिकून राहण्यास आवाहन

17 परंतु, प्रिय मित्रांनो, आपल्या प्रभू येशू ख्रिस्तांच्या प्रेषितांनी तुम्हाला जे पूर्वी सांगितले, त्याची आठवण ठेवा.

18 त्यांनी तुम्हाला सांगितले, “शेवटच्या दिवसात निंदा करणारे स्वतःच्या अनीतिमान वासनांच्या मागे लागतील.”

19 हे लोक तुमच्यामध्ये फूट पाडणारे, उपजत स्वभावाने वागणारे आणि पवित्र आत्मा नसलेले आहेत.

20 परंतु तुम्ही, प्रिय मित्रांनो, स्वतःला परमपवित्र विश्वासाच्या पायावर बांधा आणि पवित्र आत्म्याद्वारे प्रार्थना करा.

21 आपला प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला त्यांच्या कृपेने ज्या अनंतकाळच्या जीवनात नेणार आहेत त्याची वाट पाहत असताना आपणास परमेश्वराच्या प्रीतीमध्ये राखा.

22 जे संशय धरतात त्यांच्यावर दया करा;

23 काहींना अग्नीतून ओढून काढा आणि वाचवा; आणि इतरांना भीतिमिश्रीत दया दाखवून कलंकित देहामुळे डागाळलेल्या वस्त्रांचाही द्वेष करा.


ईशस्तवन

24 आता जे तुम्हाला अडखळण्यापासून राखण्यास आणि त्यांच्या गौरवी समक्षतेत दोषरहित आणि अति आनंदात प्रस्तुत करण्यास समर्थ आहेत—

25 जे आपले तारणारे एकच परमेश्वर आहेत त्यांना येशू ख्रिस्त आपले प्रभू यांच्याद्वारे गौरव, वैभव, राज्य आणि अधिकार, युगारंभापूर्वी पासून आता आणि सदासर्वकाळ असो आमेन.

पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™

ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.

यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.

सर्व अधिकार जगभरात राखीव.

Holy Bible, Marathi Contemporary Version™

Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.

Used with permission.

All rights reserved worldwide.

Biblica, Inc.
Lean sinn:



Sanasan