Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

यहोशवा 1 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती


पुढारी म्हणून यहोशुआची नेमणूक

1 याहवेहचा सेवक मोशेच्या मृत्यूनंतर, मोशेचा मदतनीस, नूनाचा पुत्र यहोशुआला याहवेह म्हणाले:

2 “माझा सेवक मोशे मरण पावला आहे, तर आता तू आणि हे सर्व लोक यार्देन नदी ओलांडून त्या देशात जाण्यास तयार व्हा, जो मी त्यांना, म्हणजे इस्राएली लोकांना देत आहे.

3 मी मोशेला दिलेल्या वचनानुसार जिथे तुम्ही तुमचे पाऊल ठेवाल ते प्रत्येक ठिकाण मी तुम्हाला देईन.

4 तुमची सीमा वाळवंटापासून लबानोन पर्यंत आणि महान नदी फरातपासून, सर्व हिथी देश, ते पश्चिमेकडे भूमध्य समुद्रापर्यंत असेल.

5 तुमच्या आयुष्यातील सर्व दिवस तुम्हाला कोणीही विरोध करू शकणार नाही, कारण मी जसा मोशेबरोबर होतो तसाच तुझ्याबरोबरही असेन; मी तुला कधीही सोडणार नाही किंवा टाकणार नाही.

6 खंबीर हो आणि हिंमत धर, कारण जो देश या लोकांच्या पूर्वजांना वारसा म्हणून देण्याची मी शपथ वाहिली त्या देशात नेण्यासाठी तू त्यांचे नेतृत्व करशील.

7 “मात्र तू खंबीर हो आणि फार धैर्यवान हो. माझा सेवक मोशेने तुम्हाला दिलेले सर्व नियम पाळण्याची काळजी घे; त्यापासून उजवीकडे किंवा डावीकडे वळू नको, म्हणजे जिथे तू जाशील तिथे तू यशस्वी होशील.

8 शास्त्रग्रंथातील हे नियम नेहमी तुझ्या मुखात असू दे; दिवसा आणि रात्री त्यांचे मनन कर, त्यात लिहिलेल्या सर्व गोष्टींचे काळजीपूर्वक पालन करशील, तर तुझी भरभराट होईल आणि तू यशस्वी होशील.

9 मी तुला आज्ञापिले नाही का? खंबीर हो आणि धैर्यवान हो. भिऊ नको; निराश होऊ नको, कारण तू जिथे जाशील तिथे याहवेह तुझे परमेश्वर तुझ्याबरोबर असतील.”

10 तेव्हा यहोशुआने तेथील लोकांच्या अधिकार्‍यांना हुकूम दिला:

11 “छावणीमधून जा आणि लोकांना सांगा, ‘तुमची अन्नसामुग्री तयार ठेवा. आतापासून तीन दिवसात तुम्ही येथून यार्देन नदी पार करून जाल आणि याहवेह तुमचे परमेश्वर तुम्हाला जो देश देत आहेत, त्याचा ताबा घ्याल.’ ”

12 परंतु रऊबेन आणि गाद आणि मनश्शेहच्या अर्ध्या गोत्राला यहोशुआ म्हणाला,

13 “याहवेहचा सेवक मोशेने दिलेल्या आज्ञेची आठवण ठेवा, नंतर तो म्हणाला, ‘तुम्हाला विश्रांती मिळावी म्हणून याहवेह तुमचे परमेश्वर हा प्रदेश तुम्हाला देतील.’

14 तुमच्या स्त्रिया, तुमची लेकरे आणि गुरे मोशेने तुम्हाला यार्देनेच्या पूर्वेकडे दिलेल्या प्रदेशात राहू शकतील, परंतु युद्धासाठी तयार असलेले तुमचे सर्व योद्धे इस्राएली लोकांच्या पुढे नदी पार करून जातील. तुम्ही त्यांना मदत करावी.

15 याहवेहने जशी तुम्हाला विश्रांती दिली आहे तशीच त्यांनाही देईपर्यंत आणि याहवेह तुमचे परमेश्वर त्यांना जो प्रदेश देत आहेत, त्याचा ताबा घेईपर्यंत तुम्ही त्यांची मदत करावी. त्यानंतर तुम्ही परत जाऊ शकता आणि जो यार्देनेच्या पूर्वेकडील प्रदेश याहवेहचा सेवक मोशेने तुम्हास दिला आहे, त्या स्वतःच्या प्रदेशात तुम्ही वास्तव्य करू शकता.”

16 तेव्हा ते यहोशुआला म्हणाले, “जी आज्ञा तू आम्हाला दिली आहेस त्याप्रमाणे आम्ही करू आणि जिथे कुठे तू आम्हाला पाठवशील तिथे आम्ही जाऊ.

17 जसे आम्ही मोशेच्या आज्ञांचे पूर्णपणे पालन केले, तसेच आम्ही तुझ्या आज्ञांचे पालन करू. फक्त एवढेच की तुझे परमेश्वर याहवेह तुझ्याबरोबर असावे जसे ते मोशेबरोबर होते.

18 जो कोणी तुझ्या शब्दाविरुद्ध बंड करेल आणि त्याचे पालन करणार नाही, त्याला मरणदंड दिला जाईल. फक्त खंबीर हो आणि धैर्यवान हो!”

पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™

ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.

यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.

सर्व अधिकार जगभरात राखीव.

Holy Bible, Marathi Contemporary Version™

Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.

Used with permission.

All rights reserved worldwide.

Biblica, Inc.
Lean sinn:



Sanasan