Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

योना 1 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती


योनाह याहवेहपासून पळून जातो

1 याहवेहचे वचन अमित्तयाचा पुत्र योनाहकडे आले:

2 “महान शहर निनवेहस जा आणि त्याविरुद्ध संदेश दे, कारण त्यांची दुष्टाई माझ्यासमोर आली आहे.”

3 परंतु योनाह याहवेहपासून पळाला आणि तार्शीशला गेला. तो पुढे खाली याफो येथे गेला, तिथे त्याला त्या बंदरात बांधलेले एक जहाज सापडले. भाडे दिल्यानंतर, तो जहाजावर चढला आणि याहवेहपासून पळून जाण्यासाठी तार्शीशकडे जहाजाचा प्रवास प्रारंभ गेला.

4 मग याहवेहने समुद्रावर एक प्रचंड वारा सोडला आणि इतके भयंकर वादळ उठले की जहाज फुटण्याचे भय उद्भवले.

5 सर्व खलाशी घाबरले आणि प्रत्येकजण आपआपल्या दैवतांचा धावा करू लागला. आणि जहाजाचा भार कमी व्हावा म्हणून त्यांनी जहाजात भरलेले साहित्य समुद्रात टाकण्यास सुरुवात केली. पण योनाह मात्र जहाजाच्या तळघरात अगदी गाढ झोपला होता.

6 तेव्हा जहाजाचा कप्तान खाली तळघरात त्याच्याकडे गेला आणि म्हणाला, “अशा वेळी तू कसा झोपू शकतोस? चल, ऊठ आणि तुझ्या दैवताला हाक मार आणि ते आपल्याकडे लक्ष देतील व कृपा करतील म्हणजे आपला नाश होणार नाही.”

7 तेव्हा खलाशी एकमेकांना म्हणाले, “आपण चिठ्ठ्या टाकून कोणामुळे हे संकट आले आहे ते शोधू या.” मग त्यांनी चिठ्ठ्या टाकल्या आणि योनाहच्या नावाने चिठ्ठी निघाली.

8 यावर त्यांनी योनाहला विचारले, “आम्हाला सांग, आमच्यावर हे संकट कोणामुळे आले आहे? तू काय काम करतो? तू कुठे राहतो? तुझा देश कोणता? तू कोणत्या लोकांपैकी आहेस?”

9 योनाहने त्यांना उत्तर दिले, “मी एक इब्री आहे आणि मी स्वर्गातील याहवेह परमेश्वराची उपासना करतो, ज्यांनी समुद्र आणि कोरडी जमीन निर्माण केली.”

10 हे ऐकून ते घाबरले आणि योनाहला म्हणाले, “तू हे काय केलेस?” (कारण योनाहने त्यांना सांगितले होते की तो याहवेहच्या उपस्थितीतून पळून जात आहे.)

11 मग त्यांनी योनाहला विचारले, “आम्ही तुझ्यासोबत काय करावे जेणेकरून समुद्र आमच्यासाठी शांत होईल?” कारण समुद्र तर अधिकाधिक उग्र होत होता.

12 तेव्हा त्याने त्यांना उत्तर दिले, “मला समुद्रात फेकून द्या, म्हणजे समुद्र पुन्हा शांत होईल. कारण माझ्या चुकीमुळेच हे भयंकर वादळ तुमच्यावर आले आहे, हे मला ठाऊक आहे.”

13 तरीही खलाश्यांनी जहाज किनाऱ्यावर नेण्याचा आटोकाट प्रयत्न केला. पण ते यशस्वी झाले नाहीत, कारण समुद्र पूर्वीपेक्षा जास्त उग्र होत होता.

14 मग ते मोठ्या आवाजात याहवेहचा धावा करत म्हणाले, “याहवेह, कृपया या मनुष्याचा जीव घेतल्याने आमचा नाश होऊ देऊ नका. एका निरपराध व्यक्तीला मारल्याबद्दल आम्हाला दोष देऊ नका, कारण तुम्हाला जे आवडले ते तुम्ही केले आहे.”

15 मग त्यांनी योनाहला उचलले आणि जहाजावरून समुद्रात फेकून दिले, आणि उग्र समुद्र तत्काळ शांत झाला!

16 यामुळे त्या लोकांना याहवेहची भीती वाटली आणि त्यांनी याहवेहला यज्ञ केला आणि नवस केला.


योनाहची प्रार्थना

17 याहवेहने एक मोठा मासा नेमला ज्याने योनाहला गिळंकृत केले आणि योनाह त्या माशाच्या पोटात तीन दिवस आणि तीन रात्री राहिला.

पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™

ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.

यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.

सर्व अधिकार जगभरात राखीव.

Holy Bible, Marathi Contemporary Version™

Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.

Used with permission.

All rights reserved worldwide.

Biblica, Inc.
Lean sinn:



Sanasan