Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

योएल 2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती


टोळांचे सैन्य

1 सीयोनात कर्णा वाजवा; माझ्या पवित्र पर्वतावर धोक्याची घंटा वाजवा. देशात राहणार्‍या प्रत्येकाचा भीतीने थरकाप होवो, कारण याहवेहचा दिवस येत आहे. तो अगदी हाताशी आहे—

2 तो दिवस अंधाराचा व औदासिन्याचा, मेघांचा व दाट काळोखाचा दिवस. जसे डोंगरावर विस्तारलेल्या पहाटेसारखा आहे तसे विशाल व बलवान सैन्य चालून येत आहे, यापूर्वी असे कधी झाले नव्हते, नंतरही अनेक पिढ्या पुन्हा कधीच होणार नाही.

3 त्यांच्यापुढे अग्नी विनाश करीत आहे, त्यांच्यामागे ज्वाला पेटली आहे. त्यांच्यापुढील प्रदेश एदेन बागेसारखा आहे, त्यांच्यामागील प्रदेश ओसाड वाळवंट आहे— त्यांच्या तावडीतून काहीच वाचू शकत नाही.

4 त्यांचे स्वरूप घोड्यांप्रमाणेच आहेत; आणि घोडेस्वारा प्रमाणे ते जोरात धावतात.

5 रथांच्या आवाजाप्रमाणे, पर्वताच्या माथ्यांवर ते उड्या मारतात, भुसा भस्म करणार्‍या अग्नीप्रमाणे, युद्धासाठी सज्ज झालेल्या पराक्रमी सैन्याप्रमाणे आहे.

6 त्यांच्यासमोर राष्ट्रे भयभीत होतात; हे प्रत्येक चेहरा फिका पडतो.

7 वीरांप्रमाणे ते हल्ला करतात; सैनिकांप्रमाणे ते तटाच्या भिंती चढतात. आपल्या रांगा न मोडता ते सरळ आगेकूच करतात.

8 ते एकमेकांना धक्काबुक्की करीत नाहीत; प्रत्येकजण सरळ पुढे जातो. समोर शस्त्रे असताना ते जखमी न होता रांग न मोडता त्यातून पार जातात.

9 शहराकडे ते धाव घेतात; ते तटाच्या भिंतीवर धावतात; ते चढून घरात शिरतात, जणू काही खिडक्यांतून प्रवेश करणारे चोरच!

10 पृथ्वी त्यांच्यापुढे कापते आणि आकाशे थरथरतात, सूर्य आणि चंद्र काळवंडतात, आणि तारे चमकणे सोडून देतात.

11 याहवेह आपल्या सैन्यापुढे गर्जना करीत चालतात; त्यांचे सैन्य असंख्य आहेत, आणि त्यांची आज्ञा मानणारे बलवान सैन्य आहे. याहवेहचा दिवस महान आहे; अति भयंकर दिवस आहे. त्यास कोण सहन करू शकेल?


अंतःकरणे भग्न करण्यासाठी आव्हान

12 तरी आताही याहवेह म्हणतात, तुम्ही आपल्या संपूर्ण अंतःकरणाने, उपास, आक्रंदन व शोक करीत मजकडे परत या.

13 तुमची वस्त्रे फाडून नव्हे, तर तुमचे अंतःकरण फाडा. याहवेह तुमच्या परमेश्वराकडे परत या, कारण ते कृपाळू व दयाळू आहेत. ते मंदक्रोध आणि अधिक प्रीती करणारे आहेत, आणि ते विपत्तीविषयी अनुताप करतात.

14 कोण जाणो? याहवेह तुमचे परमेश्वर वळतील व अनुताप करतील आणि तुमच्यासाठी एक आशीर्वाद सोडतील— मग याहवेह तुमच्या परमेश्वराला तुम्ही धान्यार्पण व पेयार्पण करू शकाल.

15 सीयोनात कर्णा वाजवा! पवित्र उपास घोषित करा पवित्र सभा बोलवा.

16 लोकांना एकत्र करा, सभेला पवित्र करा; वडिलजनांना एकत्र आणा, बालकांना आणि स्तनपान करणार्‍या अर्भकांना देखील एकत्र आणा. वराला त्याच्या निवासस्थानातून आणि वधूला तिच्या खोलीतून बोलवा.

17 याहवेहसमोर सेवा करणार्‍या याजकांनी, द्वारमंडप आणि वेदी यांच्यामध्ये रडत उभे राहावे. आणि त्यांनी असे म्हणावे, “हे याहवेह, तुमच्या लोकांना वाचवा, आपल्या वतनाला राष्ट्रांमध्ये अप्रतिष्ठा किंवा चेष्टेचे कारण होऊ देऊ नका. ‘त्यांचा परमेश्वर कुठे आहे?’ असे त्यांनी लोकांमध्ये का म्हणावे.”


याहवेहचे उत्तर

18 मग याहवेहने आपल्या देशासाठी ईर्ष्या धरली, आणि ते आपल्या लोकांवर दया करतील.

19 याहवेहने त्यांना उत्तर दिले: “मी तुम्हाला धान्य, नवा द्राक्षारस व जैतून तेल पाठवित आहे, जे तुम्हाला तृप्त करण्यास भरपूर आहे; पुन्हा कधीही मी तुम्हाला राष्ट्रांमध्ये उपहासाचा विषय होऊ देणार नाही.

20 “मी उत्तरेकडील उपद्रवी टोळीस काढून त्यांना तुझ्यापासून दूर नेईन; मी त्यांना होरपळून निघालेला ओसाड प्रदेशात ढकलून देईन; त्याची पूर्वेचा रांग मृत समुद्रात बुडवेन व पश्चिमी रांग भूमध्य समुद्रात बुडवेन. आणि मग त्यांचा दुर्गंध वर जाईल; त्यांचा दर्प वाढत जाईल.” निश्चितच याहवेहने महान कार्य केले आहे!

21 हे यहूदीय देशा, भिऊ नको; आनंद व उल्हास करा, निश्चितच याहवेहने महान कार्य केले आहेत!

22 वन्य पशूंनो तुम्ही घाबरू नका, कारण रानातील कुरणे हिरवीगार होत आहेत. झाडे आपली फळे देत आहेत; अंजिराची झाडे आणि द्राक्षवेली पुन्हा आपले सत्व देत आहेत.

23 सीयोनच्या लोकांनो, आनंद करा; तुमच्या याहवेहच्या ठायी आनंद करा, कारण त्यांनी शरदॠतूतील पाऊस दिला आहे कारण ते विश्वासयोग्य आहेत. परमेश्वर तुमच्यासाठी विपुल वृष्टी करतात, शरदॠतूतील आणि वसंतॠतूतील भरपूर पाऊस पाहिल्याप्रमाणे दिला आहे.

24 खळी पुन्हा गव्हाच्या उंच राशींनी भरून जातील; आणि कुंडे तेलाने आणि द्राक्षारसाने ओसंडून वाहू लागतील.

25 “मोठे टोळ व तरुण टोळ इतर टोळ व टोळांचे थवे, म्हणजेच माझे मोठे सैन्य जे मी तुमच्यामध्ये पाठवले होते; त्यांनी खाल्लेल्या तुमच्या वर्षांची मी भरपाई करेन.

26 जोपर्यंत तुम्ही तृप्त होत नाही तोपर्यंत तुम्ही खाल, ज्यांनी तुमच्यासाठी अद्भुत कार्य केले आहेत त्या याहवेह तुमच्या परमेश्वराच्या नावाची तुम्ही स्तुती कराल, माझे लोक पुन्हा कधीही लज्जित होणार नाहीत.

27 तुम्हाला कळून येईल की मी इस्राएलमध्ये आहे, आणि मीच याहवेह तुमचा परमेश्वर आहे, आणि दुसरा कोणीही नाही; माझे लोक पुन्हा कधीही लज्जित होणार नाहीत.


याहवेहचा दिवस

28 “आणि त्यानंतर, मी माझा आत्मा सर्व लोकांवर ओतेन. तुमचे पुत्र व तुमच्या कन्या भविष्यवाणी सांगतील, व तुमचे वृद्ध स्वप्ने पाहतील, तुमचे तरुण दृष्टान्त पाहतील.

29 माझ्या दासांवर म्हणजेच, स्त्री आणि पुरुष दोघांवरही, त्या दिवसांत मी माझा आत्मा ओतेन.

30 आकाशात व पृथ्वीवर, रक्त व अग्नी व धुरांचे स्तंभ अशी विलक्षण चिन्हे मी दाखवेन.

31 याहवेहचा महान व भयंकर दिवस येण्यापूर्वी सूर्य अंधकारमय व चंद्र रक्तमय होईल.

32 आणि प्रत्येकजण जो प्रभूच्या नावाने त्यांचा धावा करेल तोच वाचेल; कारण याहवेहने म्हटले आहे सीयोन डोंगरावर आणि यरुशलेममध्ये व जे उरलेले असतील ते वाचतील आणि ज्यांना याहवेहने बोलाविले ते सुद्धा तारण पावतील.

पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™

ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.

यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.

सर्व अधिकार जगभरात राखीव.

Holy Bible, Marathi Contemporary Version™

Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.

Used with permission.

All rights reserved worldwide.

Biblica, Inc.
Lean sinn:



Sanasan