Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

योएल 1 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 पेथूएलचा पुत्र योएलकडे याहवेहचे वचन आले.


टोळांचे आक्रमण

2 वडिलजनहो, हे ऐका; या देशात राहणारे प्रत्येकजण हे ऐको. तुमच्या दिवसात किंवा तुमच्या पूर्वजांच्या दिवसात असे कधी घडले होते काय?

3 तुम्ही ते आपल्या लेकरांना सांगा, आणि तुमच्या लेकरांनी ते त्यांच्या लेकरांना सांगावे, आणि त्यांच्या लेकरांनी पुढील पिढीला सांगावे.

4 कुरतडणार्‍या टोळांनी जे सोडले होते, ते झुंडींनी येणार्‍या टोळांनी खाल्ले; जे झुंडींनी येणार्‍या टोळांनी सोडले ते खुरडत चालणार्‍या टोळांनी खाल्ले; जे खुरडत चालणार्‍या टोळांनी सोडले ते इतर टोळांनी खाल्ले.

5 अहो मद्यप्यांनो, जागे व्हा आणि रडा! हे सर्व द्राक्षारस पिणार्‍यांनो विलाप करा; नवीन द्राक्षारसाकरिता विलाप करा कारण तो तुमच्या ओठातून काढून घेतला आहे.

6 एक राष्ट्र माझ्या देशावर चालून आले आहे, ते सैन्य बलाढ्य आणि असंख्य आहे; त्यांचे दात हे सिंहाचे दात आहे, त्यांचे सुळे हे सिंहिणीचे सुळे आहेत.

7 त्या राष्ट्रांनी माझ्या द्राक्षवेलींची नासधूस केली आहेत आणि अंजिराच्या झाडांचा नाश केला आहे. त्यांनी त्याचे खोड सोलून साल दूर फेकली आहे, त्यांच्या फांद्या पांढर्‍या केल्या आहेत.

8 जशी एक कुमारी गोणपाट नेसून आपल्या तारुण्यातील प्रियकरासाठी करते, तसा तुम्हीही शोक करा.

9 याहवेहच्या मंदिरात वाहण्याची अन्नार्पणे व पेयार्पणे बंद झाली आहेत; याहवेहसमोर सेवा करणारे याजक विलाप करीत आहे.

10 शेतांची धूळधाण झाली आहेत, भूमी कोरडी पडली आहे; धान्याचा नाश झाला आहे, नवीन द्राक्षारस सुकला आहे, जैतून तेल समाप्त झाले आहे.

11 अहो, शेतकर्‍यांनो, लज्जित व्हा, द्राक्षमळ्यांची मशागत करणार्‍यांनो, आकांत करा; गहू व जव याकरिता विलाप करा, कारण शेतातील पिके नष्ट झाली आहेत.

12 द्राक्षवेल वाळून गेली आहे अंजिराचे झाड कोमेजले आहे; डाळिंब, खजुराचे आणि सफरचंदाचे झाड; शेतातील सर्व झाडे सुकून गेली आहेत. खचितच लोकांचा आनंद विरून गेला आहे.


विलापासाठी आव्हान

13 अहो याजकांनो, गोणपाट परिधान करा आणि शोक करा; वेदीची सेवा करणार्‍यांनो, विलाप करा. तुम्ही जी परमेश्वराची सेवा करता, या, गोणपाट परिधान करीत रात्र घालावा; कारण अन्नार्पणे व पेयार्पणे तुमच्या परमेश्वराच्या भवनात येणे बंद झाले आहेत.

14 एक पवित्र उपास जाहीर करा; लोकांची एक धार्मिक सभा बोलवा. वडीलजनास व देशात राहणार्‍यांना याहवेह तुमच्या परमेश्वराच्या भवनात बोलवा, आणि याहवेहपुढे शोक करा.

15 त्या दिवसाबद्दल हाय! याहवेहचा दिवस जवळ आहे; सर्वसमर्थापासून जसा नाश तसे ते येतील.

16 आपल्या डोळ्यादेखत अन्न नाहीसे झाले नाही काय— आमच्या परमेश्वराच्या भवनातील सर्व आनंद व उल्हास गेले नाही काय?

17 जमिनीच्या ढेकळांखाली बीज कुजून जात आहे. कोठारे उद्ध्वस्त झाली आहेत आणि गोदामे मोडली आहेत, कारण धान्य करपून गेले आहे.

18 गुरे कशी कण्हत आहेत! शेरडामेंढरांचे कळप व्याकूळ झाले आहेत, कारण त्यांना चरण्यासाठी कुरणेच नाहीत; मेंढ्यांचे कळप विव्हळत आहेत.

19 हे याहवेह, मी तुम्हाला हाक मारीत आहेत, कारण अग्नीच्या उष्णतेने कुरणे जाळून फस्त केली आहेत, आणि अग्नीने मैदानातील सर्व झाडे भस्मसात झाली आहेत.

20 आणि वनपशूदेखील तुमच्याकडे आक्रोश करीत आहेत, पाण्याचे झरे कोरडे पडले आहेत. आणि आणि अग्नीने रानातील कुरणे होरपळून निघाली आहे.

पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™

ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.

यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.

सर्व अधिकार जगभरात राखीव.

Holy Bible, Marathi Contemporary Version™

Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.

Used with permission.

All rights reserved worldwide.

Biblica, Inc.
Lean sinn:



Sanasan