Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

इय्योब 4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती


एलीफाज

1 एलीफाज तेमानीने उत्तर दिले:

2 “जर कोणी तुझ्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, तर तू धीराने ऐकशील का? परंतु बोलल्याशिवाय कोणाच्याने राहवेल?

3 तू अनेक जणांना कसे शिकवलेस, तू दुर्बल हात कशाप्रकारे सबळ केलेत याचा विचार कर.

4 तुझ्या शब्दांनी अडखळलेल्यांना आधार दिला आहे; आणि लटपटणारे गुडघे तू स्थिर केले आहेस.

5 परंतु आता तुझ्यावर संकट आले आणि तू निराश झालास; तुझ्यावर आघात झाला आणि तू भयभीत झालास.

6 तुझी भक्ती हा तुझा आत्मविश्वास नसावा काय आणि तुझे निर्दोष मार्ग तुझी आशा असू नयेत काय?

7 “विचार कर: निरपराधी असून, कधी कोणी नष्ट झाले आहेत का? सज्जनांचा नाश झाला आहे का?

8 मी असे पाहिले आहे की, जे दुष्टाईची नांगरणी करतात आणि दुःख पेरतात तेच त्यांची कापणी करतात.

9 परमेश्वराच्या श्वासाने ते नष्ट होतात; त्यांच्या क्रोधाची केवळ एक फुंकर त्यांना नाहीसे करते.

10 सिंह डरकाळी फोडतील आणि गर्जना करतील, तरी त्या बलिष्ठ सिंहाचे दात मोडलेले आहेत.

11 भक्ष्याच्या अभावी सिंह नाश पावतो, आणि सिंहिणीची पिल्ले पांगून जातात.

12 “गुप्तपणे मला वचन सांगण्यात आले, माझ्या कानांनी त्याची कुजबुज ऐकली.

13 रात्रीच्या अस्वस्थ स्वप्नात, जेव्हा लोकांना गाढ झोप लागते,

14 तेव्हा मी भयभीत झालो आणि घाबरून त्रस्त झालो त्यामुळे माझी सर्व हाडे थरथरली.

15 माझ्या मुखासमोरून एक आत्मा गेला, आणि माझ्या अंगावर रोमांच उभे राहिले.

16 तो थांबला, परंतु काय आहे ते मात्र मला समजेना. त्याचा आकार माझ्या डोळ्यासमोर होता, आणि त्याचे कुजबुजणे मी ऐकले:

17 ‘मनुष्य परमेश्वरापेक्षा नीतिमान असू शकतो काय? बलवान मनुष्य त्याच्या उत्पन्नकर्त्यापेक्षा अधिक शुद्ध असू शकतो काय?

18 जर परमेश्वर आपल्या सेवकांवर भरवसा ठेवत नाही, जर तो आपल्या दूतांवर दोषारोप करतो,

19 तर मग जे मातीच्या घरात राहतात, ज्यांचा पाया धुळीत आहे, जे पतंगा समान चिरडले जातात, त्यांच्यावर परमेश्वर भरवसा ठेवील काय?

20 पहाटेपासून संध्याकाळपर्यंत त्यांचे तुकडे होतात; कोणाच्या लक्षात न येताच ते सर्वकाळासाठी नष्ट होतात.

21 त्यांनी ज्ञानाविनाच मरून जावे म्हणून, त्यांच्या डेर्‍याचे दोर आतूनच कापले जात नाही काय?’

पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™

ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.

यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.

सर्व अधिकार जगभरात राखीव.

Holy Bible, Marathi Contemporary Version™

Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.

Used with permission.

All rights reserved worldwide.

Biblica, Inc.
Lean sinn:



Sanasan