इय्योब 38 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्तीयाहवेह इय्योबाशी बोलतात 1 मग याहवेह वादळातून इय्योबाशी बोलले, ते म्हणाले: 2 “हा कोण आहे जो अज्ञानी शब्दांनी माझ्या योजना अस्पष्ट करतो? 3 पुरुषाप्रमाणे आपली कंबर कसून घे; मी तुला प्रश्न विचारेन, आणि तू मला उत्तर देशील. 4 “मी पृथ्वीचा पाया घातला तेव्हा तू कुठे होतास? तुला समजत असेल तर सांग. 5 तिचे आकारमान कोणी आखले? खचित तुला ठाऊक असणार! तिच्यावर मापनसूत्र कोणी ताणले? 6 तिचे पाये कशावर रोवले आहे, किंवा तिची कोनशिला कोणी बसवली— 7 जेव्हा प्रभात तार्यांनी एकत्र गाणी गाईली आणि सर्व देवदूतांनी हर्षनाद केला तेव्हा तू कुठे होता? 8 “सागर जसा गर्भातून उफाळून समोर आला तेव्हा त्याला दारांच्या मागे कोणी अडविले, 9 जेव्हा मी ढगांसाठी वस्त्र बनविली आणि त्यांना दाट अंधकारात लपेटले, 10 जेव्हा त्याच्या मर्यादा मी निश्चित केल्या आणि त्यांची दारे आणि गजे त्यांच्या ठिकाणी लावून दिली, 11 जेव्हा मी म्हणालो, ‘तुम्ही येथवरच यावे आणि यापलीकडे नाही; तुझ्या उन्मत्त लाटा येथेच थांबतील’? 12 “तू कधी तरी पहाटेला आदेश दिला आहे का, किंवा कधी प्रभातेला त्याचे ठिकाण दाखविले आहे, 13 यासाठी की ते पृथ्वीच्या टोकांना पकडतील आणि दुष्टांना त्यातून झटकून टाकतील? 14 जशी शिक्क्याच्या खाली ओली माती, तशी पृथ्वी आकार घेते; आणि वस्त्रासारखी त्याची मुद्रा उठून दिसते. 15 दुष्टांपासून त्यांचा प्रकाश मागे रोखला जातो, आणि त्यांचा उगारलेला हात मोडला जातो. 16 “समुद्राच्या उगम स्थानांपर्यंत तू कधी प्रवास केला काय किंवा त्याच्या खोल गर्तेमध्ये कधी चालत गेलास काय? 17 मृत्यूची द्वारे तुला दाखविली गेली आहेत काय? अति खोल अंधकाराचे दरवाजे तू पाहिलेस काय? 18 पृथ्वीचा विस्तार केवढा आहे याचे आकलन तुला झाले आहे का, हे सर्व जर तू जाणतोस तर मला सांग. 19 “प्रकाशाच्या निवासस्थानाकडे नेणारी वाट कोणती आहे? आणि अंधार कुठे वस्ती करतो? 20 त्यांच्या ठिकाणांपर्यंत त्यांना तू घेऊन जाशील काय? त्यांच्या घराच्या वाटा तुला माहीत आहेत काय? 21 तुला हे नक्कीच माहीत असणार, कारण तेव्हा तर तू जन्मला होता! तू तर पुष्कळ वर्षे जगला आहेस! 22 “हिमाच्या कोठारांमध्ये तू प्रवेश केलास काय किंवा गारांची भांडारे तू पाहिलीस काय? 23 जी मी संकट काळासाठी, लढाई आणि युद्धाच्या दिवसांसाठी राखून ठेवतो? 24 आकाशात चमकणारी वीज कुठून पांगवली जाते, किंवा जिथून पूर्वेचा वारा पृथ्वीवर विखुरला जातो, त्याचा मार्ग कुठे आहे? 25 मुसळधार पावसासाठी प्रवाह, आणि वादळी पावसाची वाट कोण खणतात, 26 म्हणजे ज्या भूमीवर कोणीही लोक राहत नाहीत, निर्जन वाळवंटामध्ये पाणी पुरवठा करू शकेल, 27 यासाठी की ते ओसाड उजाड भूमीला तृप्त करेल व तिथे गवत उगवू शकेल? 28 पावसाला पिता आहे का? दहिवराच्या थेंबांचा पिता कोण आहे? 29 बर्फ कोणाच्या उदरातून येते? आकाशातील गारठ्याला कोण जन्म देते 30 जेव्हा पाणी दगडासारखे घट्ट होते, जेव्हा खोल सागराचा पृष्ठभाग गोठून जातो? 31 “कृत्तिकापुंजाचे सौंदर्य तू बांधू शकतो काय? मृगशीर्षाचे बंध तुझ्याने सोडवतील काय? 32 तू त्यांच्या ॠतूनुसार नक्षत्रांचे समूह उगवतीस आणू शकतो काय सप्तॠषीला व त्याच्या उपग्रहांना चालवशील काय? 33 स्वर्गाचे नियम तुला माहिती आहेत काय? परमेश्वराची सत्ता तू पृथ्वीवर स्थापित करू शकतो काय? 34 “ढगांपर्यंत तुझा आवाज तुला उंचाविता येईल काय पुराच्या पाण्याने स्वतःला झाकता येईल काय? 35 आकाशातील विजेला कोसळण्यापासून तू थांबवू शकतो काय? ‘आम्ही इथे आहोत’ असे निवेदन ते तुला देतात काय? 36 पाणपक्ष्याला ज्ञान कोण देते, किंवा कोंबड्याला समज कोणी दिला? 37-38 मेघांची गणना करण्याचे बुद्धिसामर्थ्य कोणाजवळ आहे? जेव्हा माती कडक होते, आणि जमिनीची ढेकळे एकत्र चिकटतात? तेव्हा आकाशातील बुधले कोणाला ओतता येतील? 39 “सिंहिणीसाठी तू शिकार करतो का? तरुण सिंहांची भूक तू शमवतोस का? 40 ज्यावेळी सिंह त्यांच्या गुहांमध्ये दबा धरून असतात किंवा दाट झाडीमध्ये वाट बघत असतात? 41 कावळ्यांना अन्न कोण पुरवितो जेव्हा त्यांची पिल्ले भुकेने परमेश्वराकडे आरोळी मारतात आणि अन्नाअभावी चोहीकडे फिरतात? |
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.
Biblica, Inc.