इय्योब 30 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 “परंतु आता जे माझ्याहून वयाने लहान आहेत, ते माझी चेष्टा करतात, ज्यांच्या वडिलांना मी तिरस्काराने मेंढ्यांचे राखण करणार्या कुत्र्यांबरोबर बसविले. 2 त्यांच्या हातच्या सामर्थ्याचा मला काय लाभ, जेव्हा त्यांचा जोम त्यांच्यात राहिलाच नाही? 3 भुकेने ते निस्तेज पडले आहेत, रात्रीच्या वेळी शुष्क आणि निर्जन भूमीवर ते वणवण भटकले. 4 ते औषधी वनस्पतीचा पाला गोळा करत होते, केरसुणीच्या झाडाची मुळे त्यांचे अन्न होते. 5 त्यांना समाजातून घालवून दिले होते, जसे चोरांवर ओरडावे तसे त्यांच्यामागून लोक ओरडत होते. 6 त्यांना कोरड्या पडलेल्या ओढ्याच्या पात्रामध्ये, खडकात आणि भूमीतील बिळांमध्ये राहावे लागले. 7 झुडपांमधून ते कर्कश आवाजात ओरडत आणि झुडपाखाली दाटून बसत. 8 आधार नसलेल्या आणि अपरिचित पिलावळी सारखे त्यांना त्यांच्या देशातून हाकलून दिले होते. 9 “आणि आता हेच तरुण लोक माझ्या निंदेची गाणी गातात; मी त्यांच्या चर्चेचा विषय झालो आहे. 10 ते माझा तिरस्कार करतात आणि माझ्यापासून दूर राहतात; माझ्या तोंडावर थुंकण्यास ते संकोच करीत नाहीत. 11 आता तर परमेश्वरानेच माझ्या कमानीची तार सैल सोडून मला पीडले आहे, माझ्यासमोर ते अनियंत्रितपणे वागतात. 12 माझ्या उजव्या बाजूने घोळक्याने येऊन ते माझ्यावर हल्ला करतात; आणि माझ्या वाटेवर जाळे पसरवितात, माझ्याविरुद्ध ते उतरणी बांधतात. 13 ते माझा मार्ग अडवितात; माझा नाश करण्यात त्यांना यश मिळते. ते म्हणतात, ‘याला साहाय्य करणारा कोणीही नाही.’ 14 खिंडारातून हल्ला केल्यासारखे ते माझ्यावर धावून येतात; माझा नाश करण्यासाठी भग्नावशेषातून ते माझ्यावर लोंढ्यासारखे धावून येतात. 15 भयाने मला ग्रासून टाकले आहे; माझा मान सन्मान वार्याप्रमाणे नष्ट झाला आहे, आणि माझी सुरक्षा ढगाप्रमाणे सरून गेली आहे. 16 “आणि आता माझे जीवन संपुष्टात आले आहे; पीडेच्या काळाने माझ्यावर पकड घट्ट केली आहे. 17 रात्रीच्या समयी माझी हाडे टोचू लागतात; मला छळणार्या वेदना थांबत नाहीत. 18 परमेश्वराच्या बलवान हाताने माझी वस्त्रे आवळून धरली आहेत; वस्त्रांच्या गळबंदासारखे ते मला बांधत आहेत. 19 परमेश्वराने मला चिखलात फेकले आहे, मी धूळ व राख यांच्यासारखा क्षीण झालो आहे. 20 “हे परमेश्वरा, मी तुम्हाला हाक मारतो, पण तुम्ही मला उत्तर देत नाहीत; मी उभा राहतो, पण तुम्ही केवळ माझ्याकडे नजर टाकता. 21 तुम्ही माझ्याविषयी निष्ठुर झाला आहात; आणि आपल्या हाताच्या बळाने माझ्यावर वार करता. 22 तुम्ही मला ओढून वार्यावर उडवून टाकता, आणि वादळामध्ये भिरकावून फेकले आहे. 23 मला माहीत आहे की तुम्ही मी मरेपर्यंत खाली खेचणार आहात, अशा ठिकाणी जे सर्व जीवितांसाठी नेमण्यात आले आहे. 24 “पीडित मनुष्य जेव्हा त्याच्या मदतीसाठी याचना करतो तेव्हा खचितच कोणीही त्याला हात देत नाही. 25 संकटात असलेल्यांसाठी मी रडलो नाही काय? गरिबांसाठी माझा जीव खिन्न झाला नाही काय? 26 तरीही मी जेव्हा चांगल्याची अपेक्षा केली, पण वाईटच मिळाले; आणि मी प्रकाशाची वाट पाहिली, पण अंधकार आला. 27 माझ्या आतील व्याकुळतेचे मंथन थांबत नाही; क्लेशाचे दिवस माझ्याशी सामना करतात. 28 मी काळवंडून जात आहे, पण तो उन्हाने नव्हे; मी सभेत उभा राहून मदतीची याचना करतो. 29 मी कोल्ह्यांचा भाऊ, आणि घुबडाचा सोबती असा झालो आहे. 30 माझी त्वचा काळी पडून ती सोलून निघत आहे; माझे शरीर तापाने फणफणत आहे. 31 माझी वीणा रडण्याचे, आणि माझा पावा शोकाचे स्वर काढते. |
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.
Biblica, Inc.