इय्योब 18 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्तीबिल्दद 1 यावर बिल्दद शूहीने उत्तर दिले: 2 “ही अशी भाषणे तू कधी थांबविणार आहेस? जरा समजूतदारपणे घे आणि मग आपण बोलू. 3 आम्हाला जनावरांप्रमाणे का समजतोस तुझ्या नजरेत आम्ही मूर्ख आहोत का? 4 रागाने जो तू स्वतःला फाडतोस, त्या तुझ्यामुळे पृथ्वी ओसाड पडावी काय? किंवा खडक आपल्या ठिकाणातून कोसळू द्यावे काय? 5 “दुष्टांचा दिवा विझून जातो; त्याच्या अग्नीच्या ज्वाला पेटावयाच्या थांबतात. 6 त्याच्या तंबूतील प्रकाश अंधकार होऊन होतो; त्याच्या जवळचा दिवा विझून जातो. 7 त्याच्या पावलांचा प्रभाव दुर्बल होतो; त्याच्या स्वतःच्याच योजना त्याला खाली खेचतात. 8 त्याचेच पाऊल त्याला पाशात अडकवितात; आणि त्याच्या जाळ्यात तो सापडतो. 9 फास त्याची टाच पकडते; आणि तो सापळ्यात धरला जातो. 10 त्याच्यासाठी गळफास जमिनीत लपविलेला आहे; त्याच्या मार्गात सापळा ठेवलेला आहे. 11 आतंक त्याला चहूकडून घेरून आहे आणि त्याच्या प्रत्येक पावलांवर कुत्र्यांचे भय आहे. 12 विपत्ती त्याच्यासाठी भुकेलेली आहे; तो पडला तर, विनाश त्याच्यासाठी तयारच आहे. 13 रोगाने त्याची त्वचा खाऊन टाकली आहे; मृत्यूचे पहिले अपत्य त्याचे अवयव गिळून टाकतात. 14 त्याच्या सुरक्षित डेर्यांतून त्याला फाडून भयाच्या राजापुढे त्याला फरफटीत नेले आहे. 15 अग्नी त्याच्या डेर्यात वस्ती करते; त्याच्या घरावर गंधक विखुरले आहे. 16 त्याची मुळे खाली सुकतात आणि त्याच्यावर सर्व फांद्या वाळून जातात. 17 पृथ्वीवरून त्याच्या अस्तित्वाची आठवण नाहीशी होते; आणि आता भूमीवर त्याचे नाव राहणार नाही. 18 प्रकाशातून त्याला अंधाराच्या राज्यात घालविले आहे; आणि जगातून तो हद्दपार केला गेला आहे. 19 त्याच्या लोकात त्याला पुत्र किंवा कोणीही वारस नाहीत, तो जिथे राहत होता, तिथेही कोणी उरले नाहीत. 20 पश्चिमेचे लोक त्याची अवस्था बघून भयप्रद होतात; हा भयंकर अंत पाहून पूर्वेकडील लोक घाबरून जातात. 21 पातक्यांचे जीवन खचितच असे असते; परमेश्वराला जे ओळखीत नाहीत, त्यांचे ठिकाण असेच असते.” |
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.
Biblica, Inc.