Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

इय्योब 15 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती


एलीफाज

1 मग एलीफाज तेमानीने उत्तर देऊन म्हटले:

2 “सुज्ञ मनुष्य पोकळ मताने उत्तर देईल का किंवा पूर्वेकडील गरम वार्‍याने आपले पोट भरणार काय?

3 कुचकामी शब्दांनी, आणि व्यर्थ भाषणाने ते वाद घालतील काय?

4 परंतु तू तर धार्मिकता देखील कमी लेखतोस आणि परमेश्वराच्या भक्तीत अडखळण आणतो.

5 तुझी पापे तुझ्या मुखाला संकेत देतात; धूर्तांची जीभ तू अंगीकारतो.

6 माझे नव्हे, तर तुझे स्वतःचे मुख तुला दोषी ठरविते; तुझे स्वतःचे ओठ तुझ्याविरुद्ध साक्ष देते.

7 “सर्व मानवजातीमध्ये तू प्रथम जन्मलेला आहेस का? पर्वत निर्माण होण्यापूर्वी तू अस्तित्वात आला का?

8 परमेश्वराची मसलत तू ऐकतोस काय? शहाणपणाचा ठेका तुझ्याकडे आहे का?

9 आम्हाला माहीत नाही, अशी तुला काय माहिती आहे? आम्हाला आहे, त्याहून अधिक कोणते ज्ञान तुला आहे?

10 केस पांढरे झालेले आणि वयोवृद्ध पुरुष आमच्यामध्ये आहेत; जे तुझ्या वडिलांपेक्षाही अधिक वयाचे आहेत.

11 परमेश्वराचे सांत्वन आणि सौम्यतेचे शब्द तुझ्यासाठी पुरेसे नाहीत का?

12 तुझ्या मनाने तुला का वाहवत नेले आहे, तुझे डोळे असे का चमकतात,

13 यासाठी की आपला क्रोध तू परमेश्वरावर दाखवावा आणि तुझ्या मुखातून असे शब्द ओतावे?

14 “मनुष्यप्राणी काय आहेत की ते शुद्ध असावेत, किंवा स्त्रीपासून जन्मलेले नीतिमान असावेत?

15 जर परमेश्वर आपल्या पवित्र जनांचाही देखील भरवसा करीत नाही, त्यांच्या दृष्टीने जर प्रत्यक्ष स्वर्गदेखील शुद्ध नाही,

16 तर असत्य आणि भ्रष्ट मनुष्य जो पाण्याप्रमाणे दुष्टता पितो, तो किती कमी दर्जाचा असावा!

17 “माझे लक्षपूर्वक ऐक, मी तुला स्पष्ट करून सांगतो; मी जे पाहिले आहे ते तुला सांगू दे,

18 ज्ञानी लोकांनी जे त्यांच्या पूर्वजांपासून मिळविले, त्यातील काहीच गुपित न ठेवता ते जाहीर केले,

19 (ज्यांना केवळ ही भूमी देण्यात आली होती आणि त्यांच्यामध्ये कोणीही विदेशी नव्हता):

20 दुष्ट मनुष्य त्याच्या सर्व आयुष्यभर, तर निर्दयी मनुष्य त्याच्यासाठी राखलेली सर्व वर्षे यातना सहन करतो.

21 त्याचे कान भयाच्या शब्दाने भरतात; सर्वकाही चांगले असताना विध्वंसक त्याच्यावर हल्ला करतो.

22 अंधारातून सुटकेची आशा त्याला नाही; तलवारीसाठी त्याला नेमले आहे.

23 गिधाडा सारखा तो आपल्या अन्नासाठी भटकतो; अंधकाराचा दिवस जवळ आहे, हे त्याला माहीत आहे.

24 संकट व चिंता त्याला घाबरे करतात; हल्ला करण्यास सज्ज झालेल्या राजासारखे ती त्याला जेरीस आणतात,

25 कारण परमेश्वराकडे तो आपली मूठ फिरवितो आणि सर्वसमर्थ्‍या विरुद्ध स्वतःची बढाई मिरवतो,

26 त्यांच्या विरोधात अपमानाने जाड आणि मजबूत ढाल घेऊन तो दोष लावतो.

27 “कारण या दुष्ट माणसाच्या अंगावर चरबी चढलेली आहे; त्याच्या कंबरेवर मांस चढले आहे,

28 पडीक नगरांमध्ये तो वास्तव्य करेल, कोणी राहत नाही अशा ठिकाणी, तुकडे पडलेल्या घरामध्ये त्याचा डेरा असेल.

29 त्याची श्रीमंती आणि त्याची संपत्ती टिकणार नाही, ना पृथ्वीवर त्याची मालमत्ता वाढणार.

30 त्याला अंधकारातून सुटका नाही; अग्नीने त्याचा अंकुर जळून जाईल, परमेश्वराचा मुखश्वास त्याला दूर वाहून नेईल.

31 निरर्थक धनावर विसंबून राहून त्याने स्वतःची फसवणूक करून घेऊ नये, कारण त्याला त्याचा काही लाभ मिळणार नाही.

32 त्याच्या ठरलेल्या वेळे आधी तो गळून जाईल, आणि त्याच्या फांद्या भरभराट पावणार नाहीत.

33 न पिकलेले द्राक्ष झडून गेलेल्या द्राक्षवेलीसारखा, बहर गाळून टाकत असलेल्या जैतुनाच्या झाडासारखा तो होईल.

34 कारण देवहीनांचे सोबती निष्फळ होतील, आणि लाच घेणार्‍यांचे डेरे अग्नी जाळून टाकील.

35 ते क्लेशाची गर्भधारणा करतात आणि दुष्टतेला जन्म देतात; आणि त्यांचे गर्भाशय कपट प्रसवते.”

पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™

ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.

यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.

सर्व अधिकार जगभरात राखीव.

Holy Bible, Marathi Contemporary Version™

Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.

Used with permission.

All rights reserved worldwide.

Biblica, Inc.
Lean sinn:



Sanasan