Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

इय्योब 11 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती


सोफर

1 तेव्हा सोफर नामाथीने उत्तर दिले:

2 “हे सर्व शब्द निरुत्तरीत राहतील काय? हा बडबडा मनुष्य न्यायी ठरेल काय?

3 तुझ्या व्यर्थ गोष्टींनी लोक शांत होतील काय? तू उपहास करीत असताना, कोणी तुझा निषेध करणार नाही का?

4 तू परमेश्वराला म्हणतोस, ‘माझा विश्वास अचूक आहे आणि मी तुमच्या दृष्टीने शुद्ध आहे.’

5 अहा, मला किती वाटते की परमेश्वराने बोलावे, आणि त्यांनी तुझ्याविरुद्ध आपले तोंड उघडावे

6 आणि ज्ञानाचे रहस्य तुला प्रकट करावे, कारण खर्‍या ज्ञानाला दोन बाजू आहेत. हे माहीत असू दे: की परमेश्वराने तुझी काही पापे सोडली आहेत.

7 “परमेश्वराच्या रहस्याचा तुला थांग लागेल काय? सर्वसमर्थाच्या मर्यादेचे तुला आकलन होईल का?

8 ती आकाशाहून उंच आहे; मग तू काय करशील? ती अधोलोकाहून खोल आहे; तुला ते काय कळणार?

9 त्यांचा विस्तार पृथ्वीपेक्षा रुंद, आणि सागराहून ती अधिक विस्तृत आहे.

10 “जर त्यांनी येऊन तुला बंदिवान केले व न्यायसभा बोलावली, तर त्यांना कोण प्रतिबंध करू शकेल?

11 खरोखर ते फसविणार्‍यास ओळखतात; आणि जेव्हा ते दुष्टता पाहतात, तेव्हा ते दखल घेणार नाही का?

12 जसे रानगाढवाचे शिंगरू मनुष्याचा जन्म घेऊ शकत नाही तसेच अक्कलशून्य मनुष्य शहाणा होणार नाही.

13 “जर तू आपले हृदय परमेश्वराकडे लावशील आणि त्यांच्याकडे आपले हात पसरशील,

14 तुझ्या हाती असलेली पापे तू जर दूर करशील आणि आपल्या डेर्‍यात अन्याय राहू देणार नाहीस,

15 तर दोषमुक्त असा, तू तुझे मुख वर करशील; तू स्थिर आणि निर्भय असा उभा राहशील.

16 तुला खरोखर तुझ्या क्लेशांचा विसर पडेल, केवळ वाहून गेलेल्या पाण्यासारखे ते तुला आठवतील.

17 तुझे जीवन मध्यानाच्या प्रकाशापेक्षा तेजस्वी होईल, आणि अंधकार पहाटेसारखा होईल.

18 आशा प्राप्त झाल्याने तू निर्भय होशील; तू तुझ्या सभोवती निरखून पाहशील आणि सुरक्षितेत विश्रांती घेशील.

19 तू निर्भयपणे झोपशील, कोणी तुला घाबरवून टाकणार नाही, आणि अनेकजण तुझ्या समर्थनाची अपेक्षा करतील.

20 परंतु दुष्टांची नजर अंधुक होईल, आणि निसटून जाण्याचा मार्ग त्यांना आढळणार नाही; मृत्यूची धाप हीच त्यांची आशा असेल.”

पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™

ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.

यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.

सर्व अधिकार जगभरात राखीव.

Holy Bible, Marathi Contemporary Version™

Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.

Used with permission.

All rights reserved worldwide.

Biblica, Inc.
Lean sinn:



Sanasan