यिर्मया 50 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्तीबाबिलोनसंबंधी संदेश 1 बाबिलोन व बाबिलोनच्या लोकांचा देश यांच्याविरुद्ध याहवेहने संदेष्टा यिर्मयाहला सांगितलेले हे वचन आहे: 2 “राष्ट्रांमध्ये जाहीर कर व घोषणा कर, ध्वज उंचावून घोषणा कर; काहीही मागे सोडू नको, पण म्हण, ‘बाबेलचा पाडाव होणार आहे; तिचे दैवत बेल लज्जित करण्यात येणार आहे, मरोदख भयाने व्याप्त होणार. तिच्या मूर्ती लज्जित करण्यात येणार आहेत तिची दैवते भयाने व्याप्त होणार आहेत.’ 3 तिच्यावर उत्तरेकडून एक राष्ट्र हल्ला करेल आणि तिच्या भूमीचा विध्वंस करेल. तिथे पुन्हा कोणीही राहणार नाही; लोक आणि पशू पलायन करतील. 4 “त्या समयी, त्या दिवसात इस्राएलचे लोक आणि यहूदीयाचे लोक एकत्र येतील, आणि अश्रू गाळीत त्यांचे परमेश्वर याहवेहचा शोध घेतील, याहवेह जाहीर करतात. 5 ते सीयोनकडे जाणार्या मार्गाची विचारणा करतील आणि त्या दिशेने ते अभिमुख होतील. ते येतील व याहवेहशी, कधीही विस्मृतित न जाणाऱ्या, एका सार्वकालिक कराराशी जडून जातील. 6 “माझे लोक हरवलेली मेंढरे होती; त्यांच्या मेंढपाळांनीच त्यांची वाट चुकविली त्यांना डोंगरांवर भटकण्यासाठी सोडून दिले होते. ते डोंगर व पर्वतावर भटकत राहिले व त्यांच्या मेंढवाड्यास ते विसरले. 7 ज्यांना ते सापडले, त्यांनी त्यांना गिळंकृत केले; त्यांचे शत्रू म्हणाले, ‘आपण दोषी नाही, कारण याहवेह, त्यांचे हिरवेगार कुरण, आणि त्यांच्या पूर्वजांचे आशास्थान, यांच्याविरुद्धच ज्यांनी पाप केले आहे.’ 8 “बाबेलच्या बाहेर पळा; बाबिलोनच्या लोकांच्या भूमीचा त्याग करा, आणि त्या बोकडांसारखे व्हा, जे कळपाचे नेतृत्व करतात. 9 कारण मी उत्तरेकडील महान राष्ट्रांना एकवटून बाबेलवर हल्ला करण्यास प्रेरित करणार. ते बाबेलवर हल्ला करण्यास सज्ज होतील, आणि उत्तरेकडून तिचा पाडाव होईल. त्यांचे बाण लक्ष्यवेधी योद्ध्यांसारखे असतील ते रिकाम्या हाताने परत जात नसतात. 10 तर मग बाबेलची लूट करण्यात येईल; ते सर्व तिची मनसोक्त लूट करतील,” असे याहवेह जाहीर करतात. 11 “तुम्ही जे माझे वतन लुटता, तुम्ही आनंद व उल्हास करतात, तुम्ही धान्य मळणार्या कालवडीप्रमाणे बागडता आणि घोड्यांसारखे खिंकाळत असाल, 12 पण तुमची माता अत्यंत लज्जित होईल; जिने तुम्हाला जन्म दिला, तिची अप्रतिष्ठा होईल, ती सर्व राष्ट्रात सर्वात क्षुद्र होईल— मग ती अरण्यात असो, शुष्क भूमीत, वा वाळवंटात असो. 13 याहवेहच्या क्रोधामुळे ती आवासित होणार नाही, पण पूर्णपणे ओसाड होईल. आणि तिची अवस्था पाहून बाबेलातून येजा करणार्यांना दहशत वाटेल; तिच्या जखमा पाहून ते तिचा उपहास करतील. 14 “बाबेलच्या सभोवती तिच्याविरुद्ध मोर्चा बांधा, धनुर्धाऱ्यांनो तिच्यावर बाणांचा नेम धरा. तिच्यावर बाण मारा, कोणताही बाण राखून ठेवू नका. कारण तिने याहवेहविरुद्ध पाप केले आहे. 15 तिच्याविरुद्ध चहूबाजूंनी आवाज उठवा! ती शरण येत आहे, तिचे बुरूज धराशायी झाले आहेत, तिच्या तटाच्या भिंती कोसळल्या आहेत. हा याहवेहने घेतलेला सूड आहे, तुम्हीही तिचा सूड घ्या; जसे तिने इतरांचे केले तसेच तिचेही करा. 16 बाबेलच्या शेतकऱ्यांना तिथून काढून टाका, कापणी करणारे आपले विळे घेऊन निघून जावोत. अत्याचाऱ्याच्या तलवारीमुळे प्रत्येकाने आपल्या लोकांकडे परत जावे. प्रत्येकाने आपल्या देशाकडे पलायन करावे. 17 “इस्राएली लोकांची मेंढराप्रमाणे पांगापांग झाली आहे, सिंहाने पाठलाग करून त्यांना पळविले आहे. प्रथम ज्याने त्यांना गिळंकृत केले तो अश्शूरचा राजा होता; नंतर त्यांच्या हाडांचा चुराडा केला तो बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर होता.” 18 म्हणून सर्वसमर्थ याहवेह, इस्राएलचे परमेश्वर म्हणतात: “मी बाबेलच्या राजाला व त्याच्या भूमीला शिक्षा देईन, अश्शूरच्या राजाला व त्याच्या भूमीला शिक्षा देईन. 19 पण मी इस्राएलला त्यांच्या स्वतःच्या कुरणात परत आणेन, ते कर्मेल व बाशान येथे चरतील; एफ्राईम व गिलआदच्या डोंगरावर ते खाऊन तृप्त होतील. 20 त्या दिवसात, त्या समयी, याहवेह घोषित करतात, इस्राएलमध्ये दोषाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला तरी ते आढळणार नाहीत, आणि यहूदीयामध्ये पाप शोध घेण्याचा प्रयत्न केला तरी आढळणार नाही, लोकांना मी क्षमा करेन. कारण मी वाचवून ठेवलेल्या अवशेषाला क्षमा करेन. 21 “मराथाईम प्रदेशावर आक्रमण करा आणि पकोड येथील रहिवाशांवर स्वारी करा. त्यांचा पाठलाग करा, त्यांचा वध करा व त्यांना समूळ नष्ट करा.” असे याहवेह जाहीर करतात. “मी तुम्हाला आज्ञापिलेले सर्वकाही करा. 22 देशामध्ये रणगर्जनेचा ध्वनी ऐकू येत आहे. प्रचंड विध्वंसतेचा ध्वनी! 23 कसा मोडणारा व चुराडा करणारा संपूर्ण पृथ्वीतलावरील अत्यंत जबरदस्त असा हा हातोडा! सर्व राष्ट्रांमध्ये बाबिलोन किती ओसाड बनले आहे! 24 अगे बाबिलोन, मी तुझ्यासाठी सापळा लावला आणि तुला कळण्या आधीच तू त्यात अडकलीस; तू सापडलीस व पकडण्यात आलीस कारण तू याहवेहस विरोध केला. 25 याहवेहने आपले शस्त्रागार उघडले व आपल्या क्रोधाचा स्फोट करण्यासाठी शस्त्रे बाहेर काढली, कारण सार्वभौम सर्वसमर्थ याहवेहस बाबेलच्या भूमीवर कार्य करावयाचे आहे. 26 या! दूरदूरच्या राष्ट्रांमधून बाबेलवर स्वारी करण्यासाठी या! तिची धान्यांची कोठारे फोडा; तिच्या भिंती पाडा, धान्याच्या राशी सारखा तिचा ढिगारा करा. आणि तिचा समूळ नायनाट करा तिच्यातील कोणीही शिल्लक ठेवू नका. 27 तिच्या सर्व तरुण बैलांची कत्तल करा; त्यांना वध होण्यासाठी जाऊ द्या! त्यांचा धिक्कार असो! कारण त्यांचा समय आला आहे, त्यांना शिक्षा करण्याची वेळ आली आहे. 28 बाबेलमधील फरारी व निर्वासित लोक सीयोनात काय म्हणतात ते ऐका याहवेह, आमच्या परमेश्वराने कसा सूड घेतला, त्यांच्या मंदिराबद्दल सूड घेतला. हे याहवेह जाहीर करतात. 29 “धनुर्धाऱ्यांना बाबेलविरुद्ध पाचारण करा, धनुष्य ताणणाऱ्या सर्वांना बोलवा. नगरीला वेढा घाला; कोणालाही निसटून जाऊ देऊ नका. तिच्या कृत्याची परतफेड करा; तिने इतरांचे जसे केले, तसे तिचे करा. तिने याहवेहला, इस्राएलाच्या पवित्र परमेश्वराला उद्दामपणे तुच्छ लेखले, 30 म्हणून, तिचे तरुण रस्तोरस्ती धराशायी होतील; त्या दिवशी तिचे सर्व योद्धे निःशब्द होतील,” हे याहवेह जाहीर करतात. 31 “पाहा, अहो गर्विष्ठ लोकांनो, मीच तुमच्याविरुद्ध आहे आता तुमचा दिवस आला आहे, तुम्हाला शिक्षा देण्याचा समय आला आहे! प्रभू सर्वसमर्थ याहवेह जाहीर करतात. 32 गर्विष्ठ अडखळतील व पडतील, तिला मदतीचा हात देऊन कोणीही उठविणार नाही; मी तिच्या नगरांमध्ये अग्नी पेटवेन तो अग्नी सभोवतालचे सर्वकाही गिळंकृत करेल.” 33 सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात: “इस्राएलाच्या लोकांवर जुलूम झाला आहे. व यहूदीयाच्या लोकांवरही झाला आहे. त्यांना कैद करणार्यांनी त्यांना घट्ट पकडून ठेवले आहे व त्यांना जाऊ देण्याचे ते नाकारतात. 34 परंतु त्यांचे उद्धारकर्ता सामर्थ्यशाली आहेत; सर्वसमर्थ याहवेह असे त्यांचे नाव आहे. ते जोमाने त्यांचा बचाव करतील आणि इस्राएली देशात त्यांना शांतीने राहता यावे, म्हणून ते त्यांच्या भूमीला शांती प्रदान करतील, परंतु, बाबेलच्या लोकांना अशांती मिळेल. 35 “बाबेलवर तलवारीचा प्रहार होईल! ती बाबेलमध्ये राहणाऱ्या लोकांवर आणि तिच्या अधिपतींवर, सुज्ञ लोकांवरही प्रहार करेल! याहवेह असे जाहीर करतात. 36 तिच्या खोट्या संदेष्ट्यांवर तलवारीचा प्रहार होईल ते सल्लागार मूर्ख बनतील! तिच्या योद्ध्यांवर तलवारीचा प्रहार होईल! ते अत्यंत भयभीत होतील. 37 तिचे घोडे, रथांवर तलवारीचा प्रहार होईल! आणि तिच्यात राहणाऱ्या विदेशीयांवरही होईल! ते दुर्बल होतील. तिच्या संपत्तीवर तलवारीचा प्रहार होईल! त्यांची लूट केली जाईल. 38 तिच्या पाण्यावर तलवारीचा प्रहार होईल! ते शुष्क होतील. कारण ही मूर्तींची भूमी आहे, आणि या मूर्ती भयाने वेड्या होतील. 39 “म्हणून या नगरीत वनपशू व तरस वास करतील, व घुबडे येऊन राहतील. येथे आता पुन्हा कधी मानवाची वस्ती होणार नाही; किंवा ही नगरीत पिढ्यान् पिढ्या ओसाड पडेल. 40 याहवेह जाहीर करतात, जसा मी परमेश्वराने सदोम व गमोराचा त्यांच्या सभोवतालच्या नगरांसह नाश केला, म्हणजे तिथे कोणी राहणार नाही. त्यात लोक वस्ती करणार नाहीत. 41 “पाहा, उत्तरेकडील देशातून सैन्य येत आहे; पृथ्वीच्या शेवटापासून एक मोठे राष्ट्र व अनेक राजे भडकविले जात आहेत. 42 त्यांचे सैनिक धनुष्ये व भाल्यांसहित सज्ज आहेत. ते अत्यंत क्रूर व दयाहीन आहेत. ते घोड्यांवर स्वार झाले असता त्यांचा आवाज गर्जणाऱ्या समुद्राप्रमाणे आहे. हे बाबिलोन कन्ये तुझ्यावर हल्ला करण्यासाठी युद्धासाठी सुसज्जित असलेल्यांप्रमाणे ते येत आहेत. 43 बाबेलच्या राजाने त्यांच्याबद्दल वार्ता ऐकली आहे. त्याचे बाहू निखळले आहेत. बाळाला जन्म देणाऱ्या स्त्रीच्या क्लेशाप्रमाणे वेदनांनी त्याला ग्रासले आहे. 44 यार्देन नदीच्या झुडूपातून सुपीक कुरणात झेप घेणार्या सिंहाप्रमाणे, बाबेलच्या लोकांना त्यांच्या भूमीवरून मी एका क्षणात पळवून लावेन. मी नियुक्त करावे असा या कार्यासाठी कोण निवडलेला आहे? माझ्यासारखा दुसरा कोण आहे? मला चेतावणी करणारा कोण आहे? कोणता मेंढपाळ माझ्याविरुद्ध उभा राहील?” 45 बाबेलविरुद्ध याहवेहचा संकल्प काय आहे ते ऐका. बाबेलच्या लोकांच्या भूमीविरुद्ध त्यांची काय योजना आहे, हे ऐकून घ्या. त्यांच्या कळपातील तरुणांना फरफटत ओढत नेण्यात येईल. त्यांच्या कुरणांना या दुर्दैवाने भयंकर धक्का बसेल. 46 बाबेलच्या पतनाच्या आवाजाने पृथ्वी कंपित होईल; त्याचा आक्रोश राष्ट्रांत प्रतिध्वनित होईल. |
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.
Biblica, Inc.