Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

यिर्मया 37 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती


यिर्मयाहला तुरुंगात टाकण्यात येते

1 बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर याने यहोयाकीमचा पुत्र कोन्याह याची यहूदीयाचा नवा राजा म्हणून नेमणूक केली नाही. त्याऐवजी त्याने योशीयाहचा पुत्र सिद्कीयाह याची निवड केली.

2 याहवेह यिर्मयाह संदेष्ट्याद्वारे जी वचने सांगत होते, त्याकडे सिद्कीयाह राजा, त्याचे सेवेकरी व देशातील लोक यापैकी कोणीही लक्ष दिले नाही.

3 तरीपण सिद्कीयाह राजाने शेलेम्याहचा पुत्र यहूकल व मासेयाहचा पुत्र सफन्याह याजक यांना यिर्मयाह संदेष्ट्याकडे अशी विनंती करण्यास पाठविले: “तू आमच्यासाठी आमचे परमेश्वर याहवेह यांच्याकडे प्रार्थना कर.”

4 यावेळी यिर्मयाह अद्यापही बंदिवासात टाकला गेला नव्हता, त्यामुळे तो आपल्या इच्छेप्रमाणे लोकांमध्ये जाणे-येणे करू शकत असे.

5 इजिप्तच्या फारोहच्या सैन्याने इजिप्तमधून कूच केले आहे, ही बातमी जेव्हा बाबेल्यांनी ऐकली, तेव्हा त्यांनी यरुशलेमच्या वेढ्यापासून माघार घेतली.

6 त्यावेळी यिर्मयाह संदेष्ट्याला याहवेहचे हे वचन आले:

7 “इस्राएलचे परमेश्वर याहवेह असे म्हणतात: यहूदीयाच्या राजाने माझा संदेश विचारण्यासाठी तुला पाठविले आहे, तर त्याला सांग, ‘फारोहचे सैन्य इजिप्तमधून तुमच्या साहाय्यासाठी आले असले, तरी ते इजिप्तला परत जातील.

8 बाबिलोनचे सैन्य माघारी येतील, हे शहर हस्तगत करून ते जाळून जमीनदोस्त करतील.’

9 “याहवेह असे म्हणतात: ‘बाबिलोनचे सैन्याने आपल्याला निश्चितच सोडणार आहेत.’ असा गैरसमज करून घेऊ नका. ते सोडून जाणार नाहीत!

10 तू बाबेलच्या सैन्याचा पराभव केलास, व त्यांच्यातील घायाळ झालेले सैनिकच त्यांच्या तंबूत उरले, तरी ते बाहेर येतील व हे शहर पेटवून देतील!”

11 जेव्हा फारोहच्या सैन्यामुळे बाबेलच्या सैन्याने यरुशलेमहून माघार घेतली,

12 तेव्हा यिर्मयाह शहरातून बाहेर पडू लागला व बिन्यामीन प्रांतातील त्याने विकत घेतलेल्या जमिनीचा ताबा घेण्यासाठी यरुशलेमहून निघाला.

13 परंतु तो बिन्यामीन वेशीतून बाहेर जात असता, हनन्याहचा नातू, शेलेम्याहचा पुत्र इरीयाह या पहारेकर्‍याच्या प्रमुखाने त्याला पकडले व यिर्मयाह संदेष्ट्याला म्हणाला, “तू बाबेलच्या सैन्यास फितूर झाला आहेस!”

14 तेव्हा यिर्मयाह म्हणाला, “हे खोटे आहे! मी बाबेलच्या सैन्यास फितूर झालो नाही.” परंतु इरीयाहने त्याचे ऐकले नाही; याउलट त्याने यिर्मयाहला अटक करून अधिकार्‍यांपुढे उभे केले.

15 ते यिर्मयाहवर संतापले आणि त्यांनी त्याला फटके मारवले आणि योनाथान चिटणीसाच्या घरात, जे त्यांनी कारागृह केले होते, त्यात त्याला कैद केले.

16 यिर्मयाहास भुयारागत खोलीत ठेवण्यात आले. तिथेच तो अनेक दिवस राहिला.

17 मग राजा सिद्कीयाहने यिर्मयाहला मुक्त केले व राजवाड्यात आणले, आणि खाजगीरित्या विचारले, “याहवेहकडून काही वचन आले आहे काय?” यिर्मयाह उत्तरला, “होय, तुम्हाला बाबेलच्या राजाच्या हातात सोपविण्यात येणार.”

18 नंतर यिर्मयाहने सिद्कीयाह राजाला विचारले, “मी तुमच्याविरुद्ध किंवा तुमच्या अधिकार्‍यांविरुद्ध किंवा लोकांविरुद्ध कोणते पाप केले आहे, की मला तुरुंगवासाची शिक्षा व्हावी?

19 बाबेलचा राजा तुमच्यावर किंवा या देशावर हल्ला करणार नाही, असे तुम्हाला सांगणारे ते संदेष्टे आता कुठे आहेत?

20 महाराज, माझे स्वामी, कृपया माझे ऐका. माझी विनंती तुमच्यापुढे ठेऊ द्या: मला परत त्या योनाथान चिटणीसाच्या घरात पाठवू नका, नाहीतर मी तिथे मरेन.”

21 त्यावर यिर्मयाहला अंधारकोठडीत पाठवू नये, तर त्याऐवजी राजवाड्यातील तुरुंगात ठेवावे, आणि शहरात भाकरीचा पुरवठा संपेपर्यंत, त्याला रोज एक ताजी भाकर देण्यात यावी, असा सिद्कीयाह राजाने हुकूम दिला. त्याप्रमाणे यिर्मयाहला राजवाड्यातील पहारेकरांच्या अंगणात ठेवण्यात आले.

पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™

ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.

यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.

सर्व अधिकार जगभरात राखीव.

Holy Bible, Marathi Contemporary Version™

Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.

Used with permission.

All rights reserved worldwide.

Biblica, Inc.
Lean sinn:



Sanasan