यिर्मया 15 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 तेव्हा याहवेहने मला म्हटले: “जर मोशे व शमुवेल माझ्यासमोर येऊन उभे राहिले तरीसुद्धा या लोकांकरिता माझे हृदय द्रवित होणार नाही. त्यांना माझ्या दृष्टीसमोरून घालवून दे! त्यांना जाऊ दे! 2 आणि जर त्यांनी तुला विचारले, ‘आम्ही कुठे जावे?’ तर त्यांना सांग, ‘याहवेह असे म्हणतात: “ ‘ज्यांना मरणासाठी नेमले आहे, त्यांनी मरणाकडे जावे; तलवारीने ज्यांचा वध व्हावयाचा आहे, त्यांनी तलवारीकडे जावे; उपासमारीने जे मरणार आहेत, त्यांनी दुष्काळाकडे जावे; जे बंदिवासासाठी नेमलेले आहेत, त्यांनी बंदिवासात जावे.’ 3 “मी त्यांच्यावर चार प्रकारचे संहारक नेमणार आहे,” याहवेहने असे म्हटले, “ठार करण्यासाठी तलवार, फरपटून नेण्यासाठी कुत्री, खाऊन नष्ट करण्यासाठी पक्षी व हिंस्र श्वापदे. 4 यहूदीयाचा राजा हिज्कीयाहचा पुत्र मनश्शेह, याने यरुशलेममध्ये जे अनाचार केले, त्याबद्दल मी केलेले शासन पाहून सर्व जगातील राष्ट्रांना दहशत बसेल. 5 “हे यरुशलेम, तुझ्यावर कोण दया करेल? तुझ्यासाठी कोण शोक करेल? तू कसा आहे अशी विचारपूस कोण करेल? 6 तुम्ही मला नाकारले आहे,” याहवेह असे म्हणतात. “तुमची घसरण सुरूच आहे. म्हणून मी माझे हात तुमच्याविरुद्ध करेन व तुमचा नाश करेन; विनाश राखून ठेवण्याचा मला वीट आला आहे. 7 मी शहरांच्या वेशींमध्येच त्यांना पाखडेन. मी विध्वंस आणि शोककळा माझ्या लोकांवर आणेन, कारण ते आपल्या वाईट मार्गापासून वळले नाही. 8 मी त्यांच्या विधवांची संख्या समुद्राच्या वाळूपेक्षा अगणित करेन. मी त्यांच्या तरुणांच्या आईविरुद्ध भर दुपारी मृत्यूचा विनाशक पाठवेन; अचानक त्यांच्यावर वेदना आणि क्लेश ओढवतील, 9 सात मुलांची माता बेशुद्ध होऊन मृत्युमुखी पडेल. भरदिवसा तिचा सूर्य मावळेल; आता ती अपमानित आणि लज्जित होऊन बसेल. त्यातून वाचलेल्यांना त्यांच्या वैर्यांसमक्ष मी तलवारीस बळी देईन,” याहवेहने असे जाहीर करतात. 10 हे माझ्या आई, हाय हाय, तू मला जन्म दिला, मी या सर्व राष्ट्राच्या दृष्टीने झगडा आणि विद्रोह करणारा झालो आहे! मी कोणाही कडून कर्ज घेतलेले नाही, ना कोणी माझ्याकडून घेतलेले आहे, तरीपण प्रत्येकजण मला श्राप देतात. 11 याहवेह म्हणाले, “चांगल्या कार्यासाठी मी निश्चितच तुझी सुटका करेन; तुझे शत्रू संकटात आणि क्लेशदायक समयी तुला विनवण्या करतील असे मी करेन. 12 “एखाद्या मनुष्याला लोखंड— उत्तरेकडील लोखंडाचे—किंवा कास्याचे गज मोडता येतील का? 13 “मी तुमची संपत्ती व तुमचा ठेवा बेमोबदला तुमच्या शत्रूच्या स्वाधीन करेन, कारण तुम्ही केलेल्या सर्व पातकांमुळे संपूर्ण देशात असे घडेल. 14 जो देश तुम्हाला पूर्वी कधी माहीत नव्हता, त्या देशात मी तुम्हाला तुमच्या शत्रूंचे गुलाम करेन, कारण माझा क्रोध अग्नीप्रमाणे भडकला आहे, आणि तो तुम्हाला भस्म करून टाकील.” 15 हे याहवेह, तुम्हाला सर्व कळते; माझी आठवण ठेवा व माझी काळजी घ्या. माझ्यावर अत्याचार करणाऱ्यांचा सूड घ्या, तुम्ही सहनशील आहात—मला दूर करू नका; विचार करा तुमच्यामुळे मला किती निंदा सहन करावी लागते. 16 जेव्हा तुमचे वचन माझ्याकडे आले मी ते गिळंकृत केले; ते माझा आनंद आणि माझ्या हृदयाचा उल्लास होते, याहवेह, सर्वसमर्थ परमेश्वरा, कारण मी तुमचे नाव धारण केले आहे. 17 मी चैन करण्याऱ्या लोकांमध्ये मुळीच बसलो नाही, त्यांच्यासोबत कधीच आनंद केला नाही; मी एकटाच होतो, कारण तुमचा हात माझ्यावर होता आणि तुम्ही मला त्वेषाने भरले आहे. 18 माझ्या दुःखाचा निश्चित अंत का होत नाही आणि माझ्या जखमा त्रासदायक आणि असाध्य का आहेत? तुम्ही मला एका फसविणाऱ्या झऱ्यासारखे आहात, जणू एखादा बिनपाण्याचा ओढा. 19 म्हणून याहवेहने असे म्हणतात: “जर तू पश्चात्ताप करशील, तर मी तुला पुनर्स्थापित करेन म्हणजे तू माझी सेवा करशील; जर तू अयोग्य नव्हे, तर योग्य शब्द उच्चारशील, मग तू माझ्यावतीने बोलणारा होशील. या लोकांना तुझ्याकडे परत येऊ दे, परंतु तू त्यांच्याकडे वळू नको. 20 मी तुला या लोकांसाठी भिंत बनवेन, कास्याच्या तटबंदीची भिंत; ते तुझ्याशी युद्ध करतील परंतु ते तुझ्यावर प्रभावी होणार नाहीत, तुला सोडविण्यास व तुझा बचाव करण्यास मी तुझ्यासोबत आहे,” याहवेह असे म्हणतात. 21 “या दुष्ट लोकांच्या हातातून मी तुझी सुटका करेन आणि निर्दयी लोकांच्या तावडीतून मी तुला सोडवेन.” |
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.
Biblica, Inc.