Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

शास्ते 18 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती


मीखा आणि दान गोत्र

1 त्या दिवसामध्ये इस्राएलावर कोणी राजा नव्हता. आणि त्या दिवसामध्ये दान गोत्राचे लोक स्वतः स्थायिक होण्यासाठी जागा शोधण्याचा प्रयत्न करीत होते, कारण आतापर्यंत त्यांना इस्राएलच्या गोत्रांमध्ये त्यांचे वतन मिळाले नव्हते.

2 म्हणून दानच्या लोकांनी आपल्या गोत्रातून सोराह व एष्टाओल येथील पाच प्रमुख व्यक्तींना देश हेरायला व भेद घेण्यास पाठविले. हे लोक सर्व दानी लोकांचे प्रतिनिधित्व करीत होते. त्यांनी त्यांना म्हटले, “जा आणि देशाचा भेद घेऊन या!” मग त्यांनी एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशात प्रवेश केला आणि ते मीखाहच्या घरी आले, जिथे त्यांनी रात्र घालविली.

3 जेव्हा ते मीखाहच्या घराजवळ पोहोचले, त्यांनी त्या तरुण लेवीचा आवाज ओळखला. त्यांनी त्याला बाजूला घेतले आणि विचारले, “तुला इथे कोणी आणले? या ठिकाणी तू काय करीत आहेस? तू येथे का आलास?”

4 त्याने त्यांना सांगितले की मीखाहने त्याच्यासाठी काय केले आणि त्याने म्हटले, “त्यांनी मला कामावर ठेवले आहे आणि मी त्यांचा पुरोहित आहे.”

5 तेव्हा ते त्याला म्हणाले, “आमचा प्रवास यशस्वी होईल की नाही, हे कृपया परमेश्वराला विचार.”

6 पुरोहिताने त्यांना उत्तर दिले, “शांतीने जा. तुमच्या प्रवासाला याहवेहची मंजुरी आहे.”

7 म्हणून ते पाच माणसे निघून लईश येथे आले, तिथे त्यांनी पाहिले की सर्व लोक सुरक्षितपणे राहत होते, ते सीदोनी लोकांप्रमाणे शांततेत व सुरक्षित राहत आहेत. आणि त्यांच्या जमिनीत कशाचीही कमतरता नसल्यामुळे ते समृद्ध होते. तसेच, ते सीदोनी लोकांपासून लांब राहत होते आणि इतर कोणाशीही त्यांचा संबंध नव्हता.

8 जेव्हा ते हेर सोराह व एष्टाओल येथे परतले, त्यांच्या दान भाऊबंदांनी त्यांना विचारले, “तुम्ही काय माहिती आणली आहे?”

9 त्यांनी उत्तर दिले, “चला, आपण त्यांच्यावर हल्ला करू! आम्ही तो देश पाहिला आहे आणि तो खूप चांगला आहे. तुम्ही काही करणार नाही का? तिथे जाऊन ते ताब्यात घेण्यास अजिबात संकोच करू नका.

10 जेव्हा तुम्ही तिथे पोहोचाल, तेव्हा तुम्हाला एक संशयहीन लोक आणि परमेश्वराने तुमच्या हातात दिलेली सुरक्षित प्रशस्त भूमी सापडेल, अशी भूमी जिथे कशाचीही कमतरता नाही.”

11 तेव्हा दान गोत्राचे सहाशे सैनिक सोराह व एष्टाओल येथून निघाले.

12 त्यांनी जाताना यहूदीयातील किर्याथ-यआरीम जवळ तळ दिला, यामुळे या ठिकाणाला आज देखील “महाने-दान” असेच म्हणतात.

13 तिथून ते एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशात गेले आणि मीखाहच्या घरी आले.

14 नंतर पाच व्यक्ती जे लईश हेरायला आले होते ते आपल्या दान भाऊबंदांना म्हणाले, “तुम्हाला माहीत आहे का या घरातील एका घरात एक एफोद, काही कुलदेवता आणि अनेक रुप्याचा मुलामा दिलेल्या मूर्ती आहेत? आता काय करावयाचे हे तुम्हाला माहीत आहे.”

15 म्हणून ते तिथे वळले आणि मीखाहकडील त्या तरुण लेवीच्या घरी जाऊन त्याला अभिवादन केले.

16 युद्धासाठी सज्ज असलेले दानी गोत्राचे सहाशे सैनिक प्रवेशद्वाराजवळ उभे होते.

17 मग ते पाच पुरुष, जे तो देश हेरायला गेले होते, ते आत गेले आणि त्यांनी तेथील मूर्ती, एफोद, आणि कुलदेवता घेतली, जेव्हा पुरोहित आणि सहाशे सैनिक बाहेर प्रवेशद्वाराजवळ उभे होते.

18 जेव्हा ते पाच पुरुष मीखाहच्या घरी गेले आणि त्यांनी मूर्ती, एफोद, आणि कुलदेवता उचलत असता, पुरोहित त्यांना म्हणाला, “तुम्ही हे काय करत आहे?”

19 त्यांनी त्याला उत्तर दिले, “शांत राहा! एक शब्द सुद्धा बोलू नकोस. आमच्याबरोबर ये आणि आमचा पिता आणि पुरोहित हो. केवळ एका मनुष्याचा पुरोहित होऊन राहण्यापेक्षा, इस्राएलातील एक संपूर्ण गोत्र आणि वंशाचा पुरोहित होऊन राहणे अधिक चांगले नाही का?”

20 तेव्हा त्या पुरोहिताला अतिशय आनंद झाला. त्याने एफोद, कुलदेवता आणि मूर्ती घेतली आणि तो त्या लोकांबरोबर गेला.

21 मग ते फिरले आणि कूच करीत असताना ते आपली लहान मुले, गुरे आणि सामान अग्रभागी घेऊन चालले.

22 जेव्हा ते मीखाहच्या घरापासून काही दूर गेले असता, मीखाहचे शेजारी एकत्र आले आणि त्यांनी दानच्या लोकांना गाठले.

23 जेव्हा त्यांनी दानच्या लोकांना हाक मारली तेव्हा ते वळले आणि मीखाहला विचारले, “तुला काय झाले आहे की तू आपल्या लोकांना युद्ध करण्यास घेऊन आला आहेस?”

24 मीखाहने प्रत्युत्तर दिले, “जे दैवत मी तयार केले त्यांना आणि माझा पुरोहित याला तुम्ही घेऊन जात आहात. आणि उलट तुम्हीच मला विचारता? मला काय हवे आहे. ‘आता माझ्याजवळ काहीही राहिलेले नाही?’ ”

25 त्यावर दानच्या लोकांनी उत्तर दिले, “आमच्यासोबत वाद घालू नकोस, नाहीतर काही माणसांना राग येईल आणि ते तुझ्यावर हल्ला करतील आणि तुला आणि तुझ्या कुटुंबीयांनी आपला जीव गमवावा लागेल.”

26 मग दानचे लोक आपल्या मार्गाने गेले आणि मीखाहने पाहिले ते लोक फार शक्तिशाली आहेत, तेव्हा तो माघारी फिरला आणि आपल्या घरी गेला.

27 मग मीखाहने जे बनविले होते आणि त्याच्या पुरोहितासह दानचे लोक लईश या शहरात येऊन दाखल झाले. तेथील लोक शांत आणि सुरक्षित होते. त्यांनी त्यांच्यावर तलवारीने हल्ला केला आणि त्यांचे शहर जाळून टाकले.

28 त्यांना वाचविणारा कोणी नव्हता, कारण ते सीदोनापासून दूर राहत होते आणि त्यांचा इतर लोकांशी कसलाही व्यवहार नव्हता. हे शहर बेथ-रहोब शेजारी असलेल्या खोर्‍यात होते. मग दानच्या लोकांनी ते शहर पुन्हा बांधले आणि ते तिथे राहू लागले.

29 त्यांनी त्या शहरास आपला पूर्वज, इस्राएलचा एक पुत्र दान त्याचे नाव दिले—त्या शहराचे मूळ नाव लईश होते.

30 मग दानच्या लोकांनी आपणासाठी मूर्तीची स्थापना केली व गेर्षोमाचा पुत्र, मोशेचा नातू योनाथान आणि त्याच्या पुत्रास, त्या देशाचा त्याच्या शत्रूकडून पाडाव होईपर्यंत दानच्या गोत्राचे पुरोहित म्हणून नेमले.

31 अशा रीतीने जोपर्यंत परमेश्वराचे निवासस्थान शिलोह येथे होते, तोपर्यंत मीखाहने तयार केलेली मूर्तीची उपासना दानच्या लोकांकडून केली जात होती.

पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™

ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.

यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.

सर्व अधिकार जगभरात राखीव.

Holy Bible, Marathi Contemporary Version™

Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.

Used with permission.

All rights reserved worldwide.

Biblica, Inc.
Lean sinn:



Sanasan