Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

शास्ते 13 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती


शमशोनाचा जन्म

1 पुन्हा इस्राएली लोकांनी याहवेहच्या दृष्टीने वाईट ते केले, म्हणून याहवेहने त्यांना चाळीस वर्षे पलिष्टी लोकांच्या अंमलाखाली ठेवले.

2 दान कुळातील सोराह येथील एक मनुष्य होता, ज्याचे नाव मानोहा होते, त्याची पत्नी होती, जी वांझ असून ती लेकरांना जन्म देऊ शकत नव्हती.

3 याहवेहच्या दूताने तिला दर्शन दिले आणि म्हणाला, “तू वांझ आहे आणि तुला मूल नाही, तरीपण तू गर्भवती होशील आणि एका पुत्राला जन्म देशील.

4 तू द्राक्षारस किंवा मद्य घेऊ नकोस आणि अशुद्ध असलेले काहीही सेवन करू नकोस.

5 कारण तू गर्भवती होशील आणि पुत्राला जन्म देशील, गर्भावस्थेपासूनच तो परमेश्वराला समर्पित नाजीर असा होईल म्हणून त्याच्या केसाला वस्तऱ्याचा स्पर्श करू नकोस, कारण इस्राएलला पलिष्ट्यांच्या हातून सोडविण्यास तोच नेतृत्व करेल.”

6 तेव्हा ती स्त्री आपल्या पतीकडे गेली आणि त्याला सांगितले, “परमेश्वराचा एक पुरुष माझ्याकडे आला. तो परमेश्वराच्या दूतासारखा दिसत होता, अतिशय अद्भुत. तो कुठून आला होता हे मी त्याला विचारले नाही आणि त्याने आपले नावही मला सांगितले नाही.

7 परंतु त्याने मला सांगितले, ‘तू गर्भवती होशील आणि एक पुत्रास जन्म देशील. आतापासून द्राक्षारस किंवा मद्य घेऊ नको, अशुद्ध असे काहीही खाऊ नको, कारण ते बाळ, तो पुत्र गर्भावस्थेपासून त्याच्या मृत्यूपर्यंत परमेश्वराचा नाजीर असा होईल.’ ”

8 तेव्हा मानोहाने याहवेहला प्रार्थना केली: “हे प्रभू, तुमच्या सेवकाला क्षमा करा. परमेश्वराचा दूत पुन्हा आमच्याकडे येईल असे करा म्हणजे जे बाळ जन्मास येणार आहे त्याचे संगोपन कसे करावे ते आम्हास शिकवेल.”

9 परमेश्वराने मानोहानाच्या प्रार्थनेचे उत्तर दिले आणि परमेश्वराचा दूत परत त्या स्त्रीकडे आला, जेव्हा ती शेतात बसलेली होती; परंतु तिचा पती मानोहा तिच्याबरोबर नव्हता

10 म्हणून ती स्त्री लगबगीने आपल्या पतीस सांगण्यास गेली, “जो पुरुष त्या दिवशी माझ्या दृष्टीस पडला होता तो इथे आहे!”

11 मानोहा उठला आणि आपल्या पत्नीसह त्या ठिकाणी गेला, तो त्या पुरुषाजवळ गेला व त्याला विचारले, “त्या दिवशी माझ्या पत्नीशी बोलणारे आपणच आहात का?” त्याने उत्तर केले, “मीच आहे.”

12 “तेव्हा मानोहाने त्याला विचारले, जेव्हा तुमचे शब्द पूर्ण होतील तेव्हा त्या बाळाच्या कार्यासाठी व जीवनासाठी कोणते नियम असावे?”

13 याहवेहच्या दूताने मानोहाला उत्तर दिले, “तुझ्या पत्नीने जे मी तिला सांगितले आहे ते सर्व तिने करावे.

14 तिने द्राक्षाच्या वेलीतून आलेले कोणतेही उपज खाऊ नये, द्राक्षारस किंवा मद्य पिऊ नये किंवा जे अशुद्ध आहे असे काहीही खाऊ नये. ज्या सर्व आज्ञा तिला दिल्या आहेत त्या तिने पाळाव्या.”

15 मानोहा याहवेहच्या दूतास म्हणाला, “आम्ही आपणासाठी करडू तयार करेपर्यंत आपण येथेच थांबावे.”

16 याहवेहच्या दूताने उत्तर दिले, “तुम्ही मला रोखून धरले तरी मी तुमचे भोजन खाणार नाही. पण जर तुम्ही होमार्पण तयार केले तर ते याहवेहला अर्पण करा.” (हा याहवेहचा दूत आहे, हे अद्यापही मानोहाला समजले नव्हते.)

17 नंतर मानोहाने याहवेहच्या दूताला विचारले, “आपले नाव काय? म्हणजे तुमचे शब्द खरे ठरल्यानंतर आम्ही तुमचा आदर करू.”

18 याहवेहच्या दूताने उत्तर दिले, “तू माझे नाव का विचारतो? हे समजण्यापलीकडे आहे.”

19 मग मानोहाने एक तरुण करडू घेतले आणि ते अन्नबलीसह याहवेहला एका खडकावर अर्पिले. आणि जेव्हा मानोहा आणि त्याची पत्नी हे पाहत असताना याहवेहने आश्चर्यकारक कृत्ये केली:

20 मानोहा व त्याची पत्नी पाहत असताना वेदीवरून आकाशाकडे उफाळून वर जाणार्‍या अग्नीच्या ज्वालेवर याहवेहच्या दूताने आरोहण केले. ते पाहून मानोहा आणि त्याची पत्नी यांनी दंडवत घातले.

21 जेव्हा याहवेहचा दूत मानोहा आणि त्याच्या पत्नीला परत प्रकट झाला नाही, तेव्हा मानोहाला हे कळले की तो याहवेहचा दूत होता.

22 “आता आपला मृत्यू निश्चित आहे!” मानोहा त्याच्या पत्नीला म्हणाला. “आम्ही परमेश्वराला पाहिले आहे!”

23 परंतु त्याची पत्नीने उत्तर दिले, “जर याहवेहला आपल्याला मारून टाकावयाचे असते, तर त्यांनी आपल्या हातांनी होमबली व अन्नार्पण स्वीकारले नसते, आपल्याला या सर्व अद्भुत गोष्ट प्रकट केली नसती वा आपल्याला सांगितलीही नसती.”

24 मग त्या स्त्रीने एका मुलाला जन्म दिला आणि त्याचे नाव शमशोन ठेवले. तो वाढत गेला आणि याहवेहने त्याला आशीर्वाद दिला,

25 सोराह आणि एष्टाओल यांच्यामध्ये महनेह दान येथे असताना याहवेहचा आत्मा त्याला प्रवृत्त करू लागला.

पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™

ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.

यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.

सर्व अधिकार जगभरात राखीव.

Holy Bible, Marathi Contemporary Version™

Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.

Used with permission.

All rights reserved worldwide.

Biblica, Inc.
Lean sinn:



Sanasan