शास्ते 12 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्तीइफ्ताह आणि एफ्राईम 1 मग एफ्राईमच्या लोकांनी आपले सैन्य एकवटली आणि ते पार होऊन साफोन येथे आले. ते इफ्ताहाला म्हणाले, “आम्हाला सोबत न घेता तू अम्मोन्यांशी लढावयास का गेलास? आता आम्ही तुझ्यासह तुझे घर जाळून टाकणार आहोत.” 2 इफ्ताहाने प्रत्युत्तर दिले, “मी आणि माझ्या लोकांचे अम्मोन्यांशी फार मोठे भांडण झाले आणि मी तुम्हाला बोलाविले देखील होते, पण तुम्ही मला त्यांच्या हातातून सोडविले नाही. 3 जेव्हा मी हे पहिले तुम्ही मदतीला येत नाही, तेव्हा मी माझा जीव मुठीत घेतला आणि अम्मोनी लोकांवर चालून गेलो आणि याहवेहने मला त्यांच्यावर विजय दिला. मग आज तुम्ही आमच्याविरुद्ध लढावयास का आले?” 4 मग इफ्ताहाने गिलआदाच्या माणसांना एकत्र बोलाविले आणि एफ्राईमच्या विरुद्ध युद्ध केले. गिलआदाच्या माणसांनी एफ्राईमच्या लोकांना मारले, कारण ते म्हणाले होते, “तुम्ही गिलआदाचे लोक एफ्राईमातून व मनश्शेहतून पळपुटे आहात.” 5 गिलआदांनी एफ्राईमकडे जाणारे यार्देनेचे खोरे काबीज केले आणि जेव्हा एफ्राईममधील कोणी वाचला व म्हणाला, “मला ओलांडू दे,” तेव्हा गिलआदाचे लोक त्याला विचारीत, “तू एफ्राईमी आहेस का?” जर तो म्हणाला, “नाही,” 6 ते म्हणत, “ठीक आहे मग ‘शिब्बोलेथ म्हण.’ ” जर तो “सीब्बोलेथ,” म्हणाला, कारण तो ते शब्द नीट उच्चारू शकला नाही, तर ते त्याला धरत आणि त्याला यार्देनेच्या उतारावर ठार करीत. त्यावेळी एफ्राईमचे बेचाळीस हजार लोक ठार झाले. 7 इफ्ताहाने सहा वर्षे इस्राएलचे नेतृत्व केले. मग गिलआदी इफ्ताह मरण पावला आणि त्याला गिलआदाच्या एका गावात पुरण्यात आले. इब्झान, एलोन आणि अब्दोन 8 त्याच्यानंतर बेथलेहेमच्या इब्झानने इस्राएलचे नेतृत्व केले. 9 त्याला तीस पुत्र आणि तीस कन्या होत्या. त्याने आपल्या कन्यांचा विवाह परकीय कुळात केला आणि आपल्या पुत्रांसाठी त्याने तीस तरुण स्त्रियांना परकीय कुळांतून आणल्या. इब्झानने इस्राएलचे नेतृत्व सात वर्षे केले. 10 नंतर इब्झान मरण पावला आणि त्याला बेथलेहेमात मूठमाती देण्यात आली. 11 त्याच्यानंतर एलोन जबुलून याने दहा वर्षे इस्राएलचे नेतृत्व केले. 12 मग एलोन मरण पावला आणि त्याला जबुलून देशातील अय्यालोनमध्ये पुरण्यात आले. 13 त्याच्यानंतर पिराथोन येथील हिल्लेलचा मुलगा अब्दोन याने इस्राएलचे नेतृत्व केले. 14 त्याला चाळीस पुत्र आणि तीस नातू होते, ते सत्तर गाढवांवर स्वार होते. त्याने आठ वर्षे इस्राएलचे नेतृत्व केले. 15 मग हिल्लेलचा पुत्र अब्दोन मरण पावला आणि त्याला अमालेक्यांच्या डोंगराळ प्रदेशात एफ्राईममधील पिराथोन येथे पुरण्यात आले. |
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.
Biblica, Inc.