याकोब 3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्तीजीभ ताब्यात ठेवणे 1 माझ्या विश्वासू बंधूंनो, तुम्हातील पुष्कळांनी शिक्षक होऊ नये, कारण तुम्हाला माहीत आहे की जे आपण शिक्षक आहोत त्या आपला न्याय अधिक कठोरपणे होईल. 2 आपण सर्वजण अनेक प्रकारे अडखळतो. जर कोणी बोलण्यात कधीही चुकत नाही, तर तो परिपूर्ण आहे व आपले सर्व शरीर ताब्यात ठेवण्यास समर्थ आहे. 3 घोड्यांनी आज्ञा पाळावी म्हणून आम्ही त्याच्या तोंडात लगाम घालतो व त्याद्वारे संपूर्ण प्राण्याचे शरीर वळवू शकतो. 4 किंवा तारवांचे उदाहरण घ्या, ही तारवे खूप मोठी असतात व प्रबळ वार्यांनी ती लोटली जातात, तरी चालकाची इच्छा असते तिकडे ती अगदी लहानशा सुकाणाने वळविता येतात. 5 त्याचप्रमाणे, जीभ ही शरीराचा लहान अवयव आहे, परंतु ती मोठ्या गोष्टींची फुशारकी मारते. विचार करा, मोठ्या जंगलाला पेटविण्यासाठी आगीची एक लहान ठिणगी पुरेशी आहे. 6 जीभ सुद्धा आग आहे, आपल्या शरीराच्या अवयवांमध्ये ती दुष्टतेचे जग आहे. ती संपूर्ण शरीराला भ्रष्ट करते, एखाद्याच्या जीवनाला आग लावते आणि स्वतः नरकाच्या अग्नीने पेटलेली आहे. 7 सर्वप्रकारचे प्राणी, पक्षी आणि सरपटणारे प्राणी आणि समुद्रातील प्राणी वश झाले आहेत आणि त्यांना मनुष्यप्राण्याने वश केले आहे. 8 परंतु कोणताही मनुष्यप्राणी जिभेला वश करू शकत नाही. ती चंचल दुष्ट, प्राणघातक विषाने पूर्णपणे भरलेली आहे. 9 या जिभेने आपल्या प्रभू आणि पित्याची आपण स्तुती करतो, आणि याच जिभेने ज्याला परमेश्वराच्या प्रतिमेप्रमाणे बनविले आहे अशा मनुष्यप्राण्याला शाप देतो. 10 याप्रकारे स्तुती आणि शाप एकाच मुखातून निघतात. प्रिय बंधू आणि भगिनींनो, असे असू नये. 11 एकाच झर्यातून दोन्ही प्रकारचे ताजे पाणी आणि खारट पाणी वाहू शकते काय? 12 माझ्या बंधूंनो व भगिनींनो, अंजिराचे झाड जैतुनाची फळे आणि द्राक्षवेल अंजीर उत्पन्न करू शकेल काय? नाही, तसेच खार्या पाण्याचा झरा ताजे पाणी देणार नाही. ज्ञानाचे दोन प्रकार 13 तुम्हामध्ये ज्ञानी आणि समंजस कोण आहे? त्याने ज्ञानाच्या लीनतेने आपल्या चांगल्या वर्तणुकीद्वारे आपले ज्ञान दाखवावे. 14 परंतु तुम्ही कटुता, मत्सर आणि स्वार्थी इच्छा आपल्या अंतःकरणात बाळगत असाल, तर पोकळ बढाई मारू नका किंवा सत्य नाकारू नका. 15 अशा प्रकारचे ज्ञान हे स्वर्गातून उतरत नाही, परंतु ते पृथ्वीवरील अनीतिमान व सैतानाकडून आहे. 16 कारण जिथे मत्सर अथवा स्वार्थी हेतू असेल, तिथे अव्यवस्था व सर्व दुराचारी व्यवहार असतो. 17 परंतु स्वर्गातून येणारे ज्ञान हे सर्वप्रथम शुद्ध, नंतर शांतिप्रिय, विचारशील, विनयी, दयामयी व चांगली फळे यांनी भरलेले, अपक्षपाती आणि प्रामाणिक असते. 18 शांती करणारे शांतीचे बीज पेरतात आणि ते नीतिमत्वाचे पीक काढतात. |
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.
Biblica, Inc.