Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

याकोब 2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती


पक्षपातास मनाई

1 प्रिय बंधू आणि भगिनींनो, गौरवशाली प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणारे आपण पक्षपात करू नये.

2 एखादा मनुष्य तुमच्या सभांमध्ये सोन्याची अंगठी घातलेला आणि उंची कपडे परिधान केलेला आला, व एक गरीब मनुष्य जुने आणि मळीन कपडे घातलेला आला.

3 तर तुम्ही ज्याने उंची कपडे परिधान केले आहेत त्याच्याकडे विशेष लक्ष देता आणि म्हणता, “ही जागा तुमच्यासाठी चांगली आहे,” परंतु त्या गरीब मनुष्याला म्हणता, “तिथे उभा राहा” किंवा “माझ्या पायाजवळ जमिनीवर बस,”

4 तुम्ही आपसात भेदभाव केला की नाही आणि दुष्ट विचारांनी न्याय करणारे झाले की नाही?

5 माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो ऐका, परमेश्वराने जगाच्या दृष्टीने जे दरिद्री आहेत त्यांना विश्वासामध्ये धनवान होण्यास आणि जे त्याच्यावर प्रीती करतात त्यांना वचनानुसार राज्याचे वारस होण्यास निवडले नाही का?

6 परंतु तुम्ही गरिबांचा अपमान केला आहे. धनवान लोकच तुमचे शोषण करतात की नाही? तेच लोक तुम्हाला न्यायालयात खेचतात की नाही?

7 ज्या उत्कृष्ट नावावरून तुमची ओळख होते, त्या नावाची निंदा करणारे तेच नाहीत का?

8 “जशी तुम्ही स्वतःवर तशी तुमच्या शेजार्‍यावर प्रीती करा,” हा शास्त्र वचनात आढळणारा राजमान्यनियम तुम्ही पाळता तर चांगले करता.

9 पण तुम्ही पक्षपात करता, तर पाप करता आणि नियम मोडणारे म्हणून नियमानुसार दोषी ठरता.

10 जो कोणी सर्व नियम पाळतो, परंतु एका बाबीविषयी अडखळतो तो सर्व नियम मोडणार्‍या एवढाच दोषी आहे.

11 ज्यांनी म्हटले, “तू व्यभिचार करू नको,” तोच हे सुद्धा म्हणतो, “तू खून करू नको.” जर तू व्यभिचार करीत नाही परंतु खून करतो, तर तू नियम मोडणारा होतो.

12 स्वतंत्रता देणार्‍या नियमाद्वारे तुमचा न्याय होणार आहे म्हणून बोला व कृती करा,

13 कारण जे कोणी दयावान नाहीत त्यांचा न्याय दयेवाचून होईल. दया न्यायावर विजय मिळविते.


विश्वास आणि कर्मे

14 माझ्या बंधू आणि भगिनींनो, जर कोणी असा दावा करतो की त्याच्याजवळ विश्वास आहे, परंतु क्रिया नाही तर त्यापासून काय लाभ? अशा विश्वासाने त्यांचे तारण होऊ शकेल का?

15 समजा तुमच्या बंधू किंवा भगिनीला वस्त्र आणि रोजच्या अन्नाची उणीव आहे.

16 जर तुमच्यापैकी एकजण त्यांना म्हणतो, “शांतीने जा; ऊब घ्या व खाऊन तृप्त व्हा,” परंतु त्यांच्या शारीरिक गरजासंबंधी काही करीत नाही, तर काय उपयोग?

17 त्याचप्रमाणे, विश्वासाला जर कृतीची जोड नसली तर तो निर्जीव आहे.

18 पण कोणी म्हणेल, “तुझ्याजवळ विश्वास आहे; आणि माझ्याकडे क्रिया आहे.” तुझा विश्वास क्रियांवाचून मला दाखव आणि मी माझा विश्वास माझ्या कृत्यांद्वारे सिद्ध करतो.

19 परमेश्वर एकच आहे असा तुमचा विश्वास आहे. तर उत्तम! दुरात्मे देखील विश्वास धरतात आणि भीतीने थरथर कापतात.

20 अरे मूर्ख माणसा, कृती शिवाय विश्वास व्यर्थ आहे याचा तुला पुरावा पाहिजे का?

21 आपला पिता अब्राहामाने त्याचा पुत्र इसहाकाला वेदीवर अर्पण केले आणि त्या कृत्यामुळे त्याला नीतिमान ठरविण्यात आले नाही का?

22 तुम्हीच पाहा, त्याचा विश्वास आणि कृती एकत्रित कार्य करत होते आणि त्याने जे काही केले त्याद्वारे त्याचा विश्वास पूर्ण झाला.

23 आणि जे शास्त्रलेखात सांगितले ते पूर्ण झाले, “अब्राहामाने परमेश्वरावर विश्वास ठेवला आणि ते त्याला नीतिमत्व असे गणण्यात आले,” आणि त्याला परमेश्वराचा मित्र म्हणण्यात आले.

24 तर मग तुम्ही पाहा मनुष्य केवळ विश्वासाने नव्हे तर कृतीने नीतिमान ठरतो.

25 त्याचप्रमाणे, राहाब वेश्याने हेरांना राहण्यासाठी जागा दिली आणि त्यांना दुसर्‍या मार्गाने पाठवून दिले, यात ती तिच्या कृत्यामुळे नीतिमान ठरली नाही का?

26 जसे शरीर आत्म्यावाचून निर्जीव आहे, तसा विश्वासही क्रियांवाचून निर्जीव आहे.

पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™

ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.

यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.

सर्व अधिकार जगभरात राखीव.

Holy Bible, Marathi Contemporary Version™

Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.

Used with permission.

All rights reserved worldwide.

Biblica, Inc.
Lean sinn:



Sanasan