यशायाह 8 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्तीचिन्हे म्हणून यशायाह आणि त्याची मुले 1 याहवेह मला म्हणाले, “एक मोठी चर्मपत्राची पाटी घे आणि त्याच्यावर एका साध्या लेखणीने लिही: महेर-शालाल-हश-बाज.” 2 म्हणून मी उरीयाह याजकाला आणि यबेरेक्याहचा पुत्र जखर्याहला माझ्यासाठी विश्वसनीय साक्षीदार म्हणून बोलाविले. 3 तेव्हा मी माझी पत्नी, जी संदेष्टी आहे, तिच्याशी प्रीतिसंबंध केला आणि ती गरोदर राहिली आणि तिने एका मुलाला जन्म दिला. आणि याहवेह मला म्हणाले, “त्याचे नाव महेर-शालाल-हश-बाज असे ठेव. 4 कारण त्या मुलाला ‘माझे वडील’ किंवा ‘माझी आई’ कसे म्हणायचे हे समजून येण्याआधीच दिमिष्कची संपत्ती आणि शोमरोनची लूट अश्शूरच्या राजाकडून नेली जाईल.” 5 याहवेह पुन्हा माझ्याबरोबर असे बोलले: 6 “कारण या लोकांनी हळूवारपणे वाहणारे शिलोहचे पाणी नाकारले आहे आणि रसीन आणि रमाल्याहच्या पुत्राबद्दल आनंद व्यक्त केला आहे. 7 म्हणून प्रभू आता त्यांच्यावर फरात नदीचे महाप्रलय आणणार आहे— अश्शूरचा राजा त्याच्या सर्व वैभवात हे आणणार आहे. ते त्याच्या सर्व खाडींवरून भरून वाहील, त्याच्या सर्व किनाऱ्यांवरून वाहील, 8 हे इम्मानुएला! तो महाप्रलय यहूदीयावरही चढेल, तिच्यावरून गरगर फिरेल, तिच्यामधून जाईल आणि तिच्या गळ्यापर्यंत पोहोचेल. त्याचे पसरलेले पंख तुमच्या देशाचा विस्तार झाकून टाकतील.” 9 युद्धाची रणगर्जना करा, हे देशांनो, तुम्ही मोडून जाल! दूर राहणाऱ्या लोकांनो ऐका, युद्धासाठी सज्ज व्हा आणि विखरून जा! युद्धासाठी सज्ज व्हा आणि विखरून जा! 10 तुमची रणनीती तयार करा, परंतु ती उलथवून टाकली जाईल; तुमची योजना सुचवा, परंतु ती चालणार नाही, कारण परमेश्वर आमच्याबरोबर आहेत. 11 याहवेहचा शक्तिशाली हात माझ्यावर ठेवून मला असे म्हणतात, या लोकांच्या मार्गाचे अनुसरण करू नकोस: 12 “ज्या सर्वाला हे कारस्थान म्हणतात त्या प्रत्येक गोष्टीला तुम्ही कारस्थान म्हणू नका; त्यांना ज्याचे भय वाटते त्याला तुम्ही भिऊ नका, आणि त्याची धास्ती घेऊ नका. 13 याहवेह जे सर्वसमर्थ आहेत, त्यांना तुम्ही पवित्र मानावे, तेच आहेत ज्यांचे तुम्ही भय धरावे, तेच आहेत ज्यांना तुम्ही घाबरावे. 14 इस्राएल आणि यहूदीया या दोघांसाठी; ते एक पवित्रस्थान असतील, लोकांना ठेच लागण्याचा एक दगड व अडखळण्याचा एक खडक, ज्यामुळे ते पडतील. आणि यरुशलेमच्या लोकांसाठी तो एक सापळा आणि पाश होईल. 15 त्यांच्यापैकी पुष्कळजण अडखळतील; ते पडतील आणि तुटून जातील, ते जाळ्यात अडकतील आणि बंदिवान केले जातील.” 16 चेतावणीच्या या साक्षीला बांधून घ्या आणि परमेश्वराची ही शिकवण माझ्या शिष्यांमध्ये मोहोरबंद करा. 17 मी याहवेहची वाट पाहीन जे त्यांचे मुख याकोबाच्या वंशजांपासून लपवित आहेत. मी त्यांच्यावर माझा भरवसा ठेवेन. 18 मी आणि याहवेहने मला दिलेली लेकरेही येथे आहेत. आम्ही, सीयोन पर्वतावर राहणारे सर्वसमर्थ याहवेहकडून इस्राएलला मिळालेले चिन्ह व प्रतीक आहोत. अंधकार प्रकाशात बदलतो 19 जेव्हा कोणी तुम्हाला प्रेतात्म्यांकडून अर्थ सांगणाऱ्यांचा सल्ला आणि भूतविद्येचा सल्ला घेण्यास सांगतात, जे कुजबुजतात आणि पुटपुटतात, त्यांच्याकडे लोकांनी त्यांच्या परमेश्वराबद्दल विचारणा करावी काय? जिवंत लोकांसाठी मृतांचा सल्ला का घ्यावा? 20 परमेश्वराच्या सूचनेचा आणि चेतावणीच्या साक्षीचा सल्ला घ्या. जर कोणी या शब्दाप्रमाणे बोलत नसेल तर त्यांच्याकडे पहाटेचा प्रकाश नाही. 21 दुःखी आणि भुकेले असे ते देशभर फिरत राहतील; जेव्हा ते भुकेने व्याकूळ होतील, तेव्हा ते रागावतील आणि वर पाहतील आणि त्यांच्या राजाला आणि त्यांच्या परमेश्वराला शाप देतील. 22 तेव्हा ते खाली पृथ्वीकडे पाहतील आणि त्यांना फक्त संकट, अंधकार आणि भयभीत करणारी निस्तेज काळोखी दिसेल आणि त्यांना गडद अंधारात ढकलण्यात येईल. |
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.
Biblica, Inc.