Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

यशायाह 63 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती


परमेश्वराच्या सुडाचा आणि उद्धाराचा दिवस

1 एदोमाहून व बस्रा शहराहून, किरमिजी रंगाने रंगविलेली वस्त्रे घालून, वैभवी वस्त्रे परिधान करून त्यांच्या महान सामर्थ्याने वेगाने पावले पुढे टाकत येणारे हे कोण आहेत? “विजयाची घोषणा करीत, तारण करण्यास समर्थ असलेला, हा मी आहे.”

2 तुमची वस्त्रे द्राक्षकुंडात तुडविणार्‍यांसारखी लाल रंगाची का आहेत?

3 “द्राक्षकुंड मी एकट्यानेच तुडविले; राष्ट्रातून माझ्यासोबत कोणी नव्हते. माझ्या क्रोधाने मी ती तुडविली आणि त्यांना आपल्या संतापाने चिरडले; त्यांचेच रक्त माझ्या वस्त्रांवर उडाले, म्हणून माझी सर्व वस्त्रे माखली.

4 माझ्याकरिता तो सूड घेण्याचा दिवस होता; आणि ते उद्धार करण्याचे वर्ष आले होते.

5 मी शोधले, परंतु तिथे साहाय्याला कोणीही नव्हते, कोणी मदतीला नसल्यामुळे मला धक्का बसला; तेव्हा माझ्या स्वतःच्या बाहूने माझ्याकरिता मी उद्धार मिळविला, आणि माझ्या स्वतःच्या क्रोधाने मला राखले.

6 क्रोधाच्या भरात मी राष्ट्रांना तुडविले; माझ्या संतापाच्या भरात मी त्यांना मद्यधुंद केले आणि त्यांचे रक्त जमिनीवर ओतले.”


स्तुती आणि प्रार्थना

7 मी याहवेहच्या दयाळूपणाबद्दल त्यांनी केलेल्या सर्व स्तुतिपात्र कृत्यांबद्दल सांगेन, जे सर्व याहवेहनी आमच्यासाठी केले— होय, ज्या अनेक गोष्टी त्यांच्या करुणेने व विपुल दयेने, त्यांनी इस्राएलसाठी केल्या.

8 ते म्हणाले, “ते निश्चितच माझे लोक आहेत, जी लेकरे माझ्याशी एकनिष्ठ राहतील;” म्हणून ते त्यांचे तारणकर्ता झाले.

9 त्यांना होणार्‍या सर्व क्लेशांनी तेही व्यथित झाले, आणि त्यांच्या समक्षतेच्या स्वर्गदूताने इस्राएलचा उद्धार केला. याहवेहच्या प्रीती व करुणेमुळेच त्यांनी त्यांचा उद्धार केला; व त्यांना उचलून प्राचीन कालापासून त्यांचा भार वाहिला.

10 तरीही त्यांनी बंड केले व याहवेहच्या पवित्र आत्म्याला खिन्न केले. म्हणून याहवेह मागे वळले व त्यांचे शत्रू झाले आणि याहवेहने स्वतः त्यांच्याविरुद्ध लढा दिला.

11 मग त्यांच्या लोकांना पूर्वीचे दिवस आठवले, मोशे आणि त्यांच्या लोकांचे दिवस— ज्यांनी त्यांच्या मेंढपाळासह पूर्ण कळपाला समुद्रमार्गी बाहेर काढले, ते कुठे आहेत? त्यांच्यामध्ये आपला पवित्र आत्मा पाठविणारे ते कुठे आहेत?

12 मोशेच्या उजव्या हाताजवळ राहण्यासाठी आपल्या प्रतापी सामर्थ्याची भुजा पाठविणारे, त्यांच्यासमोर समुद्राच्या जलास दुभागून अजरामर किर्ती मिळविली,

13 समुद्राच्या तळातून त्यांना कोणी पार नेले? उघड्या रानात असणार्‍या घोड्यांप्रमाणे, ते कधी अडखळले नाहीत;

14 जशी गुरे सपाटीवर जातात, तसे याहवेहच्या आत्म्याने त्यांना विसावा दिला. आपले नाव प्रतापी व्हावे म्हणून तुम्ही तुमच्या लोकांचे मार्गदर्शन केले.

15 हे याहवेह, स्वर्गातून अवलोकन करा व पाहा, तुमच्या भव्य, पवित्र, गौरवी सिंहासनावरून खाली पाहा. तुमचा तो आवेश व तुमचे सामर्थ्य कुठे आहेत? तुमची आमच्यावरील कोमलता व करुणा आम्हाला देण्याचे तुम्ही आवरून धरले आहे.

16 परंतु तुम्हीच आमचे पिता आहात, जरी अब्राहाम आम्हाला ओळखत नाही इस्राएलने आम्हाला नाकारले आहे; तरी तुम्ही, हे याहवेह, आमचे पिता आहात, आमचे युगायुगांचे उद्धारकर्ता, हेच तुमचे नाव आहे.

17 हे याहवेह, तुम्ही आम्हाला तुमच्या मार्गावरून भटकून का जाऊ दिले? आणि आम्ही तुमचा सन्मान करणार नाही, अशी आमची अंतःकरणे कठीण का केली? जे वंशज तुमचे वारस आहेत, त्या तुमच्या सेवकांप्रीत्यर्थ परत या.

18 थोड्या काळाकरिता तुमच्या लोकांनी तुमच्या पवित्र भूमीचा ताबा घेतला, परंतु आता आमच्या शत्रूंनी तुमच्या पवित्रस्थानास तुडविले आहे.

19 तुम्ही प्राचीन काळापासून अस्तित्वात आहात; पण तुम्ही त्यांच्यावर राज्य केले नाही, ते तुमच्या नावाने संबोधले जात नाहीत.

पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™

ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.

यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.

सर्व अधिकार जगभरात राखीव.

Holy Bible, Marathi Contemporary Version™

Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.

Used with permission.

All rights reserved worldwide.

Biblica, Inc.
Lean sinn:



Sanasan