Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

यशायाह 42 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती


याहवेहचा सेवक

1 “पाहा, हा माझा सेवक! याला माझे पाठबळ आहे! माझा निवडलेला, ज्याच्याविषयी मी संतुष्ट आहे; माझा आत्मा मी त्याच्या ठायी ठेवेन. राष्ट्रांना तो न्याय आणेल.

2 तो ओरडणार नाही किंवा आक्रोश करणार नाही. किंवा रस्त्यांमध्ये त्याचा आवाज उंचावणार नाही.

3 चेपलेला बोरू तो मोडणार नाही. मिणमिणती वात तो विझविणार नाही. तो विश्वासूपणाने न्यायदान करेल;

4 पृथ्वीवर नीतिमत्वाचे अधिराज्य स्थापेपर्यंत, तो अडखळणार नाही किंवा निराश होणार नाही त्याच्या शिक्षणावर द्वीपही आशा ठेवतील.”

5 परमेश्वर याहवेह हे असे म्हणतात— आकाश निर्माण करून ते विस्तारणारे, पृथ्वीवर सर्वकाही उगविणारे व ते पसरविणारे, ते तिच्यावरील लोकांना श्र्वास प्रदान करतात, आणि जे तिच्यावरून चालतात, त्यांना जीवन प्रदान करतात:

6 “मी, याहवेहने, नीतिमत्वात तुम्हाला पाचारण केले आहे; मी तुमचा हात धरून तुम्हाला पाठिंबा देईन, मी तुमचे संगोपन करेन आणि तुम्हाला कराराच्या पूर्ततेचे लोक बनवेन आणि इतर राष्ट्रांना प्रकाश देणारे,

7 जे डोळे अंध आहेत, ते उघडणारे आणि बंदीशाळेत आहेत, त्यांना सोडविणारे अंधारात बसलेल्यांची सुटका करणारे असे करेन.

8 “मीच याहवेह आहे; हेच माझे नाव आहे! मी माझे गौरव दुसर्‍या कोणालाही किंवा माझे गौरव मूर्तींना देणार नाही.

9 पाहा, गतकाळातील गोष्टी झालेल्या आहेत, आता मी नवीन गोष्टी घोषित करतो; भावी काळातील घटना प्रत्यक्ष घडण्यापूर्वीच मी ते तुमच्याकडे जाहीर करतो.”


याहवेहसाठी स्तुतिगान

10 याहवेहसाठी एक नवे गीत गा, पृथ्वीच्या दिगंतापर्यंत त्याची स्तुतिस्तोत्रे गा, तुम्ही जे सागराच्या खोलात जाऊन राहता आणि त्यात असलेले सर्वकाही, तुम्ही बेटांनो व त्यावर राहणारे सर्वजण गीत गा.

11 अरण्यात व त्याभोवती असणाऱ्या नगरांचे आवाज उंचावू दे; जिथे केदारचा रहिवास आहे, त्या वस्त्या आनंद करोत. सेलाच्या लोकांनो हर्षगीते गा; त्यांना पर्वतशिखरावरून गर्जना करू दे.

12 त्यांनी याहवेहला गौरव प्रदान करावे आणि त्यांचा महिमा बेटांना घोषित करावा.

13 याहवेह एखाद्या लढवय्याप्रमाणे आघाडीवर निघतील, एखाद्या योद्ध्याप्रमाणे ते आपला आवेश चेतवतील; ते गर्जना करून युद्धाची नांदी देतील आणि त्यांच्या शत्रूंवर विजयी होतील.

14 “दीर्घकालापासून मी स्तब्ध राहिलो आहे, मी शांत राहून स्वतःला आवर घातला आहे. परंतु आता, प्रसूत होणाऱ्या स्त्रीप्रमाणे, मी आक्रोश करेन, धापा टाकेन व माझी दमछाक होईल.

15 मी पर्वत व टेकड्या उजाड करेन. त्यांची सर्व हिरवळ वाळवून टाकेन; मी नद्यांना बेटांमध्ये रूपांतरित करेन, आणि जलाशय वाळवून टाकेन.

16 मी आंधळ्यांना त्यांना माहीत नसलेल्या मार्गावरून चालवेन, अपरिचित रस्त्यावरून मी त्यांचे मार्गदर्शन करेन; मी त्यांच्यापुढील अंधकार प्रकाशात बदलेन आणि खडबडीत जागा सपाट करेन. या गोष्टी मी करेन; मी त्यांना टाकणार नाही.

17 परंतु जे मूर्तींवर विश्वास ठेवतात, जे मूर्तींना म्हणतात कि, ‘तुम्ही आमची दैवते आहात,’ ते पूर्णपणे लज्जित होऊन मागे फिरतील.


आंधळी व बहिरी इस्राएल

18 “अहो, तुम्ही बहिऱ्यांनो ऐका; पाहा, तुम्ही आंधळ्यांनो आणि बघा!

19 आंधळे कोण आहेत, केवळ माझे सेवक, आणि बहिरे कोण आहेत, मी पाठविलेले संदेशवाहक? आंधळे कोण आहेत, ज्यांनी माझ्याशी करार केला आहे, याहवेहच्या सेवकासारखे आंधळे?

20 तुम्ही बऱ्याच गोष्टी बघितल्या आहेत, परंतु तुम्ही त्याकडे लक्ष देत नाही; तुमचे कान उघडे आहेत, परंतु तुम्हाला ऐकावयास येत नाही.”

21 त्यांच्या नीतिमत्तेप्रीत्यर्थ त्यांचे नियमशास्त्र महान व गौरवित केल्याने याहवेह प्रसन्न होतात.

22 पण हेच लोक लुटले व लुबाडले गेले आहेत, ते सर्वजण खड्ड्यात अडकले आहेत किंवा तुरुंगात लपवून ठेवण्यात आले आहेत. तेच लूट बनले आहेत, त्यांना सोडविणारा कोणी नाही; त्यांना लूट बनविण्यात आले आहे, “त्यांना परत पाठवा,” असे म्हणणारे कोणीही नाही.

23 भावी काळात तुमच्यापैकी कोण हे ऐकेल किंवा काळजीपूर्वक लक्ष देईल?

24 याकोबाची लूट होण्यासाठी त्यांना कोणी हवाली केले, आणि इस्राएलला लुबाडू दिले? ज्यांच्याविरुद्ध आम्ही पातक केले ते याहवेहच नाहीत काय? त्यांनी याहवेहचे मार्ग अनुसरले नाहीत; त्यांच्या नियमांचे पालन केले नाही,

25 म्हणूनच याहवेहने आपला क्रोधाग्नी आणि लढाईचा विध्वंस त्यांच्यावर ओतला. चारही बाजूने ते ज्वालांनी वेढले गेले होते, तरीसुद्धा त्यांना उमगले नाही; ज्वालांनी ते भस्म झाले, पण त्यांनी ते मनावर घेतले नाही.

पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™

ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.

यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.

सर्व अधिकार जगभरात राखीव.

Holy Bible, Marathi Contemporary Version™

Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.

Used with permission.

All rights reserved worldwide.

Biblica, Inc.
Lean sinn:



Sanasan