यशायाह 38 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्तीहिज्कीयाह राजाचा आजार 1 त्या दिवसांमध्ये हिज्कीयाह राजा आजारी पडला आणि मरणपंथाला लागला. आमोजाचा पुत्र यशायाह संदेष्टा त्याच्याकडे गेला आणि म्हणाला, “याहवेह असे म्हणतात: तुझे घर व्यवस्थित ठेव, कारण तू मरणार आहेस; तू बरा होणार नाहीस.” 2 हे ऐकताच हिज्कीयाहने आपले तोंड भिंतीकडे वळविले आणि याहवेहकडे प्रार्थना केली, 3 “हे याहवेह, मी तुमच्यापुढे कसा विश्वासूपणाने आणि पूर्ण मनोभावे समर्पित होऊन चाललो व नेहमी तुमच्या दृष्टीने योग्य तेच केले, याचे स्मरण करा.” आणि हिज्कीयाह अतिदुःखाने रडू लागला. 4 तेव्हा याहवेहचे वचन यशायाहकडे आले: 5 “जा आणि हिज्कीयाहला सांग, ‘तुझे पूर्वज दावीदाचे परमेश्वर, याहवेह असे म्हणतात: मी तुझी प्रार्थना ऐकली आणि तुझे अश्रू पाहिले आहेत; मी तुझ्या आयुष्यात पंधरा वर्षांची भर घालेन. 6 आणि मी तुला आणि या शहराला अश्शूरच्या राजाच्या हातातून सोडवेन. मी या शहराचे रक्षण करेन. 7 “ ‘याहवेहनी जे वचन दिले आहे, त्याप्रमाणे ते करतील यासाठी याहवेहनी तुम्हाला हे चिन्ह दिले आहे: 8 मी सूर्याच्या सावलीला आहाजच्या पायऱ्यांवरून दहा पावले मागे जाईल असे करेन.’ ” तेव्हा सूर्यप्रकाश जिथून तो गेला होता, त्याच्या दहा पावले मागे गेला. 9 यहूदीयाचा राजा हिज्कीयाहने त्याच्या आजारपणा नंतर आणि बरा झाल्यावर केलेले लिखाण: 10 मी म्हणाला, “माझ्या जीवनाच्या बहराच्या काळात मला मृत्यूच्या दारातून जावे लागेल काय आणि माझी उरलेली वर्षे लुटली जावी काय?” 11 मी म्हणालो, “मी जिवंतांच्या देशात पुन्हा याहवेह यांना स्वतः पाहणार नाही; येथून पुढे मला माझे सहकारी दिसणार नाहीत, किंवा जे आता या जगात आहेत त्यांच्याबरोबर मी राहणार नाही. 12 मेंढपाळाच्या तंबूप्रमाणे माझे घर पाडले गेले आणि माझ्याकडून काढून घेतले गेले. विणकराप्रमाणे मी माझे जीवन गुंडाळून टाकले आहे, आणि त्यांनी मला विणकऱ्याच्या मागापासून तोडून टाकले आहे; रात्री आणि दिवसा तुम्ही माझा अंत व्हावा असे केले. 13 मी धीर धरून पहाटेपर्यंत वाट पाहिली, परंतु सिंहासारखे त्यांनी माझी सर्व हाडे मोडली; रात्री आणि दिवसा तुम्ही माझा अंत व्हावा असे केले. 14 मी निळवी किंवा सारसाप्रमाणे चित्कारलो मी शोक करणाऱ्या कबुतरासारखा कण्हत राहिलो. आकाशाकडे पाहून माझे डोळे दुर्बल झाले. मला धमकाविण्यात आले आहे; हे प्रभू, मला मदत करण्यासाठी या!” 15 परंतु मी काय बोलू शकतो? ते माझ्याशी बोलले आहेत आणि त्यांनी स्वःताच हे केले आहे. कारण माझ्या या तीव्र मनोवेदनेमुळे माझी सर्व वर्षे मी नम्रपणाने चालेन. 16 हे प्रभू, अशा गोष्टी करून लोक जगतात; आणि माझ्या आत्म्याला त्यांच्यामध्येही जीवन सापडते. तुम्ही माझे आरोग्य पुनः प्रदान केले आहे आणि मला जीवन दिले आहे. 17 अशा मनोवेदना मी सहन करणे निश्चितच माझ्या भल्याचे होते. तुमच्या प्रेमाखातर तुम्ही मला नाशाच्या गर्तेपासून वाचविले; तुम्ही माझी सर्व पापे तुमच्या पाठीमागे टाकली आहेत. 18 कारण अधोलोक तुमची स्तुती करू शकत नाही, मृत्यू तुमचे स्तुतिगान करू शकत नाही. जे खाली गर्तेत जातात ते तुमच्या विश्वासूपणाची आशा करू शकत नाहीत. 19 जिवंत, जे जिवंत आहेत—ते तुमची स्तुती करतात, जसे मी आज करीत आहे; पालक त्यांच्या मुलांना तुमच्या विश्वासूपणाबद्दल सांगतात. 20 याहवेह मला वाचवतील, आणि आपण याहवेहच्या मंदिरात आपल्या आयुष्याचे सर्व दिवस तंतुवाद्याच्या साहाय्याने गाणी गात राहू. 21 यशायाहने म्हटले होते, “अंजिराचा लेप तयार करा आणि तो गळवावर लावा आणि तो बरा होईल.” 22 हिज्कीयाहने विचारले होते, “मी याहवेहच्या मंदिरात जाईन याचे चिन्ह काय असेल?” |
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.
Biblica, Inc.