Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

यशायाह 23 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती


सोरविरुद्ध भविष्यवाणी

1 सोरविरुद्ध भविष्यवाणी: तार्शीशच्या जहाजांनो, विलाप करा! कारण सोरचा नाश झाला आहे आणि तिथे घर किंवा बंदर असे काहीच राहिले नाही. कित्तीम देशाकडून हे वचन त्यांच्याकडे आले आहे.

2 तुम्ही बेटावरील रहिवाशांनो, आणि तुम्ही सीदोनचे व्यापारी, ज्यांना खलाश्यांनी श्रीमंत केले आहे, शांत राहा.

3 प्रचंड जलाशयावरून शिहोरचे धान्य आले; नाईल नदीकाठापासून कापणी केलेले पीक हे सोरचे उत्पन्न होते, आणि ती राष्ट्रांची बाजारपेठ झाली.

4 सीदोन आणि समुद्रातील किल्ल्यांनो, लज्जित व्हा, कारण समुद्र म्हणाला: “मला कधीही बाळंतपणाच्या वेदना झाल्या नाहीत आणि मी कधीही प्रसवलो नाही; मी कधीही मुलांचे संगोपन केले नाही किंवा मुलींचा सांभाळ केला नाही.”

5 जेव्हा इजिप्तकडे निरोप येतो, तेव्हा सोरकडून आलेल्या वृत्ताने ते कासावीस होतील.

6 तार्शीश ओलांडून पलीकडे जा; बेटावरील लोकहो, आक्रोश करा.

7 ही तुमची रंगेलपणाची नगरी आहे काय, फार जुने, पुरातन नगर, जिच्या पायांनी तिला फार दूर असलेल्या प्रदेशात स्थायिक होण्यासाठी नेले आहे?

8 सोरच्या विरोधात अशी योजना कोणी केली आहे, मुकुटाचा बहुमान प्रदान करणारे, ज्यांचे व्यापारी राजकुमार आहेत, ज्यांचे व्यापारी पृथ्वीवरील प्रसिद्ध लोक आहेत?

9 सर्वसमर्थ याहवेहनी ती योजना केली आहे, तिच्या सर्व वैभवाचा गर्व कमी करण्यासाठी आणि पृथ्वीवर नामांकित असलेल्या सर्वांना नम्र करण्यासाठी.

10 तार्शीश मुली, नाईल नदीच्या काठाने तुमच्या जमिनीची मशागत करा, कारण आता तुमच्याकडे बंदर राहणार नाही.

11 याहवेहनी त्यांचा हात समुद्रापलीकडे लांबविला आहे, आणि तिच्या राज्यांना थरकाप आणला आहे. त्यांनी कनानच्या संदर्भात आदेश दिले आहेत की, तिचे किल्ले नष्ट केले जावे.

12 ते म्हणाले, “कुमारिके सीदोन, यापुढे तुझी चैनबाजी चालणार नाही. आता तू चिरडली जावी! “वर कित्तीम पलीकडे गेलात; तर तिथेही तुम्हाला विश्रांती मिळणार नाही.”

13 खास्द्यांच्या भूमीकडे बघा या लोकांचे आता काहीही महत्त्व राहिले नाही! अश्शूर लोकांनी ते वाळवंटातील श्वापदांसाठी एक ठिकाण केले आहे; त्यांनी त्यांचे वेढा बुरूज उभारले, त्यांनी त्याचे मोठे किल्ले पाडले आणि त्याचे भग्नावशेष केले.

14 तार्शीशच्या जहाजांनो, विलाप करा; तुमचा किल्ला नष्ट झाला आहे!

15 त्यावेळी एका राजाच्या आयुष्याचा कालावधी, म्हणजे सत्तर वर्षे, सोर विसरला जाईल. परंतु या सत्तर वर्षांच्या शेवटी, वेश्येच्या गाण्याप्रमाणे सोरचे होईल:

16 “वीणा हाती घे, शहरामधून फीर, तू विसरून गेलेली वेश्या; वीणा चांगली वाजव, पुष्कळ गाणी गा, म्हणजे तुझी आठवण होत राहील.”

17 सत्तर वर्षांच्या शेवटी, याहवेह सोरबरोबर व्यवहार करतील. ती तिच्या फायदेशीर वेश्याव्यवसायाकडे परत येईल आणि पृथ्वीतलावरील सर्व राज्यांबरोबर तिचा व्यापार करेल.

18 तरीसुद्धा तिचा नफा आणि तिचे उत्पन्न याहवेहसाठी वेगळे ठेवले जाईल; ते साठविले जाणार नाही किंवा त्याचा गुप्तसंचय केला जाणार नाही. तिचा फायदा याहवेहसमोर जे राहतात त्यांना भरपूर अन्न आणि उत्तम कपडे मिळावे यासाठी त्यांच्याकडे जाईल.

पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™

ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.

यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.

सर्व अधिकार जगभरात राखीव.

Holy Bible, Marathi Contemporary Version™

Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.

Used with permission.

All rights reserved worldwide.

Biblica, Inc.
Lean sinn:



Sanasan