Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

यशायाह 17 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती


दिमिष्का विरुद्ध भविष्यवाणी

1 दिमिष्का विरुद्ध भविष्यवाणी: “पहा, दिमिष्क आता शहर असे राहणार नाही परंतु ते नाशवंत वस्तूंचा ढिगारा असे होईल.

2 अरोएरची शहरे ओसाड होतील आणि ते कळपांना विश्रांती घेण्यासाठी सोडले जाईल, तिथे त्यांना घाबरविणारा कोणीही नसेल.

3 तटबंदी केलेले शहर एफ्राईमपासून नाहीसे होईल, आणि दिमिष्कमधून शाही सामर्थ्य नाहीसे होईल; अराम नगरातील अवशिष्ट इस्राएली लोकांच्या वैभवासारखे असतील,” असे सर्वसमर्थ याहवेह घोषित करतात.

4 “त्या दिवशी याकोबाचे वैभव कमी होईल; त्याच्या शरीरातील चरबी व्यर्थ जाईल.

5 जेव्हा कापणी करणारे उभे पीक कापतात, आणि धान्य त्यांच्या हातात गोळा करतात— जसे जेव्हा कोणी रेफाईमच्या खोऱ्यात धान्याची कणसे गोळा करतात तसे होईल.

6 जसे जैतुनाच्या झाडाला झोडपतात तेव्हा उंचटोकाच्या फांद्यांवर दोन किंवा तीन जैतून, आणि फळ देणाऱ्या मोठ्या फांद्यांवर चार किंवा पाच जैतून राहून जातात, तसे जमा करण्याचे काही शिल्लक राहील,” असे इस्राएलचे परमेश्वर याहवेह घोषित करतात.

7 त्या दिवशी लोक त्यांच्या निर्माणकर्त्याकडे पाहतील त्यांची दृष्टी इस्राएलच्या पवित्र परमेश्वराकडे वळवतील.

8 ते वेद्यांकडे, त्यांच्या हस्तकृतींकडे पाहणार नाहीत, आणि अशेरा स्तंभांसाठी आणि त्यांच्या बोटांनी तयार केलेल्या धूप वेद्यांकडे आदराने पाहणार नाहीत.

9 त्या दिवशी त्यांची आश्रयस्थान असलेली शहरे, जी त्यांनी इस्राएली लोकांमुळे सोडली होती, ती आता काटेरी झाडे आणि झुडपे वाढत असलेल्या ठिकाणांसारखी होतील. ती सर्व उजाड होतील.

10 तुम्ही तुमचे तारणकर्ते परमेश्वरांना विसरले आहात; तुम्ही तुमचा दुर्ग, तुमच्या खडकाची आठवण केली नाही. जरी तुम्ही अत्युत्तम झाडांची लागवड केली आहे, आणि विदेशी द्राक्षवेलींची लागवड केली आहे,

11 ज्या दिवशी तुम्ही त्यांना लावता, तुम्ही त्यांना वाढविता, आणि सकाळी तुम्ही त्यांची पेरणी करता, तेव्हा तुम्ही त्यांना अंकुर फुटू देता, तरीसुद्धा रोग आणि असाध्य वेदना होणाऱ्या दिवसामध्ये त्यांचे काहीच उत्पादन होणार नाही.

12 पुष्कळ राष्ट्रे जी संतापतात त्यांना धिक्कार असो— ते उफाळणाऱ्या समुद्राप्रमाणे रागावतात! गर्जना करणाऱ्या लोकांचा धिक्कार असो— पाण्याच्या प्रचंड लोंढ्याप्रमाणे ते गर्जना करतात!

13 जरी लोक उचंबळणाऱ्या पाण्याप्रमाणे गर्जना करतात, जेव्हा याहवेह त्यांना दटावतात, तेव्हा ते दूर पळून जातात, टेकड्यांवरील भुश्याप्रमाणे वार्‍याने पुढे ढकलून दिले जातात, जणू काही वावटळीची धूळ वादळी वाऱ्यासमोर जाते.

14 संध्याकाळी अचानक दहशत! सकाळ होण्याआधीच ते गेले असतात! जे आम्हाला लुटतात त्यांच्या वाट्याला हे येते, जे आमची लूटमार करतात त्यांचा हा वाटा आहे.

पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™

ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.

यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.

सर्व अधिकार जगभरात राखीव.

Holy Bible, Marathi Contemporary Version™

Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.

Used with permission.

All rights reserved worldwide.

Biblica, Inc.
Lean sinn:



Sanasan