यशायाह 15 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्तीमोआबा विरुद्ध भविष्यवाणी 1 मोआब देशाविरुद्ध भविष्यवाणी: मोआब येथील आर शहर उद्ध्वस्त झाले आहे, एका रात्रीत ते नष्ट झाले आहे! मोआबातील कीर शहर उद्ध्वस्त झाले आहे, एका रात्रीत ते नष्ट झाले आहे! 2 दिबोन येथील लोक त्यांच्या उच्च स्थानावरील, मंदिरात विलाप करण्यासाठी जात आहेत; नबो आणि मेदबासाठी मोआब आक्रोश करीत आहे. प्रत्येकाच्या डोक्यावरील केस आणि दाढी काढलेली आहे. 3 रस्त्यांवर ते गोणपाट घालतात; छतावर आणि सार्वजनिक चौकांमध्ये ते सर्व आक्रोश करतात, विलाप करीत पालथे पडतात. 4 हेशबोन आणि एलिआलेह रडतात, त्यांचा आक्रोश दूरवर याहसपर्यंत ऐकू येतो. म्हणून मोआबचे सशस्त्र लोक आक्रोश करतात, आणि त्यांची अंतःकरणे दुर्बल झाली आहेत. 5 माझे मन मोआबसाठी रडते; तिचे पलायन केलेले लोक सोअरपर्यंत, एग्लाथ-शलीशियापर्यंत पळतात. ते लुहिथकडे टेकडीवर जातात, जाताना ते विलाप करतात; होरोनाईमच्या वाटेवर ते त्यांच्या नाशासाठी विलाप करतात. 6 निम्रीमचे सर्व पाणी आटून गेले आहे आणि गवत करपून गेले आहे; वनस्पती सुकून गेली आहे; आणि हिरवळीसारखे काहीही उरले नाही. 7 म्हणून त्यांनी मिळवलेली आणि साठविलेली संपत्ती ते वाळुंजाच्या खोऱ्यापलीकडे घेऊन जातात. 8 त्यांच्या आक्रोशाचे प्रतिध्वनी मोआबच्या सीमेपर्यंत येतात. त्यांचे आक्रंदन एग्लाइमपर्यंत पोहोचते, त्यांचा विलाप बीर एलिमपर्यंत पोहोचतो. 9 दिमोनाचे पाणी रक्ताने भरलेले आहे, परंतु मी दिमोनवर आणखी विपत्ती आणेन— मोआबच्या पलायन केलेल्या लोकांवर आणि देशातील अवशिष्ट लोकांवर मी सिंह पाठवेन. |
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.
Biblica, Inc.