यशायाह 1 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 यहूदीयाचे राजे उज्जीयाह, योथाम, आहाज आणि हिज्कीयाहच्या शासनकाळात आमोजाचा पुत्र यशायाहने यहूदीया आणि यरुशलेम संबंधी दृष्टान्त पाहिला. बंडखोर राष्ट्र 2 हे आकाशा, माझे ऐक! हे पृथ्वी ऐक! कारण याहवेह असे म्हणाले: “मी मुलांचे संगोपन केले आणि त्यांना वाढविले, परंतु त्यांनी माझ्याविरुद्ध बंड केले आहे. 3 बैल त्याच्या मालकाला ओळखतो, गाढव त्याच्या मालकाचा गोठा ओळखतो, परंतु इस्राएल ओळखत नाही, माझ्या लोकांना समजत नाही.” 4 हे पापी राष्ट्रा, तुझा धिक्कार असो, तुम्ही लोक, ज्यांचा अपराध फार मोठा आहे, वाईट कृत्ये करणाऱ्यांची पिल्ले, भ्रष्टाचारासाठी देऊन टाकलेली मुले! त्यांनी याहवेहना सोडून दिले आहे; इस्राएलच्या पवित्राला तिरस्काराने झिडकारले आहे, आणि त्यांच्याकडे पाठ फिरविली आहे. 5 तुम्हाला आणखी मार का दिला जावा? तुम्ही विद्रोह का करीत राहावे? तुमच्या संपूर्ण डोक्याला दुखापत झाली आहे, तुमचे संपूर्ण अंतःकरण ग्रस्त झाले आहे. 6 पायाच्या तळव्यापासून ते डोक्याच्या टाळूपर्यंत काहीही चांगले तिथे राहिले नाही— फक्त जखमा आणि खरचटलेले, आणि उघडे व्रण आहेत, त्या स्वच्छ केलेल्या किंवा पट्ट्यांनी बांधलेल्या नाहीत किंवा जैतुनाच्या तेलाने त्या पुसलेल्या नाहीत. 7 तुमचा देश उद्ध्वस्त झाला आहे, तुमची शहरे अग्नीमध्ये जळाली आहेत; पाडाव केल्यानंतर करावे तसे, तुमच्यादेखत तुमची शेते परदेशीयांनी ओरबाडून घेतली आहेत. 8 सीयोनकन्येला द्राक्षमळ्यात असलेल्या आश्रयस्थानासारखे, काकडीच्या शेतातील झोपडीसारखे, वेढा दिलेल्या शहराप्रमाणे आहे. 9 सर्वसमर्थ याहवेह यांनी जर आमच्यातील काहींना वाचविले नसते तर, आम्ही सदोमासारखे झालो असतो, गमोरासारखी आमची गत झाली असती. 10 अहो, सदोमाचे राज्यकर्ते, याहवेहचे शब्द ऐका; तुम्ही गमोराचे लोकहो, आमच्या परमेश्वराची सूचना ऐका! 11 “तुमची असंख्य होमर्पणे— ती माझ्यासाठी काय आहेत?” असे याहवेह म्हणतात. “होमार्पणासाठी माझ्याकडे गरजेपेक्षा जास्त मेंढे आणि पुष्ट वासरे यांची चरबी आहे; बैलांच्या, मेंढरांच्या किंवा शेळ्यांच्या रक्तामध्ये मला काही आनंद नाही. 12 जेव्हा तुम्ही माझ्यासमोर येता, तुम्हाला कोणी सांगितले, की माझ्या मंदिरांचे अंगण तुडवा? 13 अर्थशून्य अर्पणे आणणे बंद करा! तुमच्या सुगंधी धूपाचा मला तिटकारा वाटतो. नवचंद्र उत्सव, शब्बाथ आणि समारंभ— अशा तुमच्या निरर्थक सभा मी सहन करू शकत नाही. 14 तुमचे अमावस्याचे उत्सव आणि तुमचे नेमलेले सण यांचा मी माझ्या संपूर्णतेने तिरस्कार करतो. ते मला भार असे झाले आहेत; त्यांना सहन करता मी थकून गेलो आहे. 15 प्रार्थनेमध्ये जेव्हा तुम्ही तुमचे हात पसरता, तेव्हा मी तुमच्यापासून माझे डोळे लपवितो; जेव्हा तुम्ही पुष्कळ विनवण्या करता, मी त्या ऐकत नाही. तुमचे हात रक्ताने माखलेले आहेत! 16 “धुऊन तुम्ही स्वतःला स्वच्छ करा. तुमची दुष्कृत्ये माझ्या दृष्टीबाहेर करा; वाईट कृत्ये करणे थांबवा. 17 योग्य तेच करण्यास शिका; न्यायीपणाचा शोध घ्या. पीडितांचे संरक्षण करा. पितृहीनांच्या बाजूचे समर्थन करा; विधवांची बाजू मांडा. 18 “या आता, आपण वाद मिटवू या,” असे याहवेह म्हणतात. “जरी तुमची पापे लाखेसारखी असली, तरी ती बर्फासारखी पांढरी होतील; जरी ती किरमिजाप्रमाणे लाल असली, तरी ती लोकरीसारखी होतील. 19 जर तुमची तयारी असेल आणि तुम्ही आज्ञाकारक असाल, तर तुम्ही भूमीच्या चांगल्या वस्तू खाल; 20 परंतु जर तुम्ही विरोध कराल आणि विद्रोह कराल, तर तुमचा तलवारीने नाश केला जाईल.” कारण हे शब्द याहवेहच्या मुखातील आहेत. 21 पाहा, ही विश्वासू नगरी आता कशी वेश्या झाली आहे! ती न्यायाने भरलेली होती; नीतिमत्व तिच्यामध्ये वास करीत होते— परंतु आता वध करणारे राहतात! 22 तुमची चांदी क्षुद्र झाली आहे, तुमचा उत्तम द्राक्षारस पाणी मिसळून पांचट झाला आहे. 23 तुमचे राज्यकर्ते बंडखोर आहेत, चोरांचे भागीदार आहेत; त्या सर्वांना लाच घ्यायला आवडते, आणि ते बक्षिसांच्या मागे पळतात. ते अनाथांच्या बाजूचे रक्षण करीत नाहीत; विधवांचा खटल्याचे समर्थन करीत नाहीत. 24 म्हणून प्रभू, सर्वसमर्थ याहवेह, इस्राएलचे महाशक्तिमान असे जाहीर करतात: “अहा! मी माझ्या शत्रूंवर माझा क्रोध मोकळा करेन आणि माझ्या शत्रूंचा मी स्वतः सूड घेईन. 25 मी माझा हात तुमच्याविरुद्ध उचलेन; मी तुमची सर्व मलिनता पूर्णपणे काढून टाकेन आणि तुमची सर्व अशुद्धता काढून दोषरहित करेन. 26 मी तुमच्या पुढाऱ्यांना परत पूर्वस्थितीत आणेन, तुमचे राज्यकर्त्ये सुरुवातीला होते तसेच त्यांना परत करेन. त्यानंतर तुम्हाला, धार्मिकतेचे शहर, विश्वासू शहर असे म्हटले जाईल.” 27 सीयोन न्यायाने, आणि तिचे पश्चात्तापकर्त्ये नीतिमत्त्वाने सोडविले जातील. 28 परंतु बंडखोर आणि पापी या दोघांना मोडण्यात येईल, आणि ज्यांनी याहवेहचा त्याग केला, त्यांचा नाश होईल. 29 “ज्यांच्यामध्ये तुम्ही हर्षोत्सव केले, त्या एलाच्या पवित्र वृक्षाबद्दल तुम्ही लज्जित व्हाल; ज्यांची तुम्ही निवड केली आहे त्या बागांमुळे तुमचा अपमान केला जाईल. 30 तुम्ही पाने कोमेजून गेलेल्या एलावृक्षासारखी, पाणी नसलेल्या बागेसारखे व्हाल. 31 पराक्रमी मनुष्य चकमकीसारखा होईल, आणि त्याचे काम ठिणगी असे होईल; दोघेही एकत्र जळतील, ती आग विझविणारे कोणीही नसेल.” |
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.
Biblica, Inc.