Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

होशेय 12 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 एफ्राईम वाऱ्यावर चरतो; तो दिवसभर पूर्वेकडील वाऱ्याचा पाठलाग करतो आणि खोटेपणा व हिंसाचार वाढवितो. तो अश्शूरसोबत करार करतो आणि इजिप्तला जैतून तेल पाठवितो.

2 याहवेह यहूदीयाच्या विरुद्ध वाद आणत आहेत; याकोबाला त्याच्या मार्गाप्रमाणे ते शासन करतील आणि त्याच्या कार्यानुसार त्याला प्रतिफळ देतील.

3 त्याने गर्भात असता आपल्या भावाची टाच धरली; एका मनुष्य असून त्याने परमेश्वराशी झुंज केली.

4 तो स्वर्गदूताशी झगडला आणि त्याच्यावर विजयी झाला; तो रडला आणि त्याची मेहेरबानी व्हावी म्हणून त्याने भीक मागितली. बेथेलला ते त्याला भेटले आणि तिथे तो त्यांच्याशी बोलला—

5 याहवेह सर्वसमर्थ परमेश्वर, याहवेह हे त्यांचे नाव!

6 पण तू आपल्या परमेश्वराकडे परत आलेच पाहिजे; प्रीती आणि न्यायाचे पालन कर आणि सतत आपल्या परमेश्वराची प्रतीक्षा कर.

7 व्यापारी चुकीचे माप वापरतो आणि त्याला लबाडी करणे आवडते.

8 एफ्राईम बढाई मारतो, “मी फार धनवान आहे; मी श्रीमंत झालो आहे. माझ्या सर्व संपत्तीसह त्यांना माझ्यामध्ये कोणताही अपराध किंवा पाप आढळणार नाही.”

9 “तू इजिप्तमधून बाहेर आल्यापासून मी याहवेह तुमचा परमेश्वर आहे; तुझ्या नेमलेल्या उत्सवाच्या दिवसात मी तुला पुन्हा तंबूंमध्ये राहवयास लावेन.

10 मी संदेष्ट्यांबरोबर बोललो, त्यांना अनेक दृष्टान्त दिले आणि त्यांच्याद्वारे दाखले सांगितले.”

11 गिलआद दुष्ट आहे काय? त्याचे लोक निरुपयोगी आहेत! ते गिलगालात बैलांचे अर्पण करतात का? त्यांच्या वेद्या नांगरलेल्या शेतातील दगडांच्या ढिगार्‍यासारख्या असतील.

12 याकोब अराम देशात पळून गेला; इस्राएलने पत्नी मिळविण्यासाठी चाकरी केली आणि तिची किंमत चुकविण्यासाठी त्याने मेंढरे राखली.

13 याहवेहने इजिप्तमधून इस्राएलला बाहेर काढण्यासाठी संदेष्ट्याच्या उपयोग केला, एका संदेष्ट्याच्या मार्फत त्याची काळजी घेतली.

14 पण एफ्राईमने त्यांचा कोप भयंकर चेतविला आहे; त्याचे प्रभू त्याच्या रक्ताचा दोष त्याच्यावरच राहू देतील आणि त्याला त्याच्या अपमानाची भरपाई देतील.

पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™

ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.

यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.

सर्व अधिकार जगभरात राखीव.

Holy Bible, Marathi Contemporary Version™

Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.

Used with permission.

All rights reserved worldwide.

Biblica, Inc.
Lean sinn:



Sanasan