होशेय 10 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 इस्राएल एक पसरणारा द्राक्षवेल होता. त्याने स्वतःसाठी फळे आणली. जसे त्याचे फळ वाढले, तसे त्याने आणखी वेद्या बांधल्या; जसा त्याचा देश समृद्ध झाला, तसे त्याने त्याच्या पवित्र दगडांना सुशोभित केले. 2 त्यांचे अंतःकरण फसवणूक करणारे आहे, आणि आता त्यांना त्यांचे अपराध भोगावेच लागतील. याहवेह त्यांच्या वेद्या पाडून टाकतील आणि त्यांच्या पवित्र दगडांचे तुकडे करतील. 3 मग ते म्हणतील, “आम्हाला राजा नाही कारण आम्ही याहवेहचा आदर केला नाही. पण आमचा राजा असला तरी त्याने आमच्यासाठी काय केले असते?” 4 ते अनेक अभिवचने देतात, खोट्या शपथा घेतात आणि करार करतात; त्यामुळे नांगरलेल्या शेतात उगविलेल्या विषारी तणाप्रमाणे खटले सुरू होतात. 5 शोमरोनात राहणारे लोक बेथ-आवेनच्या वासरूच्या मूर्तीला घाबरतात. त्याचे लोक त्याच्यासाठी शोक करतील आणि त्याचप्रमाणे त्याचे मूर्तिपूजक पुजारी करतील, जे पूर्वी त्याच्या वैभवात आनंदित होते. कारण ते वैभव त्यांच्याकडून हिसकावून त्यांना बंदिवासात नेण्यात आले आहे. 6 महान राजाला भेट म्हणून सादर करण्यासाठी ते अश्शूरला नेले जातील. एफ्राईमला लज्जित केले जाईल; बाहेरील लोकांशी संबंध ठेवल्यामुळे इस्राएलही आपल्या मसलतीविषयी लज्जित होईल. 7 शोमरोनच्या राजाचा नाश होईल, पाण्याच्या पृष्ठभागावर पडलेली डहाळी जशी वाहून जाते, तसा तो वाहून जाईल. 8 दुष्टता असलेल्या उच्च स्थानांचा नाश केला जाईल— हे इस्राएलचे पाप आहे. काटेरी झाडे आणि कुसळे उगवतील आणि त्यांच्या वेद्या झाकून घेतील. मग ते पर्वतांना म्हणतील, “आम्हाला झाकून टाका!” आणि टेकड्यांना म्हणतील, “आमच्यावर येऊन पडा!” 9 “हे इस्राएला, गिबियाहतील दिवसापासून तू पाप करीत आला आहेस आणि तू तिथेच राहिला. गिबियाहच्या दुष्कृत्य करणाऱ्या विरुद्ध पुन्हा युद्ध भडकणार नाही काय? 10 जेव्हा माझी इच्छा होईल तेव्हा मी त्यांना दंड देईन; त्यांनी केलेल्या दोन्ही पापांसाठी त्यांना बेड्या टाकण्यासाठी राष्ट्रे त्यांच्याविरुद्ध एकत्र होतील. 11 एफ्राईम शिकविलेली कालवड आहे. तिला मळणी करण्याची आवड आहे; म्हणून मी तिच्या नाजूक मानेवर जू ठेवेन. मी एफ्राईमला नांगराला जुंपेन, यहूदाहला नांगरणी करणे व याकोबाला माती फोडणे आवश्यक आहे. 12 तुम्ही आपल्यासाठी नीतिमत्वाची पेरणी करा, न बदलणार्या प्रीतीचे फळ घ्या, आणि पडीक जमीन नांगरून टाका; जोपर्यंत ते येऊन तुमच्यावर नीतिमत्वाचा वर्षाव करत नाही तोपर्यंत, याहवेहला शोधण्याची हीच वेळ आहे. 13 पण तुम्ही दुष्टतेची नांगरणी केली आहे आणि अन्यायाचे पीक काढले आहे, तुम्ही लबाडीचे फळ खाल्ले आहे. कारण तुम्ही स्वतःच्या सामर्थ्यावर आणि आपल्या अनेक योद्धांवर विश्वास ठेवला आहे, 14 तुझ्या लोकांच्या विरुद्ध युद्धाची गर्जना होईल, जेणेकरून तुझ्या सर्व गडांचा नाश होईल; जसे शलमनाने युद्धाच्या दिवशी बेथ-आर्बेलाचा नाश केला, जेव्हा मातेला तिच्या मुलांसहित आपटून ठार मारण्यात आले. 15 तसेच बेथेल तुझ्यासोबत होईल, कारण तुझी दुष्टता फार अधिक आहे. तेव्हा त्या दिवशी सकाळच्या प्रहरी इस्राएलाच्या राजाचा पूर्णरीतीने नाश केला जाईल. |
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.
Biblica, Inc.