इब्री 8 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्तीनव्या कराराचा महायाजक 1 आमच्या म्हणण्याचा मुख्य मुद्दा हाच आहे: आम्हाला असे एक महायाजक आहेत, जे स्वर्गामध्ये वैभवाच्या सिंहासनाच्या उजवीकडे बसले आहे. 2 प्रभूने उभारलेला खरा मंडप जो केवळ मानवाद्वारे बांधलेला नाही, त्या मंदिरात ते सेवा करीत आहेत. 3 आणि ज्याअर्थी प्रत्येक महायाजक दाने व यज्ञार्पण करण्यासाठी नेमलेला असतो, म्हणून यांच्या जवळही अर्पण करण्यास काहीतरी असणे आवश्यक आहे. 4 जर ते पृथ्वीवर असते, तर ते याजक झाले नसते, कारण येथे नियमशास्त्रानुसार दाने अर्पण करणारे याजक आधी नेमलेले असतात. 5 जे स्वर्गात आहे, त्याचे प्रतिरूप आणि छाया आहे त्या मंदिरात ते सेवा करतात. यामुळेच मोशे निवासमंडप उभारण्याची तयारी करीत असताना, “पर्वतावर दाखविलेल्या निवासमंडपाच्या नमुन्याप्रमाणेच ते सर्व काळजीपूर्वकपणे ठेवावे असे त्याला सांगितले होते.” 6 परंतु येशूंना मिळालेले सेवाकार्य त्यांच्यापेक्षा जेवढे श्रेष्ठ आहे तेवढेच ते जुन्या करारापेक्षा श्रेष्ठ आहे, कारण अधिक चांगल्या अभिवचनांवर आधारित असलेल्या नवीन कराराचे ते मध्यस्थ आहेत. 7 जर पहिला करार निर्दोष असता तर त्याच्या जागी दुसरा करार स्थापण्याची काहीच आवश्यकता भासली नसती. 8 परंतु परमेश्वराला लोकांतील दोष दिसले आणि ते म्हणाले: “प्रभू जाहीर करून म्हणत आहेत, असे दिवस येतील जेव्हा, इस्राएलच्या लोकांशी व यहूदीयाच्या लोकांशी मी एक नवीन करार करेन. 9 मी त्यांच्या पूर्वजांचा हात धरून त्यांना इजिप्त देशातून बाहेर आणले, तेव्हा मी त्यांच्याशी केलेल्या कराराप्रमाणे हा करार नसेल. ते माझ्या कराराशी विश्वासू राहिले नाही, आणि मी त्यांच्यापासून दूर गेलो, असे प्रभू म्हणतात. 10 परंतु मी इस्राएलाच्या लोकांबरोबर करार स्थापित करेन तो असा प्रभू जाहीर करतात, त्या वेळेनंतर मी माझे नियम त्यांच्या मनात ठेवेन, आणि ते त्यांच्या हृदयावर लिहेन मी त्यांचा परमेश्वर होईन, आणि ते माझे लोक होतील. 11 कोणीही आपल्या शेजाऱ्याला बोध करणार नाही, किंवा ‘प्रभूला ओळखा’ असे कोणी कोणाला बोलणार नाही, कारण लहानापासून ते थोरापर्यंत सर्वजण मला ओळखतील, 12 मी त्यांच्या दुष्कृत्यांची क्षमा करेन व यापुढे त्यांची पापे स्मरणार नाही.” 13 त्यांनी या करारास “नवा” असे म्हणून जुना करार कालबाह्य ठरविला आहे; आणि जो कालबाह्य व जुना आहे तो लवकर नाहीसा होईल. |
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.
Biblica, Inc.