Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

इब्री 6 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 यास्तव आपण ख्रिस्ताविषयीच्या प्राथमिक शिक्षणाच्या पलीकडे जाऊन व्यर्थ प्रथांबद्धल पश्चात्ताप आणि परमेश्वरावरील विश्वास यात परिपक्व होऊ या.

2 शुद्धतेच्या प्रथांबाबत, बाप्तिस्म्यांविषयी, डोक्यावर हात ठेवणे, मृतांचे पुनरुत्थान आणि सार्वकालिक न्याय अशा विषयांचा पाया पुन्हा घालू नका.

3 आणि परमेश्वर परवानगी देतील, तर आपण तसे करू.

4 ज्यांना एकदा प्रकाश मिळाला होता, ज्यांनी स्वर्गीय दानांची रुची घेतली, जे पवित्र आत्म्याचे सहभागी झाले,

5 ज्यांनी परमेश्वराच्या उत्तम वचनांची रुची घेतली आणि येणार्‍या जगाच्या महान सामर्थ्याचा अनुभव घेतला,

6 जर त्यांचे पतन झाले तर त्यांना परत पश्चात्तापाकडे आणणे अशक्य आहे. ते परमेश्वराच्या पुत्राला पुन्हा एकदा क्रूसावर खिळतात आणि त्यांची सार्वजनिक नामुष्की करतात, यात त्यांचे नुकसान आहे.

7 जी भूमी तिच्यावर वारंवार पडलेल्या पावसाचे सेवन करते आणि ज्यांनी लागवड केली आहे त्यांना ती उपयोगी पीक देते, तिला परमेश्वराचा आशीर्वाद मिळतो.

8 परंतु जी भूमी काटे आणि कुसळे उपजविते, ती कुचकामी व शापित होण्याच्या बेतात आहे; तिचा अंत जळण्याने होईल.

9 जरी आम्ही असे बोलत असलो तरी, प्रिय मित्रांनो, तुमच्याविषयी आम्हाला यापेक्षा चांगल्या व तारणाबरोबर येणार्‍या गोष्टींची खात्री आहे.

10 कारण परमेश्वर अन्यायी नाहीत. तुमची कृत्ये आणि त्यांच्या नावावर जी प्रीती तुम्ही त्यांच्या लोकांची मदत करून आणि अजूनही मदत करून दाखविता ती ते विसरणार नाहीत.

11 आमची इच्छा आहे की तुमच्यातील प्रत्येकाने शेवटपर्यंत असाच उत्साह दाखवावा, म्हणजे जी आशा तुम्ही बाळगता ती पूर्ण होईल.

12 तुम्ही आळशी व्हावे अशी आमची इच्छा नाही, परंतु अशांचे अनुकरण करा की जे विश्वासाद्वारे आणि धीराच्या योगे प्रतिज्ञेचे वारस आहेत.


परमेश्वराच्या अभिवचनाची निश्चितता

13 जेव्हा परमेश्वराने अब्राहामाला त्यांचे वचन दिले, तेव्हा त्यांना शपथ वाहण्यास स्वतःपेक्षा मोठा कोणी नसल्यामुळे ते स्वतःचीच शपथ वाहून,

14 म्हणाले, “मी तुला निश्चितच आशीर्वादित करेन आणि तुला अनेक वंशज देईन.”

15 मग अब्राहामाने धीराने वाट पाहिल्यानंतर त्याला अभिवचनाप्रमाणे प्राप्त झाले.

16 लोक आपल्यापेक्षा श्रेष्ठ असलेल्यांची शपथ वाहतात आणि जे काही म्हटले आहे शपथ त्याचे समर्थन करते आणि सर्व वादांचा शेवट करते.

17 कारण परमेश्वराने आपला कधीही न बदलणारा संकल्प त्यांच्या वारसांना स्पष्टपणे कळावा म्हणून स्वतःच्या शपथेने तो कायम केला.

18 परमेश्वराने हे यासाठी केले की ज्या दोन न बदलणार्‍या गोष्टी ज्याविषयी खोटे बोलणे परमेश्वराला अशक्य आहे व आम्ही स्वतःपुढे ठेवण्यात आलेली आशा प्राप्त करण्याकरिता धावलो, त्या आम्हास मोठे उत्तेजन मिळावे.

19 आम्हाला ही आशा जिवासाठी नांगर असून स्थिर व अढळ आहे. ती पडद्याच्या मागे आतील मंदिरात प्रवेश करणारी आहे.

20 जिथे येशूंनी आपला अग्रदूत मलकीसदेकाच्या संप्रदायाप्रमाणे, सदासर्वकाळचा महायाजक म्हणून आपल्यावतीने प्रवेश केला आहे.

पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™

ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.

यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.

सर्व अधिकार जगभरात राखीव.

Holy Bible, Marathi Contemporary Version™

Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.

Used with permission.

All rights reserved worldwide.

Biblica, Inc.
Lean sinn:



Sanasan