Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

उत्पत्ती 46 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती


याकोब इजिप्त देशास येतो

1 अशा रीतीने इस्राएल आपले सर्वस्व घेऊन निघाला आणि बेअर-शेबा येथे पोहोचल्यावर त्याने आपला पिता इसहाक याच्या परमेश्वराला अर्पणे वाहिली.

2 त्या रात्री परमेश्वराने इस्राएलला स्वप्नात दर्शन दिले व त्याला म्हटले, “याकोबा! याकोबा!” याकोब म्हणाला, “काय आज्ञा?”

3 परमेश्वराने म्हटले, “मी परमेश्वर, मी तुझ्या पित्याचा परमेश्वर आहे; खाली इजिप्त देशात जाण्यास भिऊ नको, कारण तिथे मी तुझे एक मोठे राष्ट्र करेन.

4 मी स्वतः तुझ्याबरोबर खाली इजिप्तला जाईन, आणि तुला तिथून निश्चितच परत आणेन. योसेफाचे हात तुझे डोळे बंद करतील.”

5 तेव्हा याकोब बेअर-शेबाहून निघाला; त्याला नेण्यासाठी फारोहने पाठविलेल्या गाड्यांमधून इस्राएलाच्या पुत्रांनी, त्याला व आपल्या पत्नींना आणि मुलांबाळांना इजिप्तमध्ये आणले.

6 मग याकोब त्याची सर्व संतती आणि आपली गुरे व कनान देशामध्ये मिळविलेली संपत्ती घेऊन इजिप्तला गेला.

7 याप्रमाणे याकोबाने त्याचे पुत्र, नातवंडे आणि त्याच्या मुली आणि नातवंडांना—त्याची सर्व संतती इजिप्तमध्ये आणली.

8 इजिप्तला गेलेल्या इस्राएलाच्या पुत्रांची (याकोब आणि त्याचे वंशज) ही नावे आहेत: रऊबेन हा याकोबाचा प्रथम जन्मलेला.

9 रऊबेनाचे पुत्र: हनोख, पल्लू, हेस्रोन व कर्मी.

10 शिमओनाचे पुत्र: यमुवेल, यामीन, ओहाद, याखीन, जोहर आणि कनानी स्त्रीपासून झालेला मुलगा शौल.

11 लेवीचे पुत्र: गेर्षोन, कोहाथ व मरारी.

12 यहूदाहचे पुत्र: एर, ओनान, शेलाह, पेरेस व जेरह (परंतु एर आणि ओनान हे कनान देशातच मरण पावले होते). परेसाचे पुत्र: हेस्रोन आणि हामूल.

13 इस्साखारचे पुत्र: तोला, पुवाह, योब व शिम्रोन.

14 जबुलूनाचे पुत्र: सेरेद, एलोन व याहलेल हे होते.

15 म्हणजे याकोब आणि लेआ यांची सर्व संतती मिळून तेहतीस होती. यातच त्यांना पद्दन-अराम येथे झालेली कन्या दीना हिचाही समावेश आहे.

16 गादाचे पुत्र: सिफयोन, हग्गी, शूनी, एसबोन, एरी, अरोदी व अरेली.

17 आशेराचे पुत्र: इम्नाह, इश्वा, इश्वी व बरीयाह; त्यांची बहीण सेराह. बरीयाहचे पुत्र: हेबेर व मालकीएल.

18 हे सोळाजण लाबानाने लेआला दासी म्हणून दिलेल्या जिल्पेपासून याकोबाला झाले.

19 याकोबाची पत्नी राहेल हिचे पुत्र: योसेफ व बिन्यामीन.

20 योसेफाचे पुत्र मनश्शेह व एफ्राईम हे इजिप्तमध्ये ओन नगरचा याजक पोटीफेरा याची कन्या आसनथपासून जन्मले.

21 बिन्यामीनचे पुत्र: बेला, बेकेर, आशबेल, गेरा, नामान, एही, रोष, मुप्पीम, हुप्पीम व आर्द हे होते.

22 हे चौदाजण म्हणजे याकोब व राहेल यांची संतती होती.

23 दानचा पुत्र: हुशीम.

24 नफतालीचे पुत्र: याहसेल, गूनी, येसेर आणि शिल्लेम.

25 लाबानाने आपली कन्या राहेल हिला दासी म्हणून दिलेली स्त्री बिल्हा हिच्यापासून याकोबाला सात पुत्र झाले.

26 याप्रमाणे याकोबाच्या पुत्राच्या स्त्रियांच्या व्यतिरिक्त इजिप्तमध्ये गेलेल्या त्याच्या संतानात एकूण सहासष्ट व्यक्ती होत्या.

27 योसेफाला इजिप्तमध्ये झालेल्या दोन पुत्रांचा यामध्ये समावेश केला तर इजिप्तमध्ये आलेल्या याकोबाच्या कुटुंबाचे एकूण सत्तरजण होते.

28 याकोबाने गोशेनला जाण्याचा मार्ग विचारण्याकरिता यहूदाहला त्यांच्या पुढे योसेफाकडे पाठविले. मग जेव्हा ते गोशेन प्रांतात पोहोचले,

29 योसेफाने आपला रथ तयार केला आणि आपला पिता इस्राएल यांना भेटण्याकरिता गोशेन प्रांतात गेला. भेट होताच त्यांनी एकमेकांना मिठी मारली आणि ते बराच वेळ रडले.

30 मग इस्राएल योसेफाला म्हणाला, “आता मला खुशाल मरण येवो, कारण तू जिवंत आहेस हे मी स्वतः पाहिले आहे.”

31 योसेफ आपल्या भावांना आणि पित्याच्या कुटुंबातील सर्वांना म्हणाला, “मी वर जाऊन फारोहला सांगेन की, ‘माझे भाऊ व माझ्या पित्याचे संपूर्ण कुटुंब कनान देशातून मजकडे आले आहेत.

32 मी त्याला सांगेन, हे मेंढपाळ आहेत; त्यांनी त्यांच्याबरोबर आपली शेरडेमेंढरे, गुरे व त्यांचे सर्वस्व आणले आहे.’

33 म्हणून फारोह जेव्हा तुम्हाला बोलावून विचारेल, ‘तुमचा व्यवसाय काय आहे?’

34 तेव्हा तुम्ही असे उत्तर द्यावे, ‘आमच्या वडीलांप्रमाणे तुझ्या सेवकांनी लहानपणापासून गुरे पाळली आहेत.’ म्हणजे तो तुम्हाला येथेच गोशेन प्रांतात राहू देईल, कारण इजिप्तमध्ये मेंढपाळांना तुच्छ मानले जाते.”

पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™

ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.

यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.

सर्व अधिकार जगभरात राखीव.

Holy Bible, Marathi Contemporary Version™

Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.

Used with permission.

All rights reserved worldwide.

Biblica, Inc.
Lean sinn:



Sanasan