उत्पत्ती 40 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्तीप्यालेबरदार व रोटी भाजणारा 1 काही काळानंतर असे झाले की, इजिप्तच्या राजाचा रोटी भाजणारा व प्यालेबरदार यांनी त्यांच्या धन्याच्या, म्हणजे इजिप्तच्या राजाविरुद्ध अपराध केला. 2 फारोह आपला रोटी भाजणारा प्रमुख व प्यालेबरदारचा प्रमुख या दोन्ही सरदारांवर रागावला 3 आणि त्याने त्या दोघांना सुरक्षादलाचा प्रमुख, याच्या वाड्यात म्हणजे जिथे योसेफ होता, त्याच वाड्यातील तुरुंगात टाकले. 4 तुरुंगाच्या अधिकार्याने योसेफाला त्यांच्याकडे लक्ष देण्यास सांगितले आणि त्याने त्यांची देखरेख केली, काही काळ ते तुरुंगात राहिल्यानंतर, 5 एके रात्री दोघांनाही—इजिप्तच्या राजाचा रोटी भाजणारा व प्यालेबरदार, ज्यांना तुरुंगात टाकण्यात आले होते—स्वप्ने पडली आणि प्रत्येकाच्या स्वप्नाचा विशिष्ट अर्थ होता. 6 दुसर्या दिवशी सकाळी जेव्हा योसेफ त्यांना भेटला, तेव्हा ते दोघेही खिन्न असल्याचे त्याच्या लक्षात आले. 7 योसेफाने त्याच्यासोबत त्याच्या धन्याच्या वाड्यात तुरुंगात असलेल्या त्या फारोहच्या अधिकार्यांना विचारले, “आज तुम्ही इतके खिन्न का आहात?” 8 त्यांनी उत्तर दिले, “काल रात्री आम्हा दोघांनाही स्वप्न पडले, पण आम्हाला त्यांचा अर्थ सांगणारा येथे कोणीच नाही.” यावर योसेफ म्हणाला, “स्वप्नांचा उलगडा करून सांगणे हे परमेश्वराकडूनच असते ना? स्वप्नात तुम्ही काय पाहिले ते सांगा.” 9 मुख्य प्यालेबरदारने आपले स्वप्न योसेफाला सांगितले. तो म्हणाला, “स्वप्नात मी एक द्राक्षवेल पाहिली. 10 तिला तीन फांद्या होत्या. त्यांना कळ्या व फुले आली आणि लवकरच त्याला पिकलेल्या द्राक्षांचे घोसही लागले. 11 माझ्या हातात फारोहचा प्याला होता, त्यात ती द्राक्षे पिळून मी रस काढला आणि तो प्याला फारोह राजाला प्यावयास दिला.” 12 तेव्हा योसेफ म्हणाला, “या स्वप्नाचा अर्थ असा: तीन फांद्या म्हणजे तीन दिवस. 13 या तीन दिवसात फारोह तुला तुरुंगातून सोडून देईल आणि तू स्वतः परत राजाच्या हाती प्याला देशील, जसा तू आधी प्यालेबरदार म्हणून देत होता. 14 पण जेव्हा तुझ्याबरोबर सर्वकाही ठीक होईल, तेव्हा माझी आठवण ठेव आणि माझ्यावर कृपा दाखव, फारोहजवळ माझा उल्लेख कर आणि मला या तुरुंगातून बाहेर काढ. 15 कारण मला इब्री लोकांच्या देशातून येथे पळवून आणण्यात आले आणि अंधारकोठडीची शिक्षा मला मिळावी, असे मी काही केले नाही.” 16 त्याच्या स्वप्नाचे उत्तर चांगले निघाले आहे हे पाहून, रोटी भाजणारा प्रमुख योसेफाला म्हणाला, “मला देखील एक स्वप्न पडले आहे: मला माझ्या डोक्यावर रोट्यांच्या तीन टोपल्या दिसल्या. 17 सर्वात वरच्या टोपलीमध्ये फारोहसाठी भटारखान्यातील सर्वप्रकारचे उत्कृष्ट प्रतीचे खाद्यपदार्थ होते; परंतु पक्षी येऊन माझ्या डोक्यावरील टोपलीतून ते पदार्थ खाऊ लागले.” 18 योसेफाने अर्थ सांगताना म्हटले, “या तीन टोपल्या म्हणजे तीन दिवस होत. 19 आजपासून तीन दिवसांनी फारोह तुझा शिरच्छेद करेल व तुझा मृतदेह सुळावर ठेवेल आणि पक्षी येऊन तुझे मांस टोचून खातील.” 20 आता तिसर्या दिवशी फारोहचा वाढदिवस होता आणि त्याने आपल्या सर्व सरदारांसाठी मेजवानी दिली. त्याने आपल्या सरदारांसमोर मुख्य प्यालेबरदार आणि प्रमुख रोटी भाजणारा यांचे मस्तक उंचावले: 21 यावेळी त्याने मुख्य प्यालेबरदारला त्याच्या कामावर पुन्हा नेमले, तो फारोहच्या हाती पुन्हा प्याला देऊ लागला— 22 परंतु प्रमुख रोटी भाजणार्याला योसेफाने भाकीत केल्याप्रमाणे सुळावर चढविण्याची शिक्षा दिली. 23 मुख्य प्यालेबरदाराला योसेफाचे स्मरण राहिले नाही; त्याला तो विसरला. |
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.
Biblica, Inc.