Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

उत्पत्ती 30 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 राहेलने पाहिले की याकोबाला तिच्यापासून मूल होत नाही, तेव्हा ती आपल्या बहिणीचा मत्सर करू लागली. “मला मूल द्या, नाहीतर मी मरून जाईन,” ती याकोबास म्हणाली.

2 त्यामुळे याकोब संतापून राहेलला म्हणाला, “मी काय परमेश्वराच्या ठिकाणी आहे, ज्यांनी तुला मूल होण्यापासून रोखले आहे?”

3 मग ती म्हणाली, “तुम्ही माझी दासी बिल्हा हिचा स्वीकार करा. जेणेकरून ती माझ्यासाठी मुलांना जन्म देईल आणि मीही तिच्याद्वारे कुटुंब तयार करू शकेन.”

4 याप्रमाणे तिने आपली दासी बिल्हा, त्याला पत्नी म्हणून दिली, आणि याकोबाने तिचा स्वीकार केला,

5 आणि बिल्हा गर्भवती झाली व याकोबाच्या पुत्राला जन्म दिला,

6 राहेलने त्याचे नाव दान असे ठेवले, कारण ती म्हणाली, “परमेश्वराने मला न्याय दिला आहे; त्यांनी माझी विनंती मान्य केली आणि मला एक पुत्र दिला आहे.”

7 राहेलची दासी बिल्हा ही पुन्हा गर्भवती झाली आणि तिने याकोबाच्या अजून एका पुत्राला जन्म दिला.

8 राहेलने त्याचे नाव नफताली असे ठेवले. कारण ती म्हणाली, “मी माझ्या बहिणीशी जोरदार संघर्ष करून विजयी झाले आहे.”

9 आपण पुन्हा गर्भवती होत नाही, हे लक्षात घेऊन लेआने आपली दासी जिल्पा याकोबाला पत्नी म्हणून दिली.

10 याकोबापासून लेआची दासी जिल्पाने एका पुत्राला जन्म दिला.

11 लेआ म्हणाली, “हा किती आशीर्वाद आहे!” म्हणून तिने त्याचे नाव गाद असे ठेवले.

12 लेआची दासी जिल्पाला याकोबापासून दुसरा पुत्र झाला.

13 लेआने त्याचे नाव आशेर ठेवले. कारण ती म्हणाली. “मी किती आनंदी आहे! स्त्रिया मला धन्य म्हणतील.”

14 गव्हाच्या हंगामात रऊबेन शेतात काम करताना एके दिवशी त्याला पुत्रदात्रीची फळे सापडली. त्याने ती आपली आई लेआ हिला नेऊन दिली. तेव्हा राहेलने लेआजवळ विनंती केली, “तुझ्या मुलाने पुत्रदात्रीची फळे आणली आहेत, त्यातील काही मला दे.”

15 पण लेआ तिला म्हणाली, “माझा पती घेतलास तेवढे पुरे झाले नाही काय? आता माझ्या मुलाची पुत्रदात्रीची फळे देखील तू घेशील काय?” राहेल म्हणाली, “ठीक आहे. तुझ्या पुत्रदात्रीच्या फळांच्या मोबदल्यात, याकोब आज रात्री तुझ्याकडे येईल.”

16 जेव्हा संध्याकाळी याकोब शेतातून आला, लेआ त्याला भेटण्यासाठी बाहेर गेली. ती म्हणाली, “आज तुम्ही माझ्याबरोबर निजावे, कारण माझ्या मुलाची पुत्रदात्रीची फळे देऊन मी तुम्हाला त्या मोबदल्यात घेतले आहे.” त्याप्रमाणे त्या रात्री तो तिच्यासोबत निजला.

17 परमेश्वराने लेआचे ऐकले आणि ती पुन्हा गर्भवती होऊन तिने याकोबाच्या पाचव्या पुत्राला जन्म दिला.

18 तिने त्याचे नाव इस्साखार असे ठेवले. कारण लेआ म्हणाली, “माझ्या पतीला मी माझी दासी दिल्यामुळे परमेश्वराने मला हे प्रतिफळ म्हणून दिले आहे.”

19 नंतर लेआ याकोबापासून पुन्हा गर्भवती झाली आणि तिला सहावा पुत्र झाला.

20 तिने त्याचे नाव जबुलून असे ठेवले. कारण लेआ म्हणाली, “परमेश्वराने माझ्या पतीसाठी मला चांगल्या देणग्या दिल्या आहेत. कारण मी त्याच्या सहा पुत्रांना जन्म दिला आहे, आता ते मला माझा आदर करतील.”

21 काही वेळेनंतर तिने एका कन्येला जन्म दिला आणि तिचे नाव दीना असे ठेवले.

22 तेव्हा परमेश्वराला राहेलची आठवण झाली; त्यांनी तिचे ऐकले आणि तिला गर्भधारण करण्यास सक्षम केले.

23 ती गर्भवती झाली आणि तिने एका पुत्राला जन्म दिला ती म्हणाली, “परमेश्वराने माझा काळिमा दूर केला आहे.”

24 तिने त्याचे नाव योसेफ असे ठेवले, आणि म्हणाली, “याहवेहने मला आणखी एक पुत्र द्यावा.”


याकोबाच्या कळपात वाढ

25 राहेलने योसेफास जन्म दिल्यानंतर याकोब लाबानास म्हणाला, “माझी रवानगी करा म्हणजे मी माझ्या देशाला जाईन.

26 माझ्या स्त्रिया व मुले यासह मला जाऊ द्या. त्यांच्यासाठी मी तुमची किती सेवा केली आहे, हे तुम्हाला ठाऊक आहे.”

27 पण लाबान त्याला म्हणाला, “माझ्यावर तुझी कृपादृष्टी असेल तर कृपया थांब. तुझ्यामुळे याहवेहने मला आशीर्वाद दिला आहे हे मला भविष्यकथनाने कळले आहे.

28 तुला किती वेतन हवे ते मला सांग म्हणजे मी तुला तेवढे देईन.”

29 याकोब त्याला म्हणाला, “मी तुमची चाकरी कशी केली आणि तुमची गुरे माझ्या देखरेखीखाली कशी राहिली हे तुम्हाला माहीत आहे.

30 मी येण्यापूर्वी तुमच्याकडे जे होते ते खूप वाढले आहे आणि मी जिथे होतो तिथे याहवेहने तुम्हाला आशीर्वाद दिला आहे. पण माझ्या स्वतःच्या कुटुंबीयांकडे मी केव्हा लक्ष देणार?”

31 “मी तुला काय देऊ?” त्याने विचारले. “मला काहीही देऊ नका,” याकोबने उत्तर दिले. “पण जर तुम्ही माझ्यासाठी हे केले तर मी तुमच्या कळपांचे पालन करेन आणि त्यांचा सांभाळ करेन:

32 आज मला तुमचे सर्व कळप बघून घेऊ द्या म्हणजे मी त्यातून डाग व ठिपके असलेली मेंढरे व बोकडे आणि गडद रंगाची मेंढरे वेगळी करेन व तेच माझे वेतन होईल.

33 आणि जेव्हा तुम्ही मला दिलेले वेतन तपासाल तेव्हा भविष्यात माझा प्रामाणिकपणा माझ्यासाठी साक्ष देईल. म्हणजे माझ्या कळपात तुम्हाला एखादा डाग व ठिपके नसलेला बोकड किंवा मेंढा आढळला, तर मी तो तुमच्या कळपातून चोरून घेतला आहे, हे तुम्हाला समजेल.”

34 लाबान म्हणाला, “ठीक आहे, तू म्हणतोस तसे होऊ दे.”

35 त्याच दिवशी लाबान आपल्या कळपात गेला आणि त्याने पट्टेदार आणि ठिपके असलेली बोकडे व डाग आणि ठिपके असलेल्या शेळ्या (ज्यांच्यावर पांढरा डाग होता) आणि गडद रंगांची मेंढरे वेगळी करून आपल्या पुत्रांच्या स्वाधीन केली.

36 नंतर त्याने त्यांच्यामध्ये आणि याकोबामध्ये तीन दिवसांच्या यात्रेचे अंतर ठेवले आणि याकोब लाबानाचे उर्वरित कळप राखू लागला.

37 मग याकोबाने चिनार, बदाम व अर्मोन वृक्षांच्या कोवळ्या फांद्या घेतल्या व त्यांची पांढरी अंतर्साल दिसेपर्यंत त्या सोलल्या.

38 त्या काठ्या त्याने कळपाच्या पाणी पिण्याच्या पन्हाळ्यात ठेवल्या, जेणेकरून जेव्हा ते पाणी पिण्याकरिता येतील तेव्हा ते थेट कळपांसमोर असतील.

39 त्या काठ्यांच्या समोर शेळ्यामेंढ्या फळत तेव्हा त्यांना पट्टेदार किंवा डाग असलेली किंवा ठिपकेदार करडे होत.

40 मग याकोबाने तरुण कळप बाजूला केला, परंतु लाबानाच्या कळपामधील पट्टेदार आणि गडद रंगाच्या मेंढ्यांकडे कळपांची तोंडे केली. अशा प्रकारे त्याने स्वतःसाठी वेगळे कळप बनविले आणि त्यांना लाबानाच्या प्राण्यांबरोबर ठेवले नाही.

41 जेव्हा तो मेंढरांशी आपल्या कळपातील धष्टपुष्ट माद्यांचा संबंध घडवून आणत असे, त्यावेळी सोललेल्या काठ्या याकोब त्यांच्यापुढे ठेवी.

42 पण जेव्हा दुबळ्या मेंढ्या फळत तेव्हा त्या काठ्या तो त्यांच्यापुढे ठेवीत नसे. त्यामुळे दुबळी मेंढरे लाबानाची व धष्टपुष्ट मेंढरे याकोबाची होत.

43 याचा परिणाम असा झाला की, याकोब खूप श्रीमंत झाला आणि पुष्कळ शेरडे, मेंढरे, दास, दासी, उंट आणि गाढवे त्याच्या मालकीची झाली.

पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™

ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.

यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.

सर्व अधिकार जगभरात राखीव.

Holy Bible, Marathi Contemporary Version™

Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.

Used with permission.

All rights reserved worldwide.

Biblica, Inc.
Lean sinn:



Sanasan