Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

उत्पत्ती 12 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती


अब्रामास पाचारण

1 याहवेहने अब्रामाला सांगितले होते, “तू आपला देश, आपले लोक व आपल्या पित्याचे घर सोड आणि मी दाखवेन त्या देशात जा.

2 “मी तुला एक मोठे राष्ट्र करेन, मी तुला आशीर्वाद देईन; आणि तुझे नाव महान करेन आणि तू एक आशीर्वाद असा होशील.

3 जे तुला आशीर्वाद देतील, त्यांना मी आशीर्वाद देईन, आणि जे तुला शाप देतील, त्यांना मी शाप देईन; आणि तुझ्याद्वारे पृथ्वीवरील सर्व कुळे आशीर्वादित होतील.”

4 याहवेहने सूचना केल्याप्रमाणे अब्राम निघाला; आणि लोटही त्याच्याबरोबर गेला. अब्राम हारान येथून निघाला त्यावेळी तो पंचाहत्तर वर्षांचा होता.

5 अब्राम आपल्याबरोबर आपली पत्नी साराय, त्याचा पुतण्या लोट, तसेच आपली धनदौलत म्हणजे हारानात मिळालेली गुरे व लोक घेऊन निघाला आणि कनान देशात पोहोचला.

6 अब्राम त्या प्रदेशातून प्रवास करीत शेखेम येथील मोरेहच्या मोठ्या एला वृक्षापर्यंत गेला. त्यावेळी कनानी लोक या देशात राहत होते.

7 मग याहवेहने अब्रामाला दर्शन देऊन म्हटले, “हा देश मी तुझ्या संतानाला देणार आहे.” तेव्हा जे अब्रामाला प्रकट झाले त्या याहवेहसाठी त्याने एक वेदी बांधली.

8 तिथून तो बेथेलाच्या पूर्वेकडे डोंगराकडे गेला आणि जिथे पश्चिमेकडे बेथेल व पूर्वेकडे आय हे शहर होते, तिथे त्याने आपला तळ दिला. तिथेच त्याने याहवेहसाठी एक वेदी बांधली आणि याहवेहच्या नावाने उपासना केली.

9 मग अब्राम निघाला आणि दक्षिणेच्या दिशेने चालू लागला.


अब्रामाचे इजिप्त देशात वास्तव्य

10 त्यावेळी त्या देशात मोठा दुष्काळ पडला होता म्हणून अब्राम इजिप्तमध्ये राहण्यास गेला, कारण दुष्काळ फारच भयंकर होता.

11 परंतु इजिप्तच्या सीमेवर आल्यानंतर तो आपली पत्नी साराय हिला म्हणाला, “तू फार सुंदर आहेस,

12 आणि इजिप्तचे लोक तुला पाहतील व म्हणतील, ‘ही याची पत्नी आहे.’ मग ते मला मारून टाकतील आणि तुला जगू देतील.

13 तू माझी बहीण आहेस असे सांग, म्हणजे तुझ्यामुळे मला ते चांगले वागवतील आणि तुझ्यामुळे माझा जीव वाचेल.”

14 अब्राम इजिप्तमध्ये आला तेव्हा इजिप्तच्या लोकांनी पाहिले की साराय ही अतिशय सुंदर स्त्री आहे.

15 जेव्हा फारोह राजाच्या सरदारांनी तिला पाहिले तेव्हा त्यांनी फारोहजवळ तिची प्रशंसा केली; आणि तिला राजवाड्यात नेण्यात आले.

16 मग फारोहने तिच्यामुळे अब्रामाला मेंढरे, बैल, गाढवे, उंट तसेच गुलाम स्त्री व पुरुष अशा पुष्कळ देणग्या दिल्या.

17 परंतु याहवेहने अब्रामाची पत्नी साराय तिथे असल्यामुळे फारोहच्या घरावर भयंकर पीडा पाठविली.

18 तेव्हा फारोहने अब्रामाला बोलाविले आणि म्हटले, “तू माझ्याशी हे काय केले आहेस? ती तुझी पत्नी आहे हे तू मला आधी का सांगितले नाहीस?

19 ‘ती माझी बहीण आहे,’ असे तू का सांगितलेस? म्हणूनच तिला माझी पत्नी करण्यास मी तयार झालो होतो. ही तुझी पत्नी घे आणि येथून निघून जा!”

20 आणि फारोहने आपल्या अधिकार्‍यांना आदेश देऊन अब्रामाची पत्नी, कुटुंबीय मंडळी व मालमत्ता यासह त्याची देशाबाहेर रवानगी केली.

पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™

ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.

यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.

सर्व अधिकार जगभरात राखीव.

Holy Bible, Marathi Contemporary Version™

Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.

Used with permission.

All rights reserved worldwide.

Biblica, Inc.
Lean sinn:



Sanasan