Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

एज्रा 7 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती


एज्रा यरुशलेमला येतो

1 या घटना घडल्यानंतर, पर्शियाचा राजा अर्तहशश्तच्या कारकिर्दीत एज्रा, जो सेरायाहचा पुत्र होता. सेरायाह हा अजर्‍याहाचा पुत्र होता. अजर्‍याह हा हिल्कियाहचा पुत्र होता.

2 हिल्कियाह हा शल्लूमचा पुत्र होता. शल्लूम हा सादोकाचा पुत्र होता. सादोक हा अहीतूबचा पुत्र होता.

3 अहीतूब हा अमर्‍याहचा पुत्र होता. अमर्‍याह हा अजर्‍याहाचा पुत्र होता. अजर्‍याह हा मरायोथाचा पुत्र होता.

4 मरोयाथ जरह्याहचा पुत्र होता. जरह्याह उज्जीचा पुत्र होता. उज्जी बुक्कीचा पुत्र होता. बुक्की अबीशूवाचा पुत्र होता.

5 अबीशूवा फिनहासाचा पुत्र होता. फिनहास एलअज़ाराचा पुत्र होता. एलअज़ार अहरोनाचा पुत्र होता. अहरोन मुख्य याजक होता—

6 हा एज्रा बाबेलहून यरुशलेमला आला. इस्राएली लोकांना याहवेह इस्राएलच्या परमेश्वराने दिलेल्या मोशेच्या नियमशास्त्राचा एज्रा पारंगत शिक्षक होता. त्याने जे काही मागितले ते सर्व राजाने त्याला दिले, कारण याहवेह त्याच्या परमेश्वराचा वरदहस्त त्याच्यावर होता.

7 काही इस्राएली लोक व तसेच याजक, लेवी, गायक, द्वारपाल व मंदिरातील सेवक यांनीही त्याच्याबरोबर प्रवास केला व ते अर्तहशश्त राजाच्या कारकिर्दीच्या सातव्या वर्षी यरुशलेमला पोहोचले.

8 राजाच्या कारकिर्दीच्या सातव्या वर्षातील पाचव्या महिन्यात ते यरुशलेमला पोहोचले.

9 पहिल्या महिन्याच्या पहिल्या दिवशी त्यांनी बाबेल सोडले, पाचव्या महिन्याच्या पहिल्या दिवशी ते यरुशलेमला पोहोचले, कारण परमेश्वराचा वरदहस्त त्यांच्यावर होता.

10 कारण एज्रा याहवेहच्या नियमांचा अभ्यास करण्यास, ते पाळण्यास, व ते नियम इस्राएली लोकांना शिकविण्यासाठी समर्पित होता.


अर्तहशश्त राजाचे एज्राला पत्र

11 ही पत्राची प्रत आहे जी अर्तहशश्त राजाने नियमशास्त्राचा शिक्षक आणि इस्राएलसाठी याहवेहच्या आज्ञा आणि नियमांचा अभ्यासक एज्रा याजकाला दिली होती:

12 राजांचा राजा, जो अर्तहशश्त याजकडून, स्वर्गातील परमेश्वराचे नियम शिकविणारा शिक्षक एज्रा याजक यास: शुभेच्छा.

13 मी असे फर्मावतो की, माझ्या राज्यातील कोणीही इस्राएली, याजक आणि लेवी यांच्यासह त्यांना तुझ्याबरोबर यरुशलेमला स्वेच्छेने जाता येईल.

14 राजा आणि त्याचे सातजणांचे सल्लागार मंडळ तुला सूचना देत आहोत की, तुझ्याजवळ असलेल्या परमेश्वराच्या नियमानुसार यहूदीया व यरुशलेमबद्दल समाचार घेण्यासाठी तुला पाठविण्यात येते.

15 शिवाय, राजा आणि त्याच्या सल्लागारांनी यरुशलेममध्ये ज्यांचे वास्तव्य आहे, त्या इस्राएलाच्या परमेश्वराला दिलेले सोने-चांदी तू बरोबर घेऊन जा.

16 सर्व बाबेल प्रांतामध्ये तू गोळा केलेले सोने व चांदी, तसेच यरुशलेममधील आपल्या यरुशलेमच्या परमेश्वराच्या मंदिरासाठी इस्राएली लोक व त्यांच्या याजकांनी स्वखुशीने दिलेली अर्पणेही बरोबर घेऊन जावी.

17 या पैशाचा उपयोग बैल, मेंढे, कोकरे, अन्न व पेय विकत घेण्यासाठी करून यरुशलेम येथील तुमच्या परमेश्वराच्या मंदिरात त्यांच्या वेदीवर या सर्वांचे अर्पण करावे.

18 उरलेली रक्कम तू आणि तुझ्या भाऊबंदांना योग्य वाटेल त्याप्रकारे परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे खर्च करावी.

19 तुझ्याबरोबर सोन्याची पात्रे व इतर वस्तूही आम्ही देत आहोत. ही यरुशलेमातील तुमच्या परमेश्वराच्या उपासनेसाठी आहेत.

20 मंदिराच्या बांधकामाला अथवा तशाच प्रकारच्या कामासाठी तुम्हाला पैसा कमी पडला तर राजकीय खजिन्यातून निधी मागून घे.

21 आता, मी राजा अर्तहशश्त, हा हुकूमनामा फरात नदीच्या पश्चिमेकडील प्रांतातील सर्व खजिनदारांकडे पाठवित आहे. स्वर्गातील परमेश्वराचे नियम शिकविणारा शिक्षक व याजक एज्रा जी विनंती करेल व जे तुमच्याकडे मागेल ते त्याला द्यावे—

22 ते पुढे नमूद केलेल्या शंभर तालांत पर्यंत चांदी, शंभर कोर गहू, शंभर बथ द्राक्षारस, शंभर बथ जैतुनाचे तेल व मीठ लागेल तेवढे द्यावे.

23 स्वर्गातील परमेश्वराच्या आज्ञेनुसार लागेल ते सर्व काळजीपूर्वकपणे पुरवावे. कारण स्वर्गातील परमेश्वराचा क्रोध राजावर आणि त्याच्या पुत्रांवर येण्याचा धोका आपण का पत्करावा?

24 मी अशीही आज्ञा देतो की याजक, लेवी, गायक, द्वारपाल, मंदिरात काम करणारे आणि मंदिरातील इतर कामगार यांच्यापासून कुठलाही कर, जकात वा चुंगी घेण्याचा तुला अधिकार नाही.

25 आणि एज्रा, तुला परमेश्वराने दिलेली सुज्ञता वापरून परमेश्वराच्या नियमाचे पालन करणाऱ्या न्यायाधीश व इतर अधिकारी यांची निवड आणि नेमणूक करावी. हे अधिकारी फरात नदीच्या पश्चिमेकडील भागात न्यायदान करतील. जर त्यांना तुमच्या परमेश्वराचे नियम माहीत नसतील, तर तू ते त्यांना शिकवावे.

26 तुमच्या परमेश्वराची आज्ञा न मानणार्‍यांना आणि राजांचे नियम मोडणार्‍यांना ताबडतोब मृत्यू, हद्दपारी, मालमत्तेची जप्ती, किंवा तुरुंगवास यापैकी कोणतीही शिक्षा द्यावी.

27 तेव्हा एज्रा म्हणाला, “याहवेह आमच्या पूर्वजांच्या परमेश्वराची स्तुती असो! कारण त्यांनी राजाच्या अंतःकरणात यरुशलेममधील याहवेहच्या मंदिरास याप्रकारे सन्मान देण्याचे सुचविले,

28 आणि त्यांनी राजासमोर व त्याच्या सात जणांच्या सल्लागार मंडळासमोर व सरदारांसमोर माझ्यावर मेहेरबानी केली. याहवेह माझ्या परमेश्वराच्या कृपेचा वरदहस्त माझ्यावर असल्यामुळेच मी धाडस करून काही इस्राएली पुढार्‍यांना मजबरोबर यरुशलेमला येण्यासाठी जमा केले.”

पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™

ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.

यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.

सर्व अधिकार जगभरात राखीव.

Holy Bible, Marathi Contemporary Version™

Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.

Used with permission.

All rights reserved worldwide.

Biblica, Inc.
Lean sinn:



Sanasan