Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

यहेज्केल 47 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती


मंदिरातून वाहत येणारी नदी

1 त्या मनुष्याने मला परत मंदिराच्या प्रवेशद्वाराकडे आणले आणि मी मंदिराच्या उंबरठ्याखालून पूर्वेकडे पाणी बाहेर येत असताना पाहिले (कारण मंदिराचे तोंड पूर्वेकडे होते). मंदिराच्या दक्षिणेकडून, वेदीच्या दक्षिणेकडून पाणी खाली येत होते.

2 मग त्याने मला उत्तरेकडील द्वाराने बाहेर आणले, पूर्वेकडे तोंड असलेल्या बाहेरील द्वाराच्या सभोवार फिरविले, आणि पाण्याचे थेंब दक्षिणेच्या बाजूने पडत होते.

3 तो मनुष्य आपल्या हातात मापनदोरी घेऊन पूर्वेच्या दिशेने गेला, त्याने एक हजार हात मापले आणि घोट्यापर्यंत खोल पाण्यातून मला नेले.

4 त्याने आणखी हजार हात मापले आणि गुडघ्यापर्यंत खोल पाण्यातून मला नेले. त्याने आणखी हजार हात मापले आणि कंबरेपर्यंत खोल पाण्यातून मला नेले.

5 त्याने आणखी हजार हात मापले, परंतु आता ती अशी नदी होती जी मी पार करू शकलो नाही, कारण पोहून जाता येईल इतके ते पाणी वाढले होते; अशी नदी जी कोणीही पार करू शकत नव्हते.

6 त्याने मला विचारले, “मानवपुत्रा, तू हे पाहतोस काय?” मग त्याने मला परत नदीच्या किनारी नेले.

7 जेव्हा मी तिथे गेलो, तेव्हा नदीच्या दोन्ही बाजूंना मी पुष्कळ झाडे पाहिली.

8 तो मला म्हणाला, “हे पाणी पूर्वेच्या प्रदेशाकडे वाहत जाऊन खाली अराबाहमध्ये जाते, तिथे ते मृत समुद्रात जाऊन मिळते. जेव्हा ते समुद्रात जाते, तेव्हा खारट पाणी गोड होते.

9 जिथे पाणी वाहील, तिथे जिवंत प्राण्यांचे थवे राहतील. तिथे पुष्कळ मासे असतील, कारण ते पाणी तिथे वाहत जाऊन खारट पाणी गोड करते; म्हणून जिथे नदी वाहते तिथे सर्वकाही जिवंत राहेल.

10 तिच्या किनारी मासेमारी करणारे उभे राहतील; एन-गेदीपासून एन-एग्लाइमपर्यंत जाळे पसरविण्यासाठी जागा असेल. भूमध्य समुद्रातील माशांप्रमाणे तिथे पुष्कळ प्रकारचे मासे असतील.

11 परंतु पानथळ आणि दलदल शुद्ध होणार नाही; ते खारटच राहतील.

12 नदीच्या दोन्ही बाजूंना सर्वप्रकारच्या फळांची झाडे वाढतील. त्यांची पाने वाळणार नाहीत, ना त्यांची फळे संपतील. प्रत्येक महिन्यात ते फळे देतील, कारण त्यांच्याकडे पवित्रस्थानातून पाणी वाहते. त्यांची फळे खाण्यासाठी व त्यांची पाने आरोग्यासाठी वापरली जातील.”


देशाच्या सीमा

13 सार्वभौम याहवेह असे म्हणतात, “देशाच्या या सीमा आहेत, जेव्हा इस्राएलच्या बारा गोत्रांना त्यांचे वतन म्हणून या देशाची तू विभागणी करशील, त्यात दोन भाग योसेफाचे असतील.

14 त्यांच्यात तो देश तू समानतेने वाटावा. कारण मी हात उंच करून शपथ घेतली होती की, मी हा देश तुमच्या पूर्वजांना देईन, हा देश तुमचे वतन होईल.

15 “देशाची सीमा ही असावी: “उत्तरेस ती भूमध्य समुद्राकडून हेथलोन मार्गापलिकडे लबो-हमाथ पासून जेदादपर्यंत असेल,

16 बेरोथाह व सिबराईमपासून (जी दिमिष्क व हमाथाच्या मध्ये आहे), हाजेर-हत्तीकोनपर्यंत, जे हवरानच्या सीमेवर आहे.

17 ही सीमा समुद्रापासून हाजार-एनानपर्यंत वाढेल, जी दिमिष्कच्या उत्तरेच्या सीमेपर्यंत असेल व उत्तरेस हमाथची सीमा आहे. ही उत्तरेची सीमा आहे.

18 पूर्वेकडील सीमा हवरान व दिमिष्कमधून जात, यार्देन नदीच्या बाजूने गिलआद व इस्राएल देशातून, मृत समुद्रापर्यंत जाईल आणि पुढे तामारपर्यंत. ही पूर्वेकडील सीमा.

19 दक्षिणेच्या बाजूने वतनसीमा तामारपासून मरीबाह-कादेशच्या पाण्यापर्यंत असेल व इजिप्तच्या खाडीपासून भूमध्य समुद्रापर्यंत. ही दक्षिणेकडील सीमा.

20 पश्चिमेच्या बाजूने भूमध्य समुद्रापासून लेबो हमाथाच्या समोरच्या भागापर्यंत. ही पश्चिमेकडील सीमा.

21 “इस्राएलच्या गोत्रानुसार हा देश तुम्ही आपसात वाटून घ्या.

22 तुम्ही तो तुमच्यासाठी व तुमच्यात राहणार्‍या विदेशी लोकांमध्ये व ज्यांना लेकरे आहेत, त्यांच्यासाठी वतन म्हणून वाटायचे आहे. तुम्ही त्यांना देशात जन्मलेल्या इस्राएली लोकांप्रमाणेच समजले पाहिजे; तुमच्याबरोबर त्यांनाही इस्राएलच्या गोत्रांमध्ये वतन वाटून द्यावे.

23 कोणत्याही गोत्रांमध्ये विदेशी राहत असेल, तिथे तू त्यांना त्यांचे वतन द्यावे,” असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.

पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™

ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.

यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.

सर्व अधिकार जगभरात राखीव.

Holy Bible, Marathi Contemporary Version™

Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.

Used with permission.

All rights reserved worldwide.

Biblica, Inc.
Lean sinn:



Sanasan