Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

यहेज्केल 40 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती


मंदिराच्या क्षेत्राची पुनर्स्थापना

1 आमच्या बंदिवासाच्या पंचविसाव्या वर्षी, वर्षाच्या सुरुवातीला, महिन्याच्या दहाव्या दिवशी, शहराचे पतन झाल्यानंतर चौदाव्या वर्षी; त्याच दिवशी याहवेहचा हात माझ्यावर होता आणि त्यांनी मला तिथे नेले.

2 परमेश्वराच्या दृष्टान्तांमध्ये याहवेहनी मला इस्राएल देशात नेले आणि एका अत्यंत उंच पर्वतावर ठेवले. त्याच्या दक्षिणेकडे काही इमारती होत्या, ज्या शहरासारख्या दिसत होत्या.

3 याहवेहने मला तिथे नेले आणि मी एक मनुष्य पाहिला जो कास्यासारखा दिसत होता; तो तागाची एक दोरी व मापन-दंड हातात घेऊन वेशीवर उभा होता.

4 तो मनुष्य मला म्हणाला, “मानवपुत्रा, काळजीपूर्वक पाहा आणि जवळ येऊन ऐक आणि जे काही मी तुला दाखविणार आहे त्याकडे लक्ष दे, त्यासाठीच तुला येथे आणले गेले आहे. तू जे काही बघतो ते इस्राएली लोकांना सांग.”


बाहेरील अंगणाचे पूर्वेकडील द्वार

5 मंदिराच्या क्षेत्राच्या सभोवती असलेली भिंत मी पाहिली. त्या मनुष्याच्या हातात असलेला मापन-दंड सहा हात लांब होता, ते प्रत्येक माप एक हात आणि एक वीत होते. त्याने भिंतीचे माप घेतले; ते एक काठी जाडी व एक काठी उंच होती.

6 मग तो पूर्वेकडील द्वाराकडे गेला. त्याने त्याच्या पायर्‍या चढून जाऊन द्वाराच्या उंबरठ्याचे माप घेतले; तो एक मापन-दंड होता.

7 पहारेकर्‍यांची चौकी एक काठी लांब व एक काठी रुंद होती, आणि दोन्ही चौक्यांमध्ये पाच हात अंतर होते. आणि मंदिरासमोर असलेल्या देवडीजवळच्या द्वाराचा उंबरठा एका मापन-दंडा इतका होता.

8 त्यानंतर त्याने मापन-दंडाने वेशीच्या देवडीचे माप घेतले;

9 ते आठ हात होते आणि त्याचे खांब दोन हात होते. वेशीची देवडी मंदिरासमोर होती.

10 पूर्वेकडील द्वाराच्या आतून प्रत्येक बाजूला तीन चौक्या होत्या; त्या तीनही एकाच मापाच्या होत्या आणि प्रत्येक बाजूच्या भिंतींचे माप सुद्धा सारखेच होते.

11 मग त्याने वेशीच्या प्रवेशद्वाराची रुंदी मापली; ती दहा हात होती आणि त्याची लांबी तेरा हात होती.

12 प्रत्येक चौकीच्या समोर एक हात उंच भिंत होती आणि चौक्या दोन्ही बाजूंनी सहा हात होत्या.

13 मग त्याने एका चौकीच्या भिंतीच्या मागच्या बाजूच्या वरपासून दुसर्‍या भिंतीच्या वरपर्यंतचे वेशीचे माप घेतले; त्यातील अंतर एका कठड्यापासून दुसर्‍यापर्यंत पंचवीस हात मापले.

14 त्याने वेशीच्या आतील बाजूने भिंतींचे सर्वबाजूंनी माप घेतले ते साठ हात होते. हे माप अंगणासमोरील देवडीपर्यंत होते.

15 वेशीच्या प्रवेशद्वारापासून तिच्या शेवटच्या देवडीपर्यंत तिचे माप पन्नास हात होते.

16 वेशीच्या आतील चौक्या आणि भिंतीच्या चहूबाजूंना झरोके असलेले कठडे होते, तसेच देवडींनाही आतील बाजूने झरोके होते. भिंती खजुरीच्या झाडांचे कोरीवकाम करून सजविल्या होते.


बाहेरील अंगण

17 मग त्याने मला बाहेरच्या अंगणात आणले. तिथे अंगणाच्या सभोवती काही खोल्या व बांधलेली पाऊलवाट मी पाहिली; पाऊलवाटेच्या बाजूने तीस खोल्या होत्या.

18 त्या खोल्या वेशीच्या बाजूला लागूनच होत्या आणि जितकी त्यांची लांबी तितकीच त्यांची रुंदी होती; ही खालची पाऊलवाट होती.

19 मग त्याने खालच्या वेशीच्या आतील बाजूपासून आतील अंगणाच्या बाहेरच्या बाजूपर्यंतच्या अंतराचे माप घेतले; त्याचे माप पूर्वेकडून तसेच उत्तरेकडूनही शंभर हात होते.


उत्तरेकडील द्वार

20 मग त्याने बाहेरील अंगणाकडे जाणाऱ्या उत्तरेकडील द्वाराची लांबी व रुंदी मापली.

21 त्यांच्या दोन्ही बाजूंनी प्रत्येकी तीन चौक्या होत्या; त्याच्या भिंती आणि देवडीचेही तेच माप होते जे पहिल्या वेशीचे होते. ते पन्नास हात लांब आणि पंचवीस हात रुंद होते.

22 त्याचे झरोके, त्याची देवडी आणि त्याचे खजुरीच्या झाडांचे कोरीवकाम केलेली सजावट यांचे माप पूर्वेकडील द्वाराच्या मापाइतकेच होते. त्यावर चढून जाण्यासाठी सात पायर्‍या होत्या आणि त्याची देवडी त्याच्यासमोर होती.

23 जसे पूर्वेच्या बाजूने होते तसेच आतील अंगणातही एक द्वार होते जे उत्तरेच्या बाजूने होते. त्याने एका द्वारापासून त्याच्या समोरील द्वारापर्यंत माप घेतले; ते शंभर हात मापले.


दक्षिणेकडील द्वार

24 मग त्या मनुष्याने मला दक्षिणेकडे नेले आणि मी दक्षिणेच्या बाजूला द्वार पाहिले. त्याने त्याच्या खांबांचे व देवडीचे माप घेतले आणि इतर खांब व देवडींप्रमाणेच याचेही माप होते.

25 त्याच्या वेशी व देवडींना चहूकडून इतर वेशी व देवड्यांप्रमाणेच अरुंद झरोके होते. त्याची लांबी पन्नास हात व रुंदी पंचवीस हात होती.

26 त्याच्यावर जाण्यासाठी सात पायर्‍या होत्या आणि त्याच्यासमोर देवडी होती; त्याच्या भिंतींच्या प्रत्येक बाजूला खजुरीच्या झाडाचे कोरीवकाम केलेली सजावट होती.

27 आतील अंगणात सुद्धा एक द्वार होते ज्याचे तोंड दक्षिणेच्या बाजूला होते, त्याने या द्वारापासून दक्षिणेच्या बाहेरच्या द्वारापर्यंत माप घेतले; ते शंभर हात होते.


आतील अंगणाचे द्वार

28 त्यानंतर त्या मनुष्याने मला दक्षिणेकडील द्वारातून आतील अंगणात आणले आणि त्याने दक्षिणेकडील द्वार मापले; इतर द्वारांप्रमाणेच त्याचेही माप होते.

29 त्याच्या चौक्या, त्याच्या भिंती आणि त्याच्या देवड्यांचे माप हे सुद्धा तितकेच होते. वेशी व त्याच्या देवड्यांना चहूकडून झरोके होते. त्याची लांबी पन्नास हात आणि रुंदी पंचवीस हात होती.

30 (आतील अंगणाच्या चहूकडून वेशीच्या देवड्या पंचवीस हात रुंद आणि पाच हात खोल होत्या.)

31 त्याची देवडी बाहेरील अंगणासमोर होती; खजुरीच्या झाडांचे कोरीवकाम करून त्याच्या खांबांना सजविले होते आणि त्यावर जाण्यास आठ पायर्‍या होत्या.

32 त्यानंतर त्याने मला पूर्वेच्या बाजूने आतील अंगणात आणले, आणि त्याने वेशीचे माप घेतले; इतर वेशींप्रमाणेच हिचेही माप भरले.

33 त्याच्या चौक्या, त्याच्या भिंती आणि त्याच्या देवड्यांचे माप हे सुद्धा तितकेच होते. वेशी व त्याच्या देवड्यांना चहूकडून झरोके होते. त्याची लांबी पन्नास हात आणि रुंदी पंचवीस हात होती.

34 त्याच्या देवड्याचे तोंड बाहेरील अंगणाकडे होते; खजुरीच्या झाडांच्या कोरीवकामाने त्याचे स्तंभ सजविले होते आणि त्यावर जाण्यास आठ पायर्‍या होत्या.

35 नंतर त्याने मला उत्तरेच्या द्वाराकडे आणले व त्याचे माप घेतले. इतरांप्रमाणेच त्याचेही माप भरले.

36 त्याप्रमाणेच त्याच्या चौक्या, त्याच्या भिंती आणि त्याच्या देवड्या होत्या, आणि चहूकडून त्याला झरोके होते. ते पन्नास हात लांब आणि पंचवीस हात रुंद होते.

37 त्याच्या देवड्याचे तोंड बाहेरील अंगणाकडे होते; खजुरीच्या झाडांच्या कोरीवकामाने त्याचे स्तंभ सजविले होते आणि त्यावर जाण्यास आठ पायर्‍या होत्या.


अर्पणे तयारीच्या खोल्या

38 प्रत्येक आतील वेशीच्या देवडीकडे द्वार असलेली खोली होती, जिथे होमार्पणे धुतली जात असत.

39 वेशीच्या देवडीमध्ये दोन्ही बाजूंना दोन मेज होते, ज्यावर होमार्पणे, पापार्पणे व दोषार्पणे वधली जात असत.

40 वेशीच्या देवडीच्या बाहेरील भिंतीजवळ, उत्तरेच्या वेशीच्या प्रवेशद्वाराजवळ दोन मेज होते आणि पायर्‍यांच्या दुसर्‍या बाजूने दोन मेज होते.

41 म्हणजेच वेशीच्या एका बाजूला चार मेज होते आणि दुसर्‍या बाजूला चार; असे एकूण आठ मेज होते; ज्यावर अर्पणे कापली जात असत.

42 होमार्पणासाठी कोरीव दगडाचे अजून चार मेज होते, जे प्रत्येकी दीड हात लांब, दीड हात रुंद आणि एक हात उंच होते. त्या मेजांवर होमार्पणांचा व इतर अर्पणांचा वध करण्यासाठी उपकरणे व पात्रे ठेवण्यात आली होती.

43 भिंतीच्या चहूकडून प्रत्येकी चार बोटे असे दुहेरी टोके असलेले आकडे अडकविले होते. ते मेज अर्पणाच्या मांसासाठी होते.


याजकांसाठी खोल्या

44 आतील द्वाराच्या बाहेर, आतील अंगणाच्या आत दोन खोल्या होत्या. उत्तरेच्या द्वाराजवळ दक्षिणेकडे तोंड केलेली एक खोली तर दुसरी खोली दक्षिणेच्या द्वाराजवळ उत्तरेकडे तोंड केलेली होती.

45 तो मनुष्य मला म्हणाला, “दक्षिणेकडे तोंड असलेली खोली मंदिराचे राखण करणार्‍या याजकांसाठी आहे

46 आणि उत्तरेकडे तोंड असलेली खोली वेदीचे राखण करणार्‍या याजकांसाठी आहे. हे सादोकचे पुत्र आहेत, केवळ तेच लेवी आहेत, जे याहवेहची सेवा करताना याहवेहसमोर येऊ शकतात.”

47 मग त्याने अंगणाचे माप घेतले: ते चौरस असून दोन्ही बाजूंनी शंभर हात लांब व शंभर हात रुंद होते आणि वेदी मंदिरासमोर होती.


नवीन मंदिर

48 त्याने मला मंदिराच्या देवडीजवळ आणले आणि देवडीच्या खांबांचे माप घेतले; ते दोन्ही बाजूंनी पाच हात होते. प्रवेशद्वाराची रुंदी चौदा हात होती आणि त्याच्या भिंती दोन्ही बाजूंनी तीन हात रुंद होत्या.

49 देवडी वीस हात रुंद होती, आणि मागून पुढून बारा हात होती. त्यावर जाण्यासाठी पुष्कळ पायर्‍या होत्या आणि खांबांच्या प्रत्येक बाजूला खांब होते.

पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™

ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.

यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.

सर्व अधिकार जगभरात राखीव.

Holy Bible, Marathi Contemporary Version™

Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.

Used with permission.

All rights reserved worldwide.

Biblica, Inc.
Lean sinn:



Sanasan