Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

यहेज्केल 39 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 “मानवपुत्रा, गोगविरुद्ध भविष्यवाणी कर आणि सांग: ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: मेशेख आणि तूबालच्या मुख्य राजपुत्रा रोष, मी तुझ्याविरुद्ध आहे.

2 मी तुला उपडे पाडून तुला ओढत नेईन. मी तुला दूर उत्तरेकडून आणेन आणि इस्राएलच्या पर्वतांविरुद्ध पाठवेन.

3 मग मी तुझ्या डाव्या हातातला धनुष्य मारीन आणि तुझ्या उजव्या हातातील बाण खाली पाडीन.

4 तू इस्राएलच्या पर्वतांवर पडशील, तू व तुझे सैन्य आणि तुझ्याबरोबरची राष्ट्रे सुद्धा पडतील. मी तुम्हाला सर्वप्रकारच्या मांसाहारी हिंस्र पक्ष्यांना व हिंस्र पशूंना भक्ष म्हणून देईन.

5 तू मोकळ्या रानात पडशील, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.

6 मी मागोगवर आणि समुद्रकिनार्‍यावर सुरक्षितपणे राहणार्‍या लोकांवर अग्नी पाठवेन आणि ते जाणतील की मीच याहवेह आहे.

7 “ ‘माझ्या इस्राएली लोकांमध्ये मी माझे पवित्र नाव प्रकट करेन. यापुढे मी माझ्या पवित्र नावाला कलंकित होऊ देणार नाही आणि राष्ट्रे जाणतील की इस्राएलातील पवित्र मीच याहवेह आहे.

8 हे येत आहे! हे खचितच घडेल, हा तोच दिवस आहे ज्याबद्दल मी बोललो होतो, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.

9 “ ‘तेव्हा जे इस्राएलच्या नगरात राहतात ते बाहेर जातील आणि इंधन म्हणून आपली हत्यारे; म्हणजेच लहान व मोठ्या ढाली, धनुष्य व बाण, युद्धाच्या बरच्या व भाले जाळतील. ते सात वर्षे इंधनासाठी त्यांचा उपयोग करतील.

10 रानातून लाकडे गोळा करण्याची किंवा जंगलातील झाडे तोडण्याची त्यांना गरज नसणार, कारण ते हत्यारांचा उपयोग इंधन म्हणून करतील आणि ज्यांनी त्यांची लूट घेतली त्यांना ते लुटतील आणि ज्यांनी त्यांना लुबाडले, त्यांना ते लुबाडतील, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.

11 “ ‘त्या दिवशी मी गोगला इस्राएलमध्ये मृतकांना पुरण्याचे एक ठिकाण देईन, जे समुद्राच्या पूर्वेकडे प्रवास करणार्‍यांच्या खोर्‍यामध्ये आहे. त्यामुळे प्रवाशांची वाट अडविली जाईल, कारण गोग आणि त्याचे सर्व सैन्य तिथे पुरले जातील. म्हणून त्याला हामोन-गोगचे खोरे म्हटले जाईल.

12 “ ‘देश शुद्ध करण्यासाठी इस्राएली लोक त्या मृतकांना सात महिने पूरत राहतील.

13 देशातील सर्व लोक त्यांना पुरतील आणि मी माझे वैभव प्रकट करेन तो दिवस त्यांच्यासाठी अविस्मरणीय असेल, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.

14 देश सातत्याने शुद्ध करण्यासाठी लोकांना कामावर लावले जाईल. ते अजून इतर लोकांबरोबर देशभर पसरतील, जमिनीवर जे मृतदेह पडलेले असतील त्यांना ते पुरतील. “ ‘सात महिने संपल्यावर ते अजून बारीक शोध करतील.

15 जेव्हा ते देशभर फिरतील, तेव्हा ज्या कोणाला मानवी हाड सापडेल, तिथे ते चिन्ह करून ठेवतील आणि कबर खोदणारे त्यांना हामोन गोगच्या खोर्‍यात,

16 जे हामोनाह नगरात आहे तिथे पुरेपर्यंत असे होत जाईल. अशाप्रकारे ते देशाला शुद्ध करतील.’

17 “मानवपुत्रा, सार्वभौम याहवेह असे म्हणतात: प्रत्येक प्रकारच्या पक्ष्यांना आणि हिंस्र पशूंना बोलावून सांग: ‘एकवट व्हा आणि जो यज्ञ, एक मोठा यज्ञ मी इस्राएलच्या पर्वतांवर तयार करीत आहे त्यासाठी चहूकडून एकत्र या. तिथे तुम्ही मांस खाल व रक्त प्याल.

18 तुम्ही बलवान पुरुषांचे मांस खाल व पृथ्वीच्या राजपुत्रांचे रक्त प्याल, जणू ते बाशानातील पोसलेले सर्व प्राणी म्हणजेच मेंढे व कोकरे, बोकडे व वासरे आहेत.

19 जो यज्ञ मी तुम्हासाठी तयार करीत आहे, त्यात तृप्ती होईपर्यंत तुम्ही चरबी खाल व पिऊन मस्त होईपर्यंत रक्त प्याल.

20 माझ्या मेजावर बसून घोडे व स्वार, बलवान पुरुष आणि सर्वप्रकारच्या सैनिकांना खाऊन तुम्ही तृप्त व्हाल,’ असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.

21 “राष्ट्रांमध्ये मी माझे वैभव प्रकट करेन आणि त्यांना मी केलेली शिक्षा आणि मी त्यांच्यावर उगारलेला हात, सर्व राष्ट्रे पाहतील.

22 त्या दिवसापासून पुढे इस्राएली लोक जाणतील की मी याहवेह त्यांचा परमेश्वर आहे.

23 आणि राष्ट्रे जाणतील की इस्राएली लोक त्यांच्या पापामुळे निर्वासित झाले, कारण ते माझ्याशी अविश्वासू होते. म्हणून त्यांच्यापासून मी माझे मुख लपविले आणि त्यांना त्यांच्या वैर्‍यांच्या हाती सोपविले, आणि ते सर्व तलवारीने पडले.

24 त्यांच्या अशुद्धतेनुसार आणि पापांनुसार त्यांच्याशी व्यवहार केला आणि त्यांच्यापासून मी माझे मुख लपविले.

25 “म्हणून सार्वभौम याहवेह असे म्हणतात: मी याकोबाची संपत्ती परत करेन आणि इस्राएलच्या सर्व लोकांवर दया करेन आणि माझ्या पवित्र नावासाठी ईर्षा बाळगेन.

26 जेव्हा ते त्यांच्या देशात सुरक्षित राहतील आणि त्यांना घाबरविण्यास कोणीही नसेल, तेव्हा त्यांची लज्जा व मला दाखविलेले सर्व अविश्वासूपण ते विसरून जातील.

27 जेव्हा मी त्यांना राष्ट्रांतून परत आणेन आणि त्यांच्या शत्रूंच्या देशांमधून त्यांना एकत्र करेन, तेव्हा त्यांच्याद्वारे अनेक राष्ट्रांच्या दृष्टीत मी पवित्र मानला जाईन.

28 तेव्हा ते जाणतील की मी याहवेह त्यांचा परमेश्वर आहे, कारण जरी राष्ट्रांमध्ये मी त्यांना निर्वासित असे पाठवले, तरी मी त्यांना त्यांच्या देशात एकत्र करेन, कोणीही मागे सोडला जाणार नाही.

29 यापुढे मी आपले मुख त्यांच्यापासून लपवणार नाही, कारण इस्राएली लोकांवर मी माझा आत्मा ओतेन, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.”

पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™

ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.

यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.

सर्व अधिकार जगभरात राखीव.

Holy Bible, Marathi Contemporary Version™

Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.

Used with permission.

All rights reserved worldwide.

Biblica, Inc.
Lean sinn:



Sanasan