Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

यहेज्केल 32 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती


फारोहसाठी विलापगीत

1 बाराव्या वर्षी, बाराव्या महिन्याच्या पहिल्या दिवशी, याहवेहचे वचन माझ्याकडे आले:

2 “मानवपुत्रा, इजिप्तचा राजा फारोहसाठी विलाप कर आणि त्याला सांग: “ ‘राष्ट्रांमध्ये तू सिंहासारखा आहेस; तू समुद्रातील श्वापदासारखा आहेस, तुझ्या झर्‍यांमध्ये उसळ्या मारल्यास, आपल्या पायांनी पाणी घुसळले आणि झर्‍यात चिखल केलास.

3 “ ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: “ ‘लोकांच्या मोठ्या जमावाद्वारे माझे जाळे मी तुझ्यावर टाकेन, आणि ते तुला माझ्या जाळ्यात ओढून घेतील.

4 मी तुला जमिनीवर फेकून देईन आणि उघड्या मैदानात तुला टाकून देईन. आकाशातील सर्व पक्ष्यांना मी तुझ्यावर वसू देईन आणि जंगलातील सर्व प्राणी तुला लचके मारून खातील.

5 मी तुझे मांस डोंगरांवर पसरवीन आणि तुझ्या अवशेषाने खोरे भरेन.

6 तुझ्या वाहत्या रक्ताने अगदी डोंगरांपर्यंत मी देश भिजवेन आणि तुझ्या मांसाने ओहोळे भरतील.

7 जेव्हा मी तुझा नाश करेन, मी आकाशे झाकीन आणि त्यातील तारे अंधुक करेन; सूर्याला मी ढगांनी आच्छादेन आणि चंद्र आपला प्रकाश देणार नाही.

8 आकाशातील प्रत्येक चमकणारी ज्योत मी तुझ्यावर अंधार अशी करेन; मी तुझ्या देशावर अंधकार आणेन, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.

9 जेव्हा जे देश व जी राष्ट्रे तुला ओळखत नाहीत त्यात मी तुझा नाश करेन, तेव्हा मी पुष्कळ लोकांचे हृदय कष्टी करेन.

10 अनेक लोक तुझ्याकडे पाहून भयचकित होतील असे मी करेन, जेव्हा त्यांच्यासमोर मी माझी तलवार चालवेन तेव्हा त्यांचे राजे तुझ्यामुळे भयाने कापतील, तुझे पतन होईल त्या दिवशी सर्वजण आपल्या आयुष्याच्या प्रत्येक क्षणी भयभीत होतील.

11 “ ‘कारण सार्वभौम याहवेह असे म्हणतात: “ ‘बाबेलच्या राजाची तलवार तुझ्याविरुद्ध येईल.

12 राष्ट्रांतील जे सर्वात क्रूर अशा बलवान मनुष्यांच्या तलवारीने मी तुझे सैन्य पाडून टाकीन. इजिप्तचा अहंकार ते मोडून टाकतील, आणि तिच्या सर्व सैन्यांचा नाश होईल.

13 पाण्याच्या प्रवाहांजवळ असणार्‍या तिच्या सर्व जनावरांचा मी नाश करेन. ती पुन्हा कोणत्याही मनुष्याच्या पायांनी तुडविली जाणार नाही ना पशूंच्या खुरांनी तिथे चिखल होणार.

14 तेव्हा मी तिचे पाणी स्थिर करेन आणि तिचे प्रवाह तेलाप्रमाणे वाहतील, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.

15 जेव्हा मी इजिप्त ओसाड करेन आणि देशात असलेले सर्वकाही काढून घेईन, जेव्हा तिथे वसत असलेल्या सर्वांचा मी नाश करेन, तेव्हा ते जाणतील की मीच याहवेह आहे.’

16 “तिच्यासाठी जे विलापगीत ते गातील ते हेच. राष्ट्रांच्या कन्या हे गातील; इजिप्त व तिच्या सर्व सैन्यासाठी त्या हे गातील, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.”


इजिप्तचे मृतलोकात उतरणे

17 बाराव्या वर्षी, महिन्याच्या पंधराव्या दिवशी, याहवेहचे वचन माझ्याकडे आले:

18 “मानवपुत्रा, इजिप्तच्या सैन्यासाठी विलाप कर आणि तिला व शक्तिशाली राष्ट्रांच्या कन्यांना खाली गर्तेत जाणार्‍यांबरोबर पृथ्वीच्या खाली हवाली कर.

19 त्यांना सांग, ‘इतरांपेक्षा तू अधिक कृपा पावलेली आहेस काय? तर खाली जा आणि बेसुंत्यांबरोबर जाऊन पड.’

20 जे तलवारीने पडले त्यांच्याबरोबर ते पडतील. तलवार उगारलेली आहे; तिच्या सर्व समूहास ओढून न्या.

21 मृतलोकातून इजिप्त व तिचे सहयोगी याबद्दल बलवान पुढारी म्हणतील, ‘ते खाली आले आणि तलवारीने पडलेल्या बेसुंतीबरोबर ते पडले आहेत.’

22 “अश्शूर तिच्या संपूर्ण सैन्याबरोबर आहे; तिच्यातील वधलेले, जे तलवारीने पडले आहेत त्यांच्या कबरा तिच्याभोवती आहेत.

23 त्यांच्या कबरा खोल गर्तेत आहेत आणि तिचे सैन्य तिच्याच कबरेभोवती पडलेले आहेत. जिवंताच्या भूमीवर ज्यांनी आतंक पसरविला होता त्यांचा वध झाला आहे, ते तलवारीने पडले आहेत.

24 “एलाम तिथे आहे आणि तिच्याबरोबर तिचे मोठे सैन्य तिच्या कबरेभोवती आहेत. त्या सर्वांचा वध झाला आहे, ते तलवारीने पडले आहेत. ज्या सर्वांनी जिवंताच्या भूमीवर आतंक पसरविला ते पृथ्वीच्या खाली बेसुंत्यांबरोबर अधोलोकात गेले आहेत. जे खाली गर्तेत गेले आहेत, त्यांच्याबरोबर ते लज्जित झाले आहेत.

25 वधलेल्यांबरोबर तिचा बिछाना केलेला आहे आणि तिचे सैन्य तिच्या कबरेभोवती आहेत. ज्यांना तलवारीने वधले आहे, ते सर्व बेसुंती आहेत, कारण जिवंतांच्या भूमीवर त्यांचा आतंक पसरला होता. जे खाली गर्तेत गेले आहेत त्यांच्याबरोबर ते लज्जित झाले आहेत; वधलेल्यांबरोबर त्यांना ठेवले आहे.

26 “मेशेख व तूबाल तिथे आहेत आणि त्यांचे सैन्य त्यांच्याभोवती आहेत. जिवंतांच्या भूमीवर आतंक पसरविला ते सर्व बेसुंती आहेत, म्हणून ते तलवारीने वधले आहेत.

27 परंतु त्यांच्या आधी मेलेल्या दुष्ट पुरातन बेसुंती योद्ध्यांबरोबर ते निजलेले नाहीत, जे त्यांच्या युद्धाच्या शस्त्रांसह खाली अधोलोकात गेले; ज्यांच्या तलवारी त्यांच्या उशाखाली व त्यांच्या ढाली त्यांच्या हाडांवर आहेत; या योद्ध्यांनी सुद्धा जिवंतांच्या भूमीवर आतंक पसरविला होता.

28 “हे फारोह, तू सुद्धा मोडला जाशील व जे तलवारीने वधले आहे, त्या बेसुंत्यांबरोबर जाऊन पडशील.

29 “एदोम, तिचे राजे व तिचे सर्व राजपुत्र तिथे आहेत, ते बलवान असूनही, जे तलवारीने वधले आहेत ते बेसुंती लोकांबरोबर व जे खाली गर्तेत जातात त्यांच्याबरोबर पडले आहेत.

30 “उत्तरेकडील सर्व राजपुत्र आणि सर्व सीदोनी लोक तिथे आहेत; त्यांच्या बलाने जरी त्यांनी आतंक पसरविला तरीही ते वधलेल्यांबरोबर अप्रतिष्ठेने खाली गेले. जे तलवारीने वधले आहेत त्यांच्याबरोबर ते बेसुंती पडले आणि गर्तेत गेलेल्यांप्रमाणे ते लज्जित झाले आहेत.

31 “फारोह व त्याचे सर्व सैन्य त्यांना पाहतील आणि तलवारीने वधलेल्या त्याच्या सर्व सैन्यांसाठी तो सांत्वन पावेल, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.

32 जरी जिवंताच्या भूमीवर फारोहचे भय मी पसरविले होते, तरीही फारोह व त्याचे सर्व सैन्य जे लोक तलवारीने वधलेले, सुंता न झालेल्या आहेत त्यांच्याबरोबर पडतील, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.”

पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™

ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.

यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.

सर्व अधिकार जगभरात राखीव.

Holy Bible, Marathi Contemporary Version™

Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.

Used with permission.

All rights reserved worldwide.

Biblica, Inc.
Lean sinn:



Sanasan