Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

निर्गम 40 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती


निवासमंडपाची उभारणी

1 मग याहवेह मोशेला म्हणाले:

2 “पहिल्या महिन्याच्या पहिल्या दिवशी निवासमंडप, सभामंडप उभा करावा.

3 त्यामध्ये कराराच्या नियमाचा कोश ठेवावा आणि कोश पडद्याने झाकावा.

4 मेज आत आणून त्यावरचे सामान व्यवस्थित लावावे. मग दीपस्तंभ आत आणावा व त्याचे दिवे लावावे.

5 कराराच्या नियमाच्या कोशापुढे सोन्याची धूपवेदी ठेवावी आणि निवासमंडपाच्या प्रवेशद्वाराचा पडदा लावावा.

6 “निवासमंडपाच्या प्रवेशद्वारापुढे, सभामंडपापुढे होमार्पणाची वेदी ठेवावी.

7 सभामंडप व वेदी यांच्यामध्ये गंगाळ ठेवून त्यात पाणी भरावे.

8 त्याभोवती अंगण करावे आणि त्या अंगणाच्या प्रवेशद्वारास पडदा लावावा.

9 “अभिषेकाचे तेल घेऊन निवासमंडप व त्यातील प्रत्येक वस्तूवर अभिषेक करावा, ते व त्यातील सर्व सामान वेगळे करावे म्हणजे ते पवित्र होईल.

10 मग होमार्पणाची वेदी व तिची सर्व पात्रे यांचा अभिषेक करावा; वेदीला पवित्र करावे म्हणजे ती वेदी परमपवित्र होईल.

11 मग गंगाळ व त्याच्या बैठकीस अभिषेक कर व ते समर्पित कर.

12 “अहरोन व त्याचे पुत्र यांना सभामंडपाच्या प्रवेशद्वाराशी आणावे व त्यांना पाण्याने धुवावे.

13 मग अहरोनाला पवित्र वस्त्रे घालावीत. त्याने याजक म्हणून माझी सेवा करावी, यासाठी त्याला अभिषेक करून पवित्र करावे.

14 त्याच्या पुत्रांना आणून त्यांना झगे घालावे.

15 जसा त्यांच्या पित्याला अभिषेक केला, तसाच त्यांनाही अभिषेक करावा, म्हणजे याजक म्हणून ते माझी सेवा करतील. त्यांचा हा याजकपणाचा अभिषेक पिढ्यान् पिढ्या चालू राहील.”

16 जसे याहवेहने आज्ञापिले होते, मोशेने सर्वकाही तसेच केले.

17 दुसर्‍या वर्षाच्या पहिल्या महिन्याच्या पहिल्या दिवशी निवासमंडपाची उभारणी करण्यात आली.

18 जेव्हा मोशेने निवासमंडपाची उभारणी केली, त्याने बैठका जागेवर लावल्या, फळ्या उभ्या केल्या, त्यात अडसर टाकले व खांब उभे केले.

19 मग मोशेने निवासमंडपावरून तंबू पसरला आणि तंबूवर आच्छादन टाकले, जसे याहवेहने त्याला आज्ञापिले होते.

20 मग त्याने कराराच्या नियमाच्या पाट्या घेतल्या व त्या कोशामध्ये ठेवल्या, कोशाचे दांडे जोडले व त्यावर प्रायश्चिताचे झाकण लावले.

21 मग मोशेने कोश निवासमंडपात आणला आणि पडदे अडकविले आणि याहवेहने त्याला आज्ञापिल्याप्रमाणे कराराच्या नियमाचा कोश झाकून घेतला.

22 मोशेने सभामंडपामध्ये, निवासमंडपाच्या उत्तर दिशेला पडद्याच्या बाहेर मेज ठेवला

23 व मोशेने त्यावर याहवेहसमोर भाकर ठेवली, जसे याहवेहने त्याला आज्ञापिले होते.

24 त्याने सभामंडपामध्ये मेजासमोर, निवासमंडपाच्या दक्षिण दिशेला दीपस्तंभ ठेवला

25 आणि याहवेहने मोशेला आज्ञापिल्याप्रमाणे याहवेहसमोर दिवे लावले.

26 मग मोशेने सभामंडपात, पडद्याच्या समोर सोन्याची वेदी ठेवली

27 व याहवेहने मोशेला आज्ञापिल्याप्रमाणे वेदीवर सुगंधी धूप जाळला.

28 मग त्याने निवासमंडपाच्या प्रवेशद्वाराला पडदे लावले.

29 मग मोशेने निवासमंडपाच्या, सभामंडपाच्या प्रवेशद्वाराजवळ होमार्पणाची वेदी ठेवली व त्यावर होमार्पण व अन्नार्पण केले, जसे याहवेहने त्याला आज्ञापिले होते.

30 नंतर मोशेने सभामंडप व वेदी यांच्यामध्ये गंगाळ ठेवले व धुण्यासाठी त्यात पाणी भरून ठेवले,

31 आणि मोशे आणि अहरोन व अहरोनाचे पुत्र यांनी आपले हात व पाय धुण्यासाठी त्या पाण्याचा वापर केला.

32 जेव्हा ते सभामंडपात प्रवेश करीत किंवा वेदीजवळ जात, तेव्हा ते आपले हात व पाय धूत असत, जसे याहवेहने मोशेला आज्ञापिले होते.

33 मग मोशेने निवासमंडप व वेदी यांच्याभोवती अंगण केले आणि अंगणाच्या प्रवेशद्वारात पडदे लावले. अशाप्रकारे मोशेने सर्व काम पूर्ण केले.


याहवेहचे तेज

34 मग मेघाने सभामंडप झाकले आणि याहवेहच्या तेजाने निवासमंडप भरून गेला.

35 मोशे सभामंडपात प्रवेश करू शकत नव्हता कारण त्यावर मेघ होता आणि याहवेहच्या तेजाने निवासमंडप भरून गेला होता.

36 इस्राएली लोकांच्या सर्व प्रवासात, जेव्हा निवासमंडपावरून मेघ वर जाई तेव्हा ते पुढची वाटचाल करीत असत;

37 पण मेघ वर गेला नाही, तर तो वर जाईल त्या दिवसापर्यंत ते पुढे जात नसत.

38 त्यांच्या संपूर्ण प्रवासात निवासमंडपावर दिवसा याहवेहचा मेघ, तर रात्री त्या मेघात अग्नी, असे इस्राएलने पाहिले.

पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™

ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.

यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.

सर्व अधिकार जगभरात राखीव.

Holy Bible, Marathi Contemporary Version™

Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.

Used with permission.

All rights reserved worldwide.

Biblica, Inc.
Lean sinn:



Sanasan