Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

निर्गम 4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती


मोशेला देण्यात आलेली चिन्हे

1 मोशेने उत्तर दिले, “जर त्यांनी माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवला नाही किंवा माझे ऐकले नाही आणि म्हणाले, ‘याहवेह तुला प्रकट झालेच नाही’ तर मी काय करावे?”

2 याहवेहने त्याला विचारले, “तुझ्या हातात काय आहे?” त्याने उत्तर दिले, “एक काठी!”

3 याहवेह त्याला म्हणाले, “ती जमिनीवर टाक.” मोशेने ती जमिनीवर टाकली आणि तिचा साप झाला आणि मोशे भिऊन त्यापासून दूर पळाला.

4 मग याहवेहने त्याला सांगितले, “हात लांब करून सापाचे शेपूट धर.” तेव्हा मोशेने त्या सापाला धरले आणि तो पुन्हा त्याच्या हातातील काठी झाला.

5 याहवेहने मोशेला सांगितले “हे अशासाठी की याहवेह त्यांच्या पूर्वजांचे परमेश्वर—अब्राहामाचे परमेश्वर, इसहाकाचे परमेश्वर आणि याकोबाचे परमेश्वर—यांचे तुला निश्चितच दर्शन झाले आहे.”

6 मग याहवेह त्याला म्हणाले, “तुझा हात तुझ्या झग्याच्या आत घाल.” मग मोशेने आपला हात आपल्या झग्याच्या आत घातला आणि जेव्हा त्याने हात बाहेर काढला, त्याची कातडी कोडाने भरली; तो हिमासारखा पांढरा झाला होता.

7 “आता परत आपला हात झग्याच्या आत घाल,” याहवेह म्हणाले आणि मोशेने परत आपला हात झग्याच्या आत घातला, आणि जेव्हा तो बाहेर काढला, तो पूर्ववत त्याच्या शरीराच्या बाकीच्या कातडीप्रमाणे झाला.

8 तेव्हा याहवेह म्हणाले, “पहिले चिन्ह पाहून जर त्यांनी विश्वास ठेवला नाही, तर दुसरे चिन्ह पाहून कदाचित ते विश्वास ठेवतील.

9 पण या दोन्ही चिन्हांवर त्यांनी विश्वास ठेवला नाही तर तू नाईल नदीचे पाणी घेऊन ते कोरड्या जमिनीवर ओत म्हणजे नदीतून घेतलेल्या पाण्याचे जमिनीवर रक्त होईल.”

10 मोशे याहवेहला म्हणाला, “आपल्या सेवकास क्षमा करावी, प्रभू मी चांगला वक्ता नाही, कधीही नव्हतो आणि आपण माझ्याबरोबर प्रत्यक्ष बोलत होता तेव्हाही नाही. मी मुखदुर्बल व जिभेचा जड आहे.”

11 याहवेह त्याला म्हणाले, “मनुष्यांना मुख कोणी दिले? त्यांना बहिरा किंवा मुका कोण करतो? त्याला कोण दृष्टी देतो? किंवा कोण आंधळे करतो? तो मी याहवेह नाही का?

12 आता जा; मी तुला बोलण्यास मदत करेन आणि काय बोलावे ते तुला शिकवेन.”

13 पण मोशे म्हणाला, “तुमच्या सेवकास क्षमा करावी, प्रभू. कृपा करून दुसर्‍या कोणाला पाठवा.”

14 तेव्हा मोशेविरुद्ध याहवेहचा राग भडकला, ते म्हणाले, “लेवी अहरोन, तुझा भाऊ, याच्याविषयी काय? मला ठाऊक आहे की तो चांगले बोलू शकतो. तो तुला भेटावे म्हणून मार्गावर आहे, तुला पाहून त्याला फार आनंद होईल.

15 तू त्याच्याशी बोलून त्याच्या मुखात शब्द घाल; मी तुम्हा दोघांना बोलण्यास मदत करेन, आणि काय करावे हे शिकवेन.

16 तो तुझ्या वतीने लोकांबरोबर बोलेल, जसे तो तुझेच मुख आहे व तू त्याला परमेश्वरासारखा होशील असे मी करेन.

17 परंतु ही काठी आपल्या हातात घे, म्हणजे तिच्यायोगे तुला चिन्हे करता येतील.”


मोशे इजिप्त देशास परत येतो

18 मग मोशे आपला सासरा इथ्रोकडे गेला आणि त्याला म्हणाला, “इजिप्त देशात असलेल्या माझ्या स्वकियांकडे परत जाऊन त्यातील कोणी जिवंत आहेत की नाही ते मला पाहू दे.” इथ्रोने उत्तर दिले, “जा. तुझे भले होवो.”

19 मिद्यानात याहवेहने मोशेला म्हटले, “इजिप्त देशास जा, कारण तुला ठार करावयास जे टपलेले होते, ते सर्व आता मरण पावले आहेत.”

20 तेव्हा मोशे आपली पत्नी व मुले यांना गाढवावर बसवून इजिप्तला परतला. त्याने आपल्या हाती परमेश्वराची काठी घेतली.

21 याहवेह मोशेला म्हणाले, “इजिप्त देशात पोहोचल्यावर फारोहसमोर जाऊन, मी जे चमत्कार करण्याचे सामर्थ्य तुला दिले आहे, ते त्याच्यापुढे सादर कर. पण मी फारोहचे हृदय कठीण करेन आणि तो लोकांना जाऊ देणार नाही.

22 मग तू फारोहला सांग, ‘याहवेह असे म्हणतात: इस्राएल माझा ज्येष्ठपुत्र आहे,

23 आणि मी तुला सांगितल्याप्रमाणे, माझ्या पुत्राला माझी आराधना करण्यासाठी तू जाऊ द्यावेस. पण तू त्यांना पाठविण्यास नकार दिला; तर मी तुझा ज्येष्ठपुत्र मारून टाकीन.’ ”

24 मोशे आपल्या मार्गात एके ठिकाणी मुक्कामास असताना, जसे याहवेह त्याला मारणारच असे गाठले.

25 सिप्पोराहने एक धारदार गारेचा तुकडा घेऊन, आपल्या मुलाची अग्रत्वचा कापून त्याची सुंता केली व त्या अग्रत्वचेने तिने मोशेच्या पायांस स्पर्श केला आणि ती त्याला म्हणाली, “खरोखर तुम्ही माझे रक्ताचे वर आहात.”

26 नंतर याहवेहने त्याला सोडले. (“रक्ताचा वर” असे तिने सुंतेच्या बाबतीत म्हटले.)

27 आता याहवेहने अहरोनाला म्हटले, “मोशेला भेटण्यासाठी रानात जा.” तेव्हा अहरोन मोशेला परमेश्वराच्या पर्वतावर भेटला आणि त्याचे चुंबन घेतले.

28 तेव्हा याहवेहने जे काही सांगावयास त्याला पाठविले होते ते सर्व मोशेने अहरोनाला सांगितले आणि जी चिन्हे करावयास सांगितली आहेत, त्याविषयी सुद्धा त्याला सांगितले.

29 मग मोशे व अहरोन यांनी इस्राएलांच्या सर्व वडिलांना एकत्र बोलाविले,

30 आणि याहवेहने मोशेला जे सांगितले होते ते सर्वकाही अहरोनाने त्यांना सांगितले. मोशेने लोकांच्या देखत चिन्हे करून दाखविली.

31 तेव्हा या गोष्‍टीवर त्यांनी विश्वास केला. आणि जेव्हा त्यांनी हे ऐकले की याहवेहने इस्राएली लोकांची भेट घेऊन त्यांचे दुःख पाहिले आहे, तेव्हा सर्वांनी नमन करून उपासना केली.

पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™

ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.

यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.

सर्व अधिकार जगभरात राखीव.

Holy Bible, Marathi Contemporary Version™

Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.

Used with permission.

All rights reserved worldwide.

Biblica, Inc.
Lean sinn:



Sanasan