Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

निर्गम 38 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती


होमवेदी

1 त्यांनी बाभळीच्या लाकडाची होमार्पणाची वेदी तयार केली. ती तीन हात उंच, पाच हात लांब, पाच हात रुंद असून चौकोनी होती.

2 मग त्यांनी वेदीच्या चार कोपर्‍यांना प्रत्येकी एक शिंग बनविले, शिंगे व वेदी अखंड बनविली व वेदीला कास्याचे आवरण घातले.

3 वेदीची सर्व पात्रे, म्हणजे त्याचे भांडे, फावडे, शिंपडण्याचे भांडे, मांसाचे काटे आणि अग्निपात्रे कास्याचे बनविले.

4 त्यांनी वेदीसाठी कास्याच्या जाळीची चाळण तयार केली, जी वेदीच्या काठाखाली वेदीच्या अर्ध्या उंचीपर्यंत होती.

5 त्यांनी कास्याच्या चाळणीच्या चार कोपर्‍यांना दांडे अडकविण्यासाठी ओतीव कास्याच्या कड्या तयार केल्या.

6 त्यांनी बाभळीच्या लाकडाचे दांडे तयार करून त्यांना कास्याचे आवरण घातले.

7 त्यांनी ते दांडे कड्यात अडकविले, म्हणजे वेदी वाहून नेताना दांडे वेदीच्या दोन बाजूंनी असतील. वेदी लाकडाची असून ती आतून पोकळ बनविली.


धुण्यासाठी गंगाळ

8 मग त्यांनी कास्याचे गंगाळ व त्याची बैठक सुद्धा कास्याची बनविली. सभामंडपाच्या दाराशी सेवा करणार्‍या स्त्रियांच्या आरशांचे ते बैठक होते.


अंगण

9 मग त्यांनी अंगण तयार केले. त्याची दक्षिणेकडील बाजू शंभर हात लांब होती व त्यास कातलेल्या रेशमी तागाचे पडदे होते.

10 आणि वीस खांब व वीस कास्याच्या बैठका होत्या, खांबावर चांदीच्या कड्या व पट्ट्या होत्या.

11 उत्तरेकडील बाजू सुद्धा शंभर हात लांब होती आणि वीस खांब व कास्याच्या वीस बैठका होत्या व खांबाच्या कड्या व पट्ट्या चांदीच्या होत्या.

12 पश्चिमेकडील शेवटची बाजू पन्नास हात रुंदीची होती आणि त्याला पडदे लावलेले होते, त्याला दहा खांब व दहा बैठका असून खांबांना चांदीच्या कड्या व पट्ट्या होत्या.

13 सूर्योदयाकडील पूर्वेकडील बाजू पन्नास हात रुंद होती.

14 प्रवेशद्वाराच्या एका बाजूस पंधरा हात लांबीचा पडदा होता. त्यास तीन खांब व तीन बैठका होत्या,

15 आणि अंगणाच्या प्रवेशद्वाराच्या दुसर्‍या बाजूला पंधरा हात लांबीचे पडदे होते, त्यास तीन खांब व तीन बैठका होत्या.

16 अंगणाच्या सर्व बाजूचे पडदे कातलेल्या रेशमी तागाचे होते.

17 खांबांच्या बैठका कास्याच्या होत्या. खांबाच्या कड्या व पट्ट्या चांदीच्या होत्या आणि त्यांच्या वरच्या भागाला चांदीचे आवरण दिले होते; अशाप्रकारे अंगणाच्या प्रत्येक खांबाला चांदीच्या पट्ट्या होत्या.

18 अंगणाच्या प्रवेशद्वाराचा पडदा निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाच्या सुताचे व रेशमी तागाचा होता व त्यावर भरतकाम केले होते. ते अंगणाच्या पडद्यासारखे वीस हात लांब होते आणि पाच हात उंच होते.

19 त्याला चार खांब व कास्याच्या चार बैठका होत्या. त्यांच्या कड्या व पट्ट्या चांदीच्या होत्या आणि त्याच्या वरच्या भागाला चांदीचे आवरण दिले होते.

20 निवासमंडप व अंगणाच्या सभोवती वापरलेल्या सर्व मेखा कास्याच्या होत्या.


वापरलेली सामुग्री

21 मोशेच्या आज्ञेनुसार बनविलेले कराराच्या नियमाचे निवासमंडप यासाठी जी सामुग्री वापरली गेली, त्यांची मोजणी, अहरोन याजक याचा पुत्र इथामार याच्या नेतृत्वाखाली लेव्यांच्या द्वारे केली गेली, ती अशी:

22 याहवेहने मोशेला जे सर्व आज्ञापिले होते ते यहूदाह वंशातील हूराचा पुत्र उरी याचा पुत्र बसालेल याने तयार केले;

23 त्याच्याबरोबर दान वंशातील अहीसामाक याचा पुत्र ओहोलियाब होता; हा शिल्पकार व कुशल कारागीर, निळे, जांभळे आणि किरमिजी रंगाचे रेशमी ताग यावर भरतकाम करणारा होता.

24 हेलावणीच्या अर्पणातून पवित्रस्थानाच्या सर्व कामासाठी वापरलेले सोने हे पवित्रस्थानाच्या वजनानुसार एकोणतीस तालांत व सातशे तीस शेकेल असे होते.

25 इस्राएली समुदायातील जनगणना झालेल्या लोकांपासून आलेली चांदी पवित्रस्थानाच्या वजनानुसार शंभर तालांत आणि एक हजार सातशे पंचाहत्तर शेकेल होती.

26 जनगणना झालेले वीस वर्ष व त्याहून अधिक वयाचे सहा लक्ष तीन हजार पाचशे पन्नास पुरुष होते—त्याचा प्रत्येक पुरुषाकरिता एक बेका, म्हणजेच पवित्रस्थानाच्या वजनानुसार अर्धा शेकेल मिळाला होता.

27 शंभर तालांत चांदी पवित्रस्थानाच्या व पडद्याच्या ओतीव बैठका तयार करण्यासाठी वापरली; शंभर बैठकांसाठी शंभर तालांत, प्रत्येकी एका बैठकीसाठी एक तालांत वापरला.

28 खाबांच्या कड्यांसाठी, खांबांच्या वरील भागास आवरण देण्यासाठी व त्यांच्या पट्ट्या बनविण्यासाठी एक हजार सातशे पंचाहत्तर शेकेल वापरण्यात आले.

29 हेलावणीच्या अर्पणात सत्तर तालांत आणि दोन हजार चारशे शेकेल कास्य होते.

30 त्याचा वापर त्यांनी सभामंडपाच्या प्रवेशद्वाराच्या बैठका, कास्याची वेदी व त्याची कास्याची चाळणी व वेदीवरील उपकरणे बनविण्यासाठी केला,

31 निवासमंडपाच्या अंगणाभोवती व त्याच्या प्रवेशद्वारासाठी बैठका आणि निवासमंडपाच्या व अंगणाच्या सभोवती मेखा करण्यासाठी त्याचा वापर केला.

पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™

ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.

यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.

सर्व अधिकार जगभरात राखीव.

Holy Bible, Marathi Contemporary Version™

Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.

Used with permission.

All rights reserved worldwide.

Biblica, Inc.
Lean sinn:



Sanasan