Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

निर्गम 36 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 मग बसालेल, ओहोलियाब आणि सर्व निपुण व्यक्ती, ज्यांना याहवेहने कुशलता व पवित्रस्थानाचे बांधकाम करण्याचे कौशल्य आणि क्षमता दिली आहे, त्यांनी याहवेहने आज्ञापिल्याप्रमाणेच काम करावे.”

2 मग बसालेल व ओहोलियाब व ज्यांना याहवेहने क्षमता दिली होती आणि ज्यांना येऊन काम करण्याची इच्छा होती त्यांना मोशेने बोलाविले.

3 पवित्रस्थानाच्या बांधकामासाठी इस्राएल लोकांनी आणलेली अर्पणे मोशेकडून त्यांनी घेतली. लोक दररोज सकाळी स्वैच्छिक अर्पणे आणत राहिले.

4 मग सर्व कुशल कारागीर जे पवित्रस्थानाचे काम करीत होते, त्यांनी ते पूर्वी करीत असलेले काम सोडले,

5 व मोशेला म्हणाले, “याहवेहने आज्ञापिलेल्या कामासाठी आवश्यक आहे त्यापेक्षा अधिक सामुग्री लोक आणत आहेत.”

6 तेव्हा मोशेने आज्ञा दिली आणि सर्व छावणीत कळविण्यात आले: “कोणी पुरुषाने किंवा स्त्रीने पवित्रस्थानासाठी कोणतेही अर्पण करू नये.” अशाप्रकारे अधिक सामुग्री आणण्यापासून लोकांना थांबविण्यात आले,

7 कारण जी सामुग्री त्यांच्याजवळ होती, ती सर्व कामाच्या आवश्यकतेपेक्षा अधिक होती.


निवासमंडप

8 सर्व कुशल कारागिरांनी निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगांच्या तागाच्या व रेशमी तागाच्या दहा पडद्यांनी निवासमंडप तयार केला व त्यावर कुशल कारागिरांकडून करूब विणून घेतले.

9 सर्व पडद्यांची लांबी अठ्ठावीस हात व रुंदी चार हात होती.

10 त्यांनी पाच पडदे एकमेकांना जोडले व इतर पाच पडद्यांचेही तसेच केले.

11 जोडलेल्या पडद्यापैकी शेवटच्या पडद्यांच्या किनारीवर त्यांनी निळ्या रंगाच्या कापडाचे फासे बनविले आणि दुसर्‍या पडद्यांच्या शेवटच्या पडद्यालाही तसेच केले.

12 तसेच त्यांनी एका पडद्याच्या किनारीला पन्नास फासे व दुसर्‍या पडद्याच्या किनारीपर्यंत तसेच पन्नास फासे केले, हे फासे समोरासमोर होते.

13 मग त्यांनी सोन्याचे पन्नास आकडे तयार केले आणि त्याचा उपयोग पडद्याच्या दोन जोड्या एकत्र बांधण्यासाठी केला, यासाठी की निवासमंडप अखंड होईल.

14 निवासमंडपावर आच्छादन करण्यासाठी त्यांनी बोकडाच्या केसाचे पडदे तयार केले; ते अकरा पडदे होते.

15 सर्व अकरा पडदे एकाच मापाचे, म्हणजे लांबी तीस हात व रुंदी चार हात होती.

16 त्यांनी पाच पडदे एकत्र जोडले आणि इतर सहा पडदे एकत्र जोडले.

17 जोडलेल्या पडद्यांपैकी शेवटच्या पडद्याच्या किनारीवर पन्नास फासे करून तो एकजोड केला आणि दुसर्‍या पडद्याच्या किनारीवर देखील पन्नास फासे करून एकजोड केला.

18 मग त्यांनी कास्याचे पन्नास आकडे तयार केले आणि ते फासात घालून तंबू एकजोड केला.

19 मग त्यांनी तंबूसाठी तांबडा रंग दिलेल्या मेंढ्याच्या कातड्याचे आच्छादन केले आणि त्यावर टिकाऊ चर्माचे आच्छादन केले.

20 त्यांनी निवासमंडपासाठी बाभळीच्या लाकडाच्या उभ्या फळ्या तयार केल्या.

21 प्रत्येक फळी दहा हात लांब व दीड हात रुंद होती.

22 एक फळी दुसर्‍या फळीला जोडण्यासाठी त्यांच्या समोरासमोर दोन कुसे केली. निवासमंडपाच्या प्रत्येक फळीला त्यांनी अशाप्रकारे कुसे केली.

23 निवासमंडपाच्या दक्षिणेस त्यांनी वीस फळ्या तयार केल्या

24 आणि त्या फळ्यांखाली ठेवण्यासाठी चांदीच्या चाळीस बैठका केल्या—प्रत्येक फळीसाठी दोन बैठका, प्रत्येक कुसाखाली एक.

25 निवासमंडपाच्या दुसर्‍या बाजूला, म्हणजे उत्तरेला त्यांनी वीस फळ्या तयार केल्या

26 आणि प्रत्येक फळीखाली दोन, अशा चांदीच्या चाळीस बैठका केल्या.

27 निवासमंडपाच्या शेवटच्या बाजूसाठी, म्हणजे पश्चिम बाजूस त्यांनी सहा फळ्या तयार केल्या.

28 आणि निवासमंडपाच्या मागच्या बाजूच्या कोपर्‍यांसाठी त्यांनी दोन फळ्या तयार केल्या.

29 या दोन कोपर्‍यातील फळ्या खालपासून वरपर्यंत दुहेरी असून एकाच कडीत जोडल्या होत्या; दोन्ही कोपर्‍यांच्या फळ्या एकसारख्याच होत्या.

30 एका फळीखाली दोन; अशा प्रकारे एकूण आठ फळ्या आणि चांदीच्या सोळा बैठका होत्या.

31 त्याचप्रमाणे त्यांनी निवासमंडपाच्या एका बाजूच्या फळ्यांसाठी बाभळीच्या लाकडाचे पाच अडसर तयार केले,

32 निवासमंडपाच्या दुसर्‍या बाजूला पाच आणि पश्चिमेच्या बाजूच्या म्हणजेच शेवटच्या बाजूच्या फळ्यांसाठी पाच अडसर होते.

33 मध्यभागी लावण्याचे अडसर फळ्यांच्या मधून एका टोकापासून दुसर्‍या टोकापर्यंत पोहोचतील असे तयार केले.

34 त्यांनी फळ्यांना सोन्याचे आवरण लावले आणि आडव्या खांबांना अडकविण्यासाठी सोन्याच्या कड्या केल्या. त्यांनी आडव्या खांबांना सुद्धा सोन्याचे आवरण दिले.

35 मग त्यांनी निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगांच्या तागाच्या व रेशमी तागाचे पडदे बनविले व त्यावर कुशल कारागिरांकडून करूब विणून घेतले.

36 त्यासाठी त्यांनी बाभळीच्या लाकडाचे चार खांब केले व त्यावर सोन्याचे आवरण घातले. त्यासाठी त्यांनी सोन्याच्या कड्या व चांदीच्या चार बैठका बनविल्या.

37 त्यांनी निवासमंडपाच्या प्रवेशद्वारासाठी निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाच्या रेशमी तागाचा नक्षीदार पडदा तयार केला.

38 मग त्यांनी पाच खांब व त्यांच्या कड्या बनविल्या. त्या खांबांचा वरचा भाग व बांधे यांना सोन्याचे आवरण घातले आणि त्यांच्या कास्याच्या पाच बैठका बनविल्या.

पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™

ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.

यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.

सर्व अधिकार जगभरात राखीव.

Holy Bible, Marathi Contemporary Version™

Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.

Used with permission.

All rights reserved worldwide.

Biblica, Inc.
Lean sinn:



Sanasan